सुमारे अडीच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीला अखेर महायुती सरकारने आचारसंहिता लागण्याच्या तीन- चार तास आधी मुहूर्त लावला. या १२ रिक्त जागांपैकी ७ जणांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली. उर्वरित ५ जागा विधानसभा निवडणूकीनंतर भरल्या जाणार असल्याचे सांगितले जाते. खरे तर राज्यपालनियुक्त आमदारांमध्ये कला, साहित्य, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करणे अपेक्षित असते. पण या सर्व संकेतांना पायदळी तुडवून सर्वच सत्ताधारी आपल्या सोयीच्या राजकारण्यांची या पदावर वर्णी लावतात. महायुती सरकारनेही तेच केले. पण सरकारने नियुक्त केलेल्या ७ नावांपैकी एक नाव सर्वांनाच चकित करणारे आहे. कोण आहेत हे व्यक्तीमत्व, त्यांना आमदारकी देण्यामागचे काय आहे कारण?
महाविकास आघाडीचीही झाली होती कोंडी..
महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला होता. तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारने पाठवलेल्या आमदारांच्या यादीला ब्रेक लावून महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली होती. मात्र नंतर राज्यात सत्ताबदल झाला तरी महायुती सरकारनेही या १२ आमदारांची नियुक्त केली नव्हती. दरम्यानच्या काळात हे प्रकरण कोर्टातही गेल्याने सरकारला नियुक्त्या लांबवण्यासाठी कारणच सापडले होते. मात्र आता निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकारने झटपट ७ जणांची नियुक्ती करण्याचा आदेश काढला. यात भाजपकडून विक्रांत पाटील, चित्रा वाघ, शिंदेसेनेकडून हेमंत पाटील, मनीषा कायंदे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ व इद्रिस नाईकवाडी यांची वर्णी लावण्यात आली. यात भाजपच्या कोट्यातून वर्णी लागलेले सातवे नाव एेकून मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विदर्भातील बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज असे हे नाव आहे.
अन् मोदींशी भेट झाल्याचा फायदा?
राजकारण्यांच्या गदारोळात या महाराजांना आमदारकीची लॉटरी कशी काय लागली? हा प्रश्न सर्वांनाच पडला. अर्थात यामागे मतांचे गणित असणार याविषयी कुणालाही शंका नव्हती. वाशिम, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांसह विदर्भात बंजारा समाजाची मोठी संख्या आहे. लोकसभा निवडणुकीत या भागात भाजपला मोठा फटका बसला. आता विधानसभेला या तीन जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपने त्यांच्याच धर्मगुरुला आमदारकी बहाल केली, असा निष्कर्ष राजकीय विश्लेषकांकडून काढला जात आहे. महंत बाबुसिंग महाराज राठोड हे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी मठाचे पीठाधिश आहेत. ६३ वर्षीय बाबुसिंग महाराज यांनी बीए पर्यंत शिक्षण घेतलं आहे. महंत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधी नंतर त्यांची पोहरादेवी शक्ती पिठाचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑक्टोबर रोजी पाेहरादेवी तीर्थक्षेत्राला भेट दिली होती. त्यांच्या हस्ते येथील भव्य नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पणही झाले होते. यावेळी मोदी यांची महंत पिठाधिश बाबुसिंग महाराजांची भेट झाली होती. महंतांच्या नियुक्तीमागे मोदींशी झालेल्या भेटीचे कारणही सांगितले जाते. काही लोकांच्या मते हा निव्वळ योगायोग आहे.
महंतांच्या नियुक्तीचा फायदा होणार का?
आमदारकी मिळाल्याने आनंद व्यक्त करताना महंत बाबुसिंग महाराज म्हणाले, ‘आमदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्व बंजारा समाज महाराष्ट्रातील सरकारचा ऋणी आहे. माझ्या नियुक्तीमुळे डॉ. रामराव महाराजांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झाले. आमच्या सर्व बंजारा समाजाला न्याय मिळाला. आता या आमदारकीच्या माध्यमातून बंजारा समाजासाठी तन -मन -धनाने कार्य करणार असल्याचा शब्दही महंतांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर दिला. आता खरंच महंतांच्या नियुक्तीचा महायुतीला फायदा होतो का? बंजारा समाज भरभरुन युतीच्या पारड्यात मतदान टाकतो का? ते २३ नोव्हेंबरला विधानसभेच्या निकालातूनच कळेल.