सत्तेच्या नादात आमचे विचारधारेकडे दुर्लक्ष झाले : जयंत पाटील यांची जाहीर कबुली
शिर्डी : शरद पवार (sharad Pawar) यांनी एका विचाराने राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. मात्र आमचा पक्ष जास्त काळ सत्तेत राहिल्यामुळे आमचे विचारांकडे कमी आणि सत्तेकडे जास्त लक्ष राहिले. याच विचाराने काही लोक दुसऱ्या विचाराकडे गेले. मात्र यापुढे आपल्याला पवार साहेबांनी दिलेल्या विचारांवरच पक्ष पुढे न्यायचा आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले.
शरद पवार (sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर गुरुवारपासून शिर्डीत सुरु झाले. ‘ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची’ हे ब्रीद वाक्य घेऊन हा शिबिराला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘ज्या विचारासाठी आपण राजकारण करतो तो विचार राज्यभर पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.
कोल्हे, डरने का नही
शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काही ठिकाणी आपण काढला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खासदार अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) आंदोलनाला तर शिरुर मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्या अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवले त्या कोल्हेंना पाडण्याचा विडा काही जणांनी उचलला आहे. मात्र घाबरु नका, कोल्हेजी संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी आहे. जनता तुमच्या पाठीशी आहे.
कायम पवारांसोबत राहू
पवार साहेबांनी वैचारिक भावनेने आपला पक्ष निर्माण केला. पण फार काळ आम्ही सत्तेत राहिल्यामुळे आमचे विचाराकडे दुर्लक्ष झाले व सत्तेकडे जास्त लक्ष गेले. सत्तेत असताना विचारावर जोर देण्याची भावना फार कमी राहिली. त्यामुळे आपले विचार काय आहेत हा विचार न करता काही लोक दुसऱ्या विचाराकडे गेले, अशी टीका त्यांनी अजित पवार व बंडखोर नेत्यांवर केली.
आपण मात्र पवार साहेबांसोबत कायम राहणार आहेत. महागाई, बेरोजगारीवर आपण सरकारला जाब विचारु. जनता सूज्ञ आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे,’ अशी अपेक्षा जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली.