आता शिंदेंचे एकच मिशन, पाच पराभूतांचे पुनर्वसन

अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करुन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ५७ आमदार निवडून आणत खरी शिवसेना आपलीच असल्याचे सिद्ध केले. भाजपच्या साथीने हिंदुत्ववादी विचारांवर पुढे जात असल्याचा शिंदेंचा दावा मतदारांनीही मान्य केला. त्यामुळे शिंदेंसोबत बंड करणाऱ्या बहुतांश आमदारांना जनतेने पुन्हा निवडून दिले. पण ५ आमदारांना मात्र तेथील जनतेने नाकारले. त्याची कारणे वेगवेगळी असतील, पण आता पुन्हा आपला पक्ष सत्तेत अालेला असताना एकनाथ शिंदे यांनी अापलेही चांगल्या रितीने पुनर्वसन करावे, अशी अपेक्षा या ५ पराभूत उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

अन्यथा गावाकडील शेती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन..!

दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्रिपदाचा कारभार करताना तरी त्यांनी आपली ही ओळख सिद्ध करुन दाखवलीय. २०२२ मध्ये आपल्यासोबत बंड करुन गुवाहटीला गेलेल्या सर्व आमदारांना भरीव विकास निधी, मंत्रिपदे व विविध पदांचे लाभ देण्याचे काम शिंदेंनी केले. आपल्यावर विश्वास ठेऊन जे शिवसेनेचे ४० आमदार सोबत आलेत, त्यापैकी एकाचाही पराभव होऊ देणार नाही. तसे झाले तर गावाकडे जाऊ शेती करेल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत केली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्याला साथ देणाऱ्या सर्व ४० आमदारांना तिकिटे देऊन निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या निवडणुकीत शिंदेंचे ४० हून अधिक म्हणजे ५७ आमदार निवडून आले. म्हणजे शिंदेंच्या प्रयत्नांना यश आले, त्यांच्या नेतृत्वाला जनतेनेही साथ दिली हे सिद्ध झाले. पण या भरीव यशातही शिंदेंचे ५ आमदार मात्र पराभूत झाले.

ि
उमरग्याचे पराभूत उमेदवार ज्ञानराज चौगुले

पाचही पराभूत आमदारांचे पुनर्वसन होणार?

मराठवाड्यातील उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शहाजी पाटील, विदर्भातील मेहकरचे संजय रायमुलकर, मुंबईतील माहिमचे सदा सरवणकर आणि भायखळ्याच्या यामिनी जाधव या शिंदेेसेनेच्या आमदारांचा पराभव झाला. मग आता शिंदे खरंच राजकारण सोडून शेती करायला दरे गावात जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. पण शिंदेंनी पूर्वी केलेली घोषणा या झाल्या बोलायच्या गोष्टी. त्यांनी ५७ आमदारांचे जे भरीव यश मिळवले आहे त्यापुढे या ५ आमदारांचा पराभव फार मोठे अपयश नाही.

सांगोल्याचे पराभूत उमेदवार शहाजी बापू पाटील

कदाचित स्थानिक पातळीवरील काही चुकलेली गणिते व या आमदारांची अकार्यक्षमताही या पराभवास कारणीभूत असू शकेल. पण या नेत्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हा शब्द मात्र आपण खरा करणार असल्याचा पुनरुच्चार शिंदेंकडून करण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर पराभूत उमेदवारांची शिंदे यांनी अापल्या बंगल्यावर बैठक घेतली. त्यांना धीर दिला. खचून जाऊ नका, सत्ता आपलीच आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी अजूनही बळ देणार आहे. जिथे शक्य आहे तिथे पुनर्वसन केले जाईल. आगामी मनपा, नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत जोमाने कामाला लागा. विकास निधीची कमतरता पडू देणार नाही, अशा शब्दात शिंदेंनी धीर दिल्यामुळे आता या पराभूत उमेदवारांचेही मनोबल वाढले आहे. सर्वच पराभूतांचे पुनर्वसन करणे शक्य नसले ती पाच पराभूत आमदारांचे मात्र लवकरात लवकर शिंदे पुनर्वसन करतील असे संकेत दिले जात आहेत. या पाचही पराभूत आमदारांनाही तसा विश्वास आहे.

मेहकरचे पराभूत उमेदवार संजय रायमुलकर

शिंदे आपल्या नेत्यांना वाऱ्यावर सोडत नाहीत, याचा अनुभव काही नेत्यांना लोकसभेनंतर आलेलाच आहे. त्याचीच उदाहरणे ही नेतेमंडळी देत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यावेळी भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणात शिंदेसेनेबाबत जनतेत नकारात्मक वातावरण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शिंदेंनी ५ खासदारांचे तिकिट कापून तिथे नवे उमेदवार द्यावेत, यासाठी भाजपने दबाव वाढवला होता. त्यानुसार शिंदेंना मुंबईतून गजानन किर्तीकर, यवतमाळमधून भावना गवळी, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून कृपाल तुमाने यांची तिकिटे कापावी लागली होती. नाशिकमधून हेमंत गोडसे यांचे तिकिट कापण्यासाठीही भाजपचा दबाव होता, पण तो झुगारुन शिंदेंनी गोडसेंची उमेदवारी कायम ठेवली हाेती.

माहिमचे पराभूत उमेदवार सदा सरवणकर

जिथे उमेदवार बदलले तिथेही महायुतीला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलाची व आपल्या नेत्यांवर केलेल्या अन्यायाची चूक शिंदेंच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने या नेत्यांच्या पुनर्वसनावर भर दिला. यापैकी भावना गवळी, कृपाल तुमाने व हेमंत पाटील यांना विधान परिषदेवर घेत पुन्हा आमदार केले. त्यामुळे आता विधानसभेत जे पाच आमदार पराभूत झाले त्यांचेही शिंदे लवकरच पुनर्वसन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिंदेसेनेचे विधान परिषद आमशा पाडवी हे आता विधानसभेत जिंकून आले आहेत, त्यामुळे त्यांची एक जागा रिकामी हेाणार आहे. त्या जागेवर या पराभूत उमेदवारांपैकी एकाची वर्णी लागू शकते.

विशेषत: मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिमचे पराभूत आमदार सदा सरवरणकर यांना प्राधान्याने ही संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. उर्वरित चार आमदारांना महामंडळे किंवा इतर लाभाच्या पदावर नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. पण काहीही झाले तरी पाचही जणांचे पुनर्वसन करुन आपल्याला साथ देणाऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडत नाही, असा संदेश एकनाथ शिंदे पक्ष कार्यकर्त्यांत देतील, हे मात्र तितकेच खरे.

भायखळ्याच्या पराभूत उमेदवार यामिनी जाधव