बीडच्या महायुतीच्या मेळाव्यात मुंडेंच्या फोटोचा विसर; खा. प्रितम मुंडेंनी सुनावले

बीड : शिवसेना- भाजप व इतर मित्रपक्षांचा संयुक्त मेळावा १४ जानेवारी रोजी बीडमध्ये झाला. यावेळी भाजपच्या विद्यमान खासदार प्रितम मुंडे (pritam munde)  यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र दुसरीकडे व्यासपीठावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर मात्र दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath munde) यांचा फोटो नसल्याने मुंडे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे आयोजकांना एेनवेळी गोपीनाथ मुंडे (Gopinath munde) यांचे स्वतंत्र पोस्टर आणून चिकटवण्यासाठी धावपळ करावी लागली.

स्वत: खासदार डॉ. प्रितम मुंडे (pritam munde) यांनीही याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ‘आपला नेता हयात असताना त्यांचा फोटो लावला की नाही यासाठी कुणीही आंदोलने करतात. ते शायनिंग मारण्यासाठी असू शकते. मात्र आपला नेता हयात नसला तरी त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी इथे आवाज उठवला त्यांचा सन्मान व्हावा म्हणून मी आज हा विषय बोलत आहे. ‘यापुढे मुंडे साहेबांचा फोटो वगळून भाजपचा कुठेही कार्यक्रम झाला तर आम्ही ते सहन करणार नाही. ज्या मुंडे साहेबांच्या (Gopinath munde) नावाशिवाय आजही महाराष्ट्रातील एकही मोठी राजकीय घडामोड होत नाही त्यांचा फोटो प्रोटोकॉलच्या नावाखाली कुणालाही टाळता येणार नाही,’ असा इशाराच प्रितम मुंडे (pritam munde)   यांनी भाजपला दिला.

अमरसिंह पंडितांवर रोष

बीडचा मेळावा आयोजनाची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यावर होती. त्यामुळे व्यासपीठावरील फलकावर गोपीनाथ मुंडेंचा (Gopinath munde) फोटो नसल्याने कार्यकर्त्यांनी पंडित यांच्यावर रोष व्यक्त केला. मात्र प्रदेश भाजपकडून आलेल्या पोस्टरवर हा फोटो नसल्याचे सांगून आयोजकांनी त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातील फलकावर मात्र मुंडेंचा फोटो होता. याचा अर्थ बीडच्या मेळाव्यातील पोस्टरवरुन जाणीवपूर्वक फोटो डावलण्यात आला का? अशी शंका उपस्थित होत आहे. अखेर राष्ट्रवादीचेच नेते व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde)  यांना ‘एकवेळ माझे फोटो नाही लावले तरी चालतील पण गोपीनाथ मुंडे साहेबांचे फोटो विसरू नका,’ असा सल्ला आपल्या समर्थकांना द्यावा लागला. तसेच प्रितम मुंडे यांना देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणाही त्यांनी केली.

भाजपच्या तीन आमदारांची दांडी

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या शक्तीप्रदर्शनासाठी हा मेळावा होता. मात्र बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार लक्ष्मण पवार (गेवराई,), नमिता मुंदडा (अंबाजोगाई) व सुरेश धस (आष्टी) या तिघांनीही महायुतीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics