खंडणीखोर वाल्मीक कराडला सरपंच संतोष देशमुखच्या खून प्रकरणातही आरोपी करा, त्याच्यासह इतर ४ फरार आरोपींना तातडीने अटक करा या मागणीसाठी बीड जिल्हयात जनक्षोभ उफाळून आला आहे. नुकत्याच निघालेल्या एका मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा माणूस असलेल्या वाल्मीकला तातडीने अटक केली नाही तर राज्यभर मोर्चे काढण्याचा इशाराही या मोर्चातून भाजप आमदारांनी दिला होता. या घटनांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे वाल्मीक कराडच्या अटकेसाठी सरकारमधूनच धनंजय मुंडे यांच्यावरही दबाव वाढवला जात होता. अखेर यातून सुटका होणार नाही हे लक्षात आल्यामुळे व धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद वाचवण्यासाठीच वाल्मीक पोलिसांना शरण आला असे सांगितले जाते. काय आहे या मागचे राजकारण.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
अखेर वाल्मीक कराड शरण…
केज तालुक्यातील आवाद कंपनीच्या मॅनेजरला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणात वाल्मीक कराडवर ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. खरे तर ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली होती, त्याची तक्रार मॅनेजरने दिली पण पोलिसांनी नेहमीप्रमाणे ती गांभीर्याने घेतली नव्हती. पण ९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोेष देशमुखची हत्या झाली व त्या प्रकरणात वाल्मीक कराडच्या नावावर संशय व्यक्त होत असल्याने पोलिसांना नाईलाजाने वाल्मीकवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा लागला. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे २० दिवस वाल्मीक फरार होता. देशमुख खून प्रकरणात आतपर्यंत ३ आरेापी अटक केले असून इतर ४ जण फरार अाहेत. तेही वाल्मीक कराडचेच पंटर असल्याचा आरोप होत आहे. या सर्वांच्या अटकेसाठी पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला. केवळ विरोधी आमदारच नव्हे तर सत्ताधारी भाजपचे आमदारही वाल्मीक कराड व त्याला अभय देणाऱ्या धनंजय मुंडेंवर तुटून पडले. भाजप आमदार सुरेश धस, भाजप आमदार नमिता मुंदडा, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके या सर्वांनी मिळून विधिमंडळात वाल्मीक कराडच्या परळीतील गुंडगिरीचे अनेक किस्से सांगून त्यांच्या दहशतीची भीषणता संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडली.
वाल्मीकला ‘आका’ने शरण येण्यास भाग पाडले?
वाल्मीकच्या गुंडगिरीला बड्या राजकीय नेत्याचे अभय असल्याचे आरोपही वारंवार झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला तरी त्यावर मोक्का नुसार कारवाई करु, अशी ग्वाही दिली होती. तेव्हापासून पोलिसांची यंत्रणाही दबाव झुगारुन कामाला लागली. आरोपींची बँक खाती सील करा, त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करुन सहकार्य न केल्यास त्यांचीही बँक खाती सील करा, गरज पडल्यास कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सोडले. त्यामुळे मग गेल्या दोन- तीन दिवसांत सीआयडीच्या पथकाने कराडशी संंबंधित १०० जणांची चाैकशी केली. कुटुंबीयांना होणारा त्रास, संपत्ती जप्तीचा धाक या कारणामुळे अखेर २० दिवसांनी का होईना वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला.
गेली २० दिवस सीआयडी त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण वाल्मीक सापडत नव्हता. पण आता सुटेकचे सर्व दारे बंद झाल्यामुळे तो शरण आला की त्याला शरण येण्यास त्याच्या ‘आका’ने भाग पाडले असा प्रश्न उपस्थित होत आहे. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखला होऊन वाल्मीक फरार झाल्यानंतरही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याच्याशी असलेले आपले संबंध कधीच लपवले नाहीत. उलट ते कॅमेऱ्यासमोर वाल्मीक माझा निकटवर्तीय असल्याचे अभिमानाने सांगायचे. बीड जिल्ह्यातील दुसऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांनी तर या प्रकरणात कानावर हात ठेऊन ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका घेत हात झटकले होते.
धनंजय मुंडेंच्या अडचणी आता कमी होणार?
मुख्यमंत्र्यांनी मात्र या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातल्यानंतर सर्वात आधी वाल्मीक कराडला शरण येण्यासाठी त्याच्या निकटवर्तीयांवर दबाव वाढावायला सुरुवात केली होती. दुसरीकडे विरोधकही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी करुन सरकारवर दबाव वाढवत होते. जर खंडणीखेार वाल्मीक सापडला नाही तर सरकारवर दबाव वाढत जाईल, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही सातत्याने होत जाईल. यातून नव्यानेच सत्तेवर आलेल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ लागली होती. केवळ विधिमंडळातच नव्हे तर संसदेतही स्थानिक खासदारांनी सरपंच देशमुखांच्या क्रुर हत्येचा विषय मांडला होता. त्यामुळे यात ठोस कारवाई करणे मुख्यमंत्र्यांनाही भाग होते. देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मागणीसाठी सत्ताधारी असूनही भाजप आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर व प्रकाश सोळंके यांनी विषय लावून धरला होता. पण परवा बीडमध्ये जो भव्य मूकमोर्चा काढण्यात आला त्याला चक्क शेजारच्या लातूर जिल्ह्यातील औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवारही हजर हाेते. मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर कोपर्डीप्रमाणे राज्यभर मोर्चे काढू, असा इशारा पवारांनी या मोर्चातून आपल्याच सरकारला दिला होता.
अभिमन्यू पवारांची मोर्चाला उपस्थिती?
अभिमन्यू पवार हे फडणवीस यांचे अतिशय जवळचे आमदार मानले जातात. आमदार होण्यापूर्वी त्यांनी फडणवीसांचे स्वीय्य सहायक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांची मोर्चाला उपस्थिती ही फडणवीस यांच्या संमतीनेच होती, हे लपून राहिले नव्हते. इतकेच नव्हे तर मोर्चानंतर अभिमन्यू पवार यांनी फडणवीस यांची भेट घेऊन जनतेत किती संताप आहे, कराड व त्याच्या बगलबच्च्यांनी किती दादागिरी सुरु केल्याच्या तक्रारी आहेत हे सर्व फडणवीस यांनी सांगितले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वाल्मीकच्या अटकेसाठी फडणवीसांनी कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली. प्रसंगी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चाही सुरु झाली. धनंजय मुंडेचे मंत्रिपद गेले तर वाल्मीकला या अडचणीतून सोडवणार कोण? असा प्रश्नही निर्माण झाला. दुसरीकडे कराड व इतर फरार आरोपींच्या कुटुंबीयांना सीआयडीने चौकशीच्या घेऱ्यात घेतले, त्यांची बँक खाती व संपत्ती सील करण्याची प्रक्रियाही सुरु झाली. अशा चोहोबाजूने घेरले गेल्यानंतर वाल्मीक कराडला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. संपत्ती पेक्षाही धनंजय मुंडेंचे मंत्रिपद धोक्यात आल्यामुळेच तो शरण आला, असे आता सांगण्यात येत आहे.