अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री केले हीच आमची चूक : जितेंद्र आव्हाड
अजितदादांनी राष्ट्रवादीत इतकी वर्षे दादागिरीच केल्याचा आरोप
मुंबई : शरद पवार यांनी उभ्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परखड टीका केली. ‘अजित पवार हे नेते कुणामुळे झाले? याचा विचार त्यांनी करावा. धमकी देण्याचा स्वभाव अजित पवारांचा पूर्वीपासूनच आहे. आता ते उघड धमक्या देत आहेत. पक्षात देखील आजपर्यंत त्यांनी हेच केले. शरद पवारांच्या जवळील चांगले माणसे तोडली. वर्षानुवर्ष अजित पवारांनी पक्षात दादागिरी केली. २०१९ मध्ये झालेल्या प्रकारानंतर महाविकास आघाडीच्या सत्तेत आम्ही अजितदादांना पुन्हा उपममुख्यमंत्री केले ही आमची चूकच होती’, असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.
जयंत पाटील हेही शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत जाणार होते, या चर्चेचे खंडन करताना आव्हाड म्हणाले, जयंत पाटील कधीच कुठेच जाणार नाहीत. तसा प्रश्नच उद्भवत नाही.
प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याबद्दलच्या प्रश्नावर आव्हाड म्हणाले, ‘माझी मनापासून इच्छा आहे की वंचित आणि महाविकास आघाडी यांनी एकत्रित येऊन लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात यातच महाराष्ट्राचे हित आहे.
पहाटेचा शपविधी
23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आपले सरकार स्थापन केले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच शरद पवार यांनी सूत्रे फिरवत अजित पवारांसोबत गेलेल्या आपल्या पक्षाच्या बहुतांश आमदारांना परत आणले होेते. तसेच अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अजितदादांचे बंड फसले व ७२ तासात फडणवीस- अजित पवारांच्या सरकारला राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यात आश्चर्यकारकरित्या अजित पवारांनाही उपमुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यात आले. त्यामुळे पहाटेच्या शपधविधी नाट्याला शरद पवारांचाही पाठिंबा होता का? अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली.
लोक माझा सांगाती पुस्तकात पवार म्हणतात…
माझी पत्नी प्रतिभा आणि अजितचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. प्रतिभा राजकीय घडामोडींत कधीही पडत नाही, परंतु अजितचा विषय कौटुंबिकही होता. अजितने प्रतिभाला ‘जे झाले ते चुकीचे होते आणि घडायला नको होते,’ अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. आमच्यासाठी तेवढे पुरेसे होते. या कारणामुळे अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीच्या चुकीबद्दल माफ केल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र आता जितेंद आव्हाड यांना शरद पवारांची ही कृती चुकीची असल्याचे वाटत आहे.