सोम्या गोम्यांना मी उत्तर देत नाही; अजितदादांचा संजय राऊतांना टोला
पुणे : कालपर्यंत अजित पवार हे कणखर नेतृत्व असल्याची स्तुती करणारे उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत आता मात्र त्यांच्यावर जोरदार तोंडसुख घेत आहेत. नुकताच पुणे जिल्ह्यात खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चात बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजितदादांना उद्देशून ‘आमच्या पाडापाडीच्या राजकारणात तुम्ही पडू नका, हवा तो बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जाएगी’ असा इशारा दिला होता.
त्याला प्रत्त्युत्तर देताना अजित पवार यांनी ‘सोम्या गोम्याच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देत नसतो’ असे आपल्या स्टाईलमध्ये सांगून अधिक बोलणे टाळले होते.
हा वाद सुरु झाला तो शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातून. तेथील विकास कामांची पाहणी करण्यास गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी आपण अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी थेट उत्तर न देता ‘दादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना कान धरण्याचा अधिकार आहे’ असे सांगून अधिक बोलणे टाळले होते.
मात्र जेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत खासदार कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता झाली तेव्हा मात्र खासदार संजय राऊत यांनी अजितदादांचा भर कार्यक्रमात समाचार घेतला होता.
अजितदादांकडून राऊतांना ‘सोम्या गोम्या’ची उपमा
संजय राऊतांच्या टीकेला आपण फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे दाखवताना अजित पवार यांनी त्यांना ‘सोम्या गोम्या’ची उपमा दिली. त्यावर गप्प बसतील ते संजय राऊत कसले?
दादांचे सोमे- गोमे दिल्लीत : संजय राऊत
अजितदादांना उद्देशून ते म्हणाले, ‘ त्यांचे सोमे आणि गोमे दिल्लीत बसलेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये. सोमे-गोमे कोण आहेत हे २०२४ला कळेलच. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होतं असताना, महाराष्ट्राचे उद्योग पळविले जात असताना, रोजगार पळविला जात असताना सरकारमधील हौशे- नवशे तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही,’ असे राऊत यांनी दादांना सुनावले.
दादांच्या नादी लागू नका : मिटकरी
त्याच वेळी अजितदादांचे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनीही राऊतांचा समाचार घेतला. ‘बाकी कुणाच्याही नादी लागा, पण अजित पवारांच्या नादी लागू नका’ असा इशारा त्यांनी दिला.