अमरावती : शिंदेसेनेला पाठिंबा देणारे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी अमरावतीतील विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना यावेळी आमच्या प्रहार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.
ठाकरे सरकारमधील राज्यमंत्रिपदावर पाणी सोडून बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) बंडात साथ दिली. मात्र दीड वर्षे उलटले तरी त्यांना शिंदेंनी मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. दिव्यांग मंडळाचे अध्यक्षपद हे राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे पद देऊन शिंदेंनी त्यांची बोळवण केली असली तरी त्यावर आमदार कडू अजिबात खूश नाहीत. त्यामुळेच ते अधूनमधून आपल्याच सरकारविरोधात बोलत असतात.
नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना आपल्या घरी चहापानाला बोलावले होते. त्यामुळे कडू महाविकास आघाडीसोबत पुन्हा जातात की काय अशी चर्चा सुरु झाली. त्यातच आता आमदार बच्चू कडू यांनी महायुतीत लोकसभेच्या ३ व विधानसभेच्या १५ जागांवर आपला प्रहार पक्ष दावा करणार असल्याचे सांगितले आहे. एकीकडे आधीच महायुतीतील भाजप, शिंदे सेना व अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्यात जागावाटपावरुन रस्सीखेच होत असताना प्रहार सारख्या छोट्या मित्रपक्षांना लोकसभेच्या ३ जागा मिळणे मुश्कील आहे. मात्र हे माहित असतानाही कडू यांनी ही भूमिका जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार कडू यांना लोकसभेच्या अकोला, अमरावती व बुलडाणा अशा विदर्भातील तीन जागा हव्या आहेत. अकोल्यात सध्या भाजपचे तर बुलडाण्यात शिंदेसेनेचे खासदार आहेत. तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या व सध्या भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष नवनीत राणा अमरावतीच्या खासदार आहेत. त्यामुळे या जागा तिन्ही पक्षही सोडणार नाहीत. त्यावर पर्याय म्हणून बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांनी आमच्या पक्षाकडून अमरावतीती लोकसभा लढवावी, अशी ऑफर दिली आहे. मात्र ती राणे दांपत्य स्वीकारतील असे वाटत नाही. नवनीत राणे पती रवी राणा (Ravi Rana) हेही अमरावती जिल्ह्यात अपक्ष आमदार आहेत.
राणांचा कल भाजपकडे
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ‘हनुमान चालीसा’चे मोठे आंदोलन करुन नवनीत राणा यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या आगामी लोकसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावरच लढवतील अशी शक्यता वर्तवली जात असताना बच्चू कडू यांनी मध्येच ही ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
१० जानेवारीनंतर कडू यांची भूमिका होईल स्पष्ट
१एकूणच, आपल्याच सरकारविरोधात वारंवार भूमिका घेणारे बच्चू कडू आता महायुतीपासून विभक्त होण्याच्या मार्गावर दिसत असल्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. उद्या त्यांचा काही निर्णय झाला तर आम्हाला कुणीही गृहित धरु नये, असे सांकेतिक वक्तव्य त्यांनी चार दिवसांपूर्वीच केले होते. त्यामुळे १० जानेवारी रोजी शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेचा काय निर्णय लागतो ते पाहून बच्चू कडू आपली पुढील भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
राणा-कडू यांच्यात मात्र मतभेद
आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू या अमरावती जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदारांमध्ये मात्र फारसे सख्य नाही. रवी राणा हे नवनीत राणा यांचे पती आहेत. नाेव्हेंबर महिन्यात रवी राणा यांनी बच्चू कडू यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून मध्यस्थी करण्यात आल्याने कडू यांनी नरमाईची भूमिका घेतली होती. हा वाद अजूनही शमलेला नाही. त्यामुळे आमदार कडू यांची ऑफर राणा दांपत्य स्वीकारण्याची शक्यता नाही हे कडू हेही जाणून आहेत.