मुंबई : राज्यात सत्तेवर असलेले भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात सारे काही आलबेल असल्याचे दाखवण्यासाठी या तिन्ही पक्षांचे नेते १४ जानेवारीपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त मेळावे घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मेळाव्यातून वातावरण निर्मिती केली जाईल. तसेच त्यानंतर बूथनिहाय मेळावेही घेतले जातील.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (sunil Tatkare) आाणि शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी बुधवारी मुंबईत संयुक्त् पत्रकार परिषद घेऊन मेळाव्यांबाबत माहिती दिली
खासदार सुनील तटकरे म्ह्णाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी १० वर्षांपासून भारताची प्रतिमा देशात उंचावत आहेत. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो आहोत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार काम करत आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यापासूनच सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे आम्ही घेणार आहोत. किमान एक हजार कार्यकर्ते या शिबिरात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पण लोकांचा उत्साह पाहता जास्त संख्येने लोक येऊ शकतात.
शिवसेनेचे नेते दादा भुसे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या नेतृत्वात देशात व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fandanvis), अजित पवार(Ajit pawar) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लोकहिताचे निर्णय घेतले जात आहेत. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जिल्हानिहाय मेळावे घेणार आहोत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आगामी निवडणुका आम्ही ताकदीने लढू. राज्यात ४५ हून अधिक खासदार निवडून आणू. मराठा, ओबीसींसह सर्व समाज असा संपूर्ण महाराष्ट्र महायुतीच्या पाठिशी आहे, असा दावा त्यांनी केला.
जागा वाटपावर मौन
लोकसभा निवडणुकीची तयारी महायुतीतील तिन्ही पक्षांनी सुरु केली असली तरी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत मात्र तिन्ही पक्षांचे नेते माैन बाळगून आहेत. आमच्या नेत्यांची दिल्लीत चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. एकूणच १० जानेवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाल्यानंतरच जागावाटपावर महायुतीचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जाते.