जरांगेंकडून मराठा- मुस्लिम राजकीय युतीचा प्रयोग

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी गेली १४ महिने लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता अागामी विधानसभा निवडणूकीत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. ते खरेच उमेदवार उभे करतील की लोकसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीला पाडण्याचे काम करतील, याबद्दल अजूनही संभ्रम आहे. पण महाराष्ट्रात मराठा व मुस्लिम या दोन जाती- धर्मांच्या लोकांचे संघटन करुन एक नवी राजकीय शक्ती उदयाला आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काय आहेत या मागचे राजकारण..

निवडणूक मैदानात उतरण्यास समर्थन…

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही मागणी मान्य होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पाडायचे की लढायचे हे ठरवण्यासाठी नुकताच आंतरवली सराटी गावात इच्छूकांचा मेळावा घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाजबांधवांशीही खुलेपणाने चर्चा केली. यात बहुतांश समाज बांधव निवडणूका लढण्याच्या भूमिकेचे समर्थन करत होते. यापूर्वी जरांगेंनी केलेल्या आवाहनानुसार त्यांच्याकडे आतापर्यंत राज्यभरातील ७ ते ८ हजार इच्छूक उमेदवारांचे अर्जही आले आहेत. यातील काही निवडक उमेदवारांशी जरांगे यांनी वन टू वन चर्चाही केली. परंतु एका समाजाच्या ताकदीने संपूर्ण राज्य जिंकता येत नसल्याची जाणीव जरांगे यांना आहे. परवाचा मेळाव्यात त्यांनी ही लोकांसमोर बोलूनही दाखवली. म्हणूनच आता इतर समाजाचे लोक, त्यांची ताकदही आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले आहेत.

मुस्लिम समाजाशी हा‍तमिळवणीचा प्रयत्न?

ओबीसी वर्ग मराठा समाजासोबत असल्याचे जरांगे सांगतात. पण त्यात फारसे तथ्य नाही. कारण ओबीसीतून जरांगे आरक्षण मागत आहेत. त्यांना हे आरक्षण दिले तर आपल्या हक्काच्या आरक्षणात अजून एक मोठा वाटेकरी वाढेल, अशी भीती ओबीसींना वाटतेय. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाज, संघटना जरांगेंच्या विरोधात आहेत. मग इतर समाजातून कोणकोणत्या जातींना आपले करता येईल, याची चाचपणी जरांगे करु लागले आहेत. धनगर समाज, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला आहे. परंतु धनगर समाजही पूर्णपणे जरांगेंच्या पाठीशी नाही. त्यांचा कल ओबीसींकडे जास्त दिसतो. त्यामुळे मग मनोज जरांगे पाटील यांनी आता मुस्लिम समाजाशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

मुस्लिम व मराठा समाजाची ताकद एकत्र होणार?

या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातून आलेले धर्मगुरु तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमाणी यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगरात भेट घेतली. नोमाणी हेही जरांगे यांना भेटण्यास उत्सुक होते. महाराष्ट्रात मुस्लिम व मराठा समाजाची ताकद एकत्र करण्यासंदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या दोघांनीही नंतर या संदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. मनोज जरांगे म्हणतात, ‘गोरगरीब मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसी यांना न्याय देण्याची गरज आहे. माणुसकी जिवंत ठेवून या गरीबांना न्याय देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. माझ्या धर्माबद्दल मला अभिमान आहेच. पण आम्ही धर्मपरिवर्तनासाठी नव्हे तर सत्तापरिवर्तनासाठी एकत्र येण्याबाबत चर्चा करत आहोत. सामाजिक न्यायासाठी जाती- धर्माच्या भिंती बाजूला ठेवाव्या लागतील, असे आम्हाला वाटते. आता आमचा हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. नोमाणी हे राज्यातील इतर मुस्लिम धर्मगुरुंशी बोलून पुढच्या वाटचालीबाबत आम्हाला कळवतील.’

नोमाणींकडून विश्वास व्यक्त…

या भेटीबद्दल नोमाणी यांनीही पुष्टी दिली. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रात मराठा व मुस्लिम समाजात चांगले संबंध आहेत. मराठा, दलित, मुस्लिम यांनी सामाजिक एकता, बंधुभाव वाढवण्यासाठी एकत्र यायला हवे. मी जरांगेंविषयी खूप एेकले होते. म्हणून त्यांची भेट घेतली. आमच्यातील चर्चेतून असे वाटते की मराठा, मुस्लिम व दलित हे एकत्र येतील. एक चांगली सामाजिक एकता निर्माण होईल. पण राजकीय दृष्टीकोनातून या कडे पाहात नाही तर सामाजिक दृष्टीकोनातून पाहतोय. पण याचा राजकारणावरही चांगला परिणाम घडू शकेल,’ असा विश्वास नोमाणी यांनी व्यक्त केला. एकूणच नोमाणी व जरांगे यांच्या भेटीतून महाराष्ट्रात मुस्लिम व मराठा एकत्रिकरणाचा नवा प्रयोग अस्तित्वात येऊ शकतो, अशी चर्चा होऊ लागली आहे.

मराठा-मुस्लिम एकीकरणाचे समीकरण जुळणार का?

२०१९ मध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही वंचित घटक, दलित व मुस्लिम यांना एकत्र आणून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली होती. त्यात दलित व मुस्लिम संघटना, पक्ष सहभागी झाले होते. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने अनेक मतदारसंघात १ ते ३ लाखांपर्यंत मते घेतली. त्यांचा एक खासदार एमआयएम पक्षातर्फे निवडूनही आला. मात्र नंतर अॅड. आंबेडकर व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांच्यात काहीतरी बिनसल्याने सहा महिन्यातच या आघाडीची फाटाफूट झाली. त्यामुळे हे समीकरण जास्त काळ चालले नव्हते. आता बघू या मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने येऊ घातलेले हे मराठा- मुस्लिम एकीकरणाचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात ते… या नव्या समीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा