भाजप राज्यसभा खासदारांना उतरवणार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली : देशात ४०० हून अधिक व महाराष्ट्रात ४५ लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रणनितीचा प्रयोग केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजप हायकमांडने घेतला आहे. त्यात महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे.


प्रकाश जावडेकर, नारायण राणे, पीयुष गोयल, विनय सहस्रबुद्धे, धनंजय महाडिक, अनिल बोंडे, डॉ. भागवत कराड हे महाराष्ट्रातील भाजप नेते राज्यसभेवर गेलेले आहेत. त्यात नारायण राणे, पीयूष गोयल व डॉ. भागवत कराड हे केंद्रात मंत्रिपदावर आहेत. त्यांना प्राधान्याने लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. नारायण राणे (Narayan Rane)  सिंधुदुर्ग मतदारसंघातून तर डॉ.z भागवत कराड (Bhagwat karad) यांची छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. प्रकाश जावडेकर (prakash jawadekar), विनय सहस्त्रबुद्धे व पीयूष गोयल (piyush goyal) हे ज्येष्ठ नेेते असले तरी ते मासलीडर नाहीत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याची ‘रिस्क’ घ्यावी असे प्रदेश भाजपला वाटत नाही.

अमरावतीतून विधानसभेला पराभूत झालेले व आता राज्यसभेवर गेलेले अनिल बोंडे (Anil bonde) हे आतापर्यंत लोकांमधून निवडून आलेले आहेत. मात्र अमरावती या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा (navneet Rana) या महायुतीच्या घटकपक्षात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच अप्रत्यक्षपणे त्यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे राणा यांना डावलून बोंडे यांना तिथे उमेदवारी देणे शक्य नाही. अमरावतीच्या शेजारच्या अकोला मतदारसंघ सध्या भाजपकडेच आहे. तेथील चारवेळचे भाजप खासदार संजय धोत्रे अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यामुळे यावेळी ते निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे. अशा वेळी या मतदारसंघातून बोंडे यांना पक्ष रिंगणात उतरवू शकतो. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा तगडा उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने तिथे भाजप बाहेरचा उमेदवार लादण्याचा धोका पत्कारेल का? बोंडे यांना स्थानिक भाजपचे पदाधिकारी स्वीकारतील का? असाही प्रश्न आहे.

राष्ट्रवादीतून आलेले धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे आहेत. सध्या महायुतीत हा मतदारसंघ शिंदे सेनेकडे आहे. शिवसेनेचे धैर्यशील माने इथून निवडून आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यापैकी दुसऱ्या मतदारसंघात हातकणंगले येथून शिवसेनेचे धैर्यशील माने खासदार आहेत. त्यामुळे या दोनपैकी एक जागा शिवसेनेकडून काढून भाजपकडे घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसे झाल्यास कोल्हापूर मतदारसंघातून भाजप महाडिक यांना रिंगणात उतरवू शकते.