वाल्मीकचे कारनामे : धनंजय मुंडे तोंड लपवून बसले परळीत

दोन कोटीच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला झालेली अटक, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातही वाल्मीकच्या सहभागाचा संशय व त्याच्या हस्तकांना झालेली अटक.. या सर्व प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आले आहेत. याचे कारण म्हणजे हे आरोपी मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. वाल्मीक कराड तर प्रति धनंजय मुंडे म्हणूनच बीड जिल्ह्यात परिचित आहे. त्याच्या सर्व काळ्या धंद्यांना धनंजय मुंडे यांच्याकडून अभय दिले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. हे प्रकरण आता इतके शिगेला पोहोचले आहे की त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. वाल्मीकचे दररोज उघडकीस येणाऱ्या नवनवीन गुन्ह्यांमुळे मुंडेंचा पाय खोलात चालला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंना परळीत जाऊन बसण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच महायुतीच्या सर्व मंत्री व आमदारांशी संवाद साधला, तिथेही धनंजय मुंडे येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली होती. कॅबिनेटची बैठक, शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरापासूनही मुंडेंना दूर ठेवण्यात आले आहे. एकूणच राज्य पातळीवर इतक्या महत्त्वाच्या घडामोडी सुरू असताना मुंडे यांना परळीत तोंड लपून बसण्याची वेळ का आलीय.. ? जाणून घेऊ या.. मिशन पॉलिटिक्समधून

धनंजय मुंडेंचा राजीनाम्यास थेट नकार…

वाल्मीक कराडच्या गुन्हेगारी कारवायांमुळे मंत्री धनंजय मुंडे पुरते अडचणीत आले आहेत. मात्र वाल्मीकच्या वाढत्या गुन्हेगारीला आतापर्यंत अभयही मुंडेच देत आल्यामुळे तेच या गोष्टीला जबाबदार आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परळीतील आवादा पवनचक्की कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मीक २० दिवस फरार होता. त्याला पळून जाण्यात किंवा आश्रय देण्यास धनंजय मुंडेंचा हात होता, असा आरोप विरोधकांकडून केला जात अाहे. आता तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याच्या सहभागाचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. वाल्मीक हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे स्वत: मुंडेही मान्य करतात. ‘ज्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही असा वाल्मीक कराड’ असे बिरुद स्वत: कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी अभिमानाने ज्याच्या नावापुढे लावले होते, तो वाल्मीक. परळीत असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाचा पूर्ण ताबा वाल्मीककडे असायचा हे जगजाहीर आहे. त्यामुळे आता जसजशा वाल्मीकच्या गुन्हेगारी कारवाया उघड होत आहेत तसतसे त्यात धनंजय मुंडेंचा काही संबंध आहे का? हे शोधले जात आहे. राज्य पातळीवर तर विरोधी पक्षांनीच नव्हे तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मुंडे यांच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. या वाल्मीक प्रकरणात मुंडे इतके अडकले आहेत की त्यांनी नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा द्यावा, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पण आपल्या या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत मुंडे मात्र राजीनामा देणार नसल्याचे सांगत आहेत.

फडणवीस आणि अजित दादांमध्ये दुही निर्माण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे राज्यभर गाजत असलेले प्रकरण गांभीर्याने घेऊन धनंजय मुंडेंनी काही काळापुरते का होईना मंत्रिपदापासून दूर व्हावे, अशी सूचना केली आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मुंडेंचा राजीनामा घेण्यास तयार नाहीत. विरोधकांच्या दबावापुढे आपण झुकलो तर उद्या ते आपल्याला आणखी त्रास देतील. धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे तो राजीनामा देणार नाही, असे अजित पवारांनी फडणवीस यांना सुनावले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर फडणवीस व अजित पवार यांच्यातही दुही निर्माण झाली आहे.

वाल्मीकचे समर्थक म्हणजे मुंडेंचेच समर्थक…

एकूणच या प्रकरणामुळे पारदर्शी कारभाराच्या वल्गना करणाऱ्या फडणवीस सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. इच्छा असूनही फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाहीत. कारण त्यांच्यावर मित्रपक्षाचा दबाव आहे. मग अशा परिस्थितीत किमान माध्यमांपासून तरी मुंडेंना दूर ठेवा, सार्वजनिक कार्यक्रमांत तरी त्यांना सहभागी होऊ देऊ नका, ही भाजपची सूचना अजित पवारांनी मान्य केली आहे. त्यामुळेच जेव्हा वाल्मीकला मकोका लावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळीत आंदोलन सुरु केले होते, ते शांत करण्याच्या निमित्ताने मंत्री धनंजय मुंडे यांना परळीत पाठवण्यात आले. पण एेन संक्रांतीच्या तोंडावर परळी शहर बंद असताना धनंजय मुंडे मात्र एक दिवस घरातच बसून राहिले. त्यांनी आंदोलकांना शांत करण्याची अजिबात तसदी घेतली नाही. अर्थात वाल्मीकचे समर्थक म्हणजे मुंडेंचेच समर्थक. मुंडेंनी एकदा आवाहन केले असते तर त्यांनी बंद मागे घेऊन एेन सणासुदीच्या काळात होणारे व्यापाऱ्यांचे नुकसान टळले असते. पण कदाचित मुंडेना ते नको होते.

धनंजय मुंडेंना परळीत दादांनी मुद्दामच पाठवले?

पण मुंडेंना परळीत पाठवण्याचा उद्देश केवळ वाल्मीक समर्थकांना शांत करणे नव्हता, तर दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदार, मंत्र्यांशी संवाद साधणार होते, तिथे धनंजय मुंडेंची उपस्थिती नसावी या उद्देशाने त्यांना अजित पवारांनी परळीत पाठवले, अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात देशमुख हत्याप्रकरणी जी राजकीय वादळ उठले आहे त्याची खबर अमित शाह व नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलेलीच आहे. या प्रकरणामुळे आपल्या सरकारची बदनामी होतेय, हे ते जाणून आहेत. त्यामुळे उद्या मोदींनी धनंजय मुंडेंना पाहून जर याविषयी काही विचारले तर अापली पंचाईत होईल, या धास्तीने फडणवीस व अजित पवारांनी मुंडेंना परळीत जाऊन बसण्यास भाग पाडले, असे सांगितले जाते. नंतर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे परळीत घराबाहेर पडले, देवदर्शन घेऊन ते संपर्क कार्यालयात येऊन कामाला लागल्याचे दाखवण्यात आले. पण त्यांनी या काळात कुणाशीही संवाद साधण्याचे मात्र टाळले. ना त्यांनी वाल्मीकबाबत समर्थकांशी काही चर्चा केली ना अडचणीत आलेल्या वाल्मीकच्या कुटुंबाशी संपर्क साधला. या प्रकरणात आपल्यावर जेवढी चिखलफेक झाली तेवढी पुरे आहे, अजून कुठलाही वाद ओढावून घ्यायचा नाही, ही खबरदारी त्यांनी घेतलेली दिसतेय.

मुंडेंच्या पदाचा कराडांनी घेतला गैरफायदा?

इकडे दुसऱ्या दिवशी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यातही हा विषय चर्चेला येणार होताच. त्यामुळे मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित राहणेही टाळून परळीतच मुक्काम ठोकला. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे राईट हॅन्ड, राष्ट्रवादीचे बडे नेते. त्यांच्या पक्षाचे शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन सुरु झाले आहे, मात्र मुंडेंनी आजारपणाचे कारण पुढे करुन तिकडे जाणे टाळले. असे किती दिवस धनंजय मुंडे परळीत तोंड लपवून बसणार आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, भाजपचे आमदार सुरेश धस व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या रोज पुराव्यानिशी नवनवीन आरेाप करुन वाल्मीकच्या गुन्ह्यांचा पाढा वाचत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची त्याने हार्वेस्टर खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रारही पोलिसात दाखल झाली आहे. पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनीही अशाच तक्रारी खासदार सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या आहेत. गेल्या अडीच वर्षात धनंजय मुंडे कृषी मंत्री होते. त्यांच्या पदाचा गैरवापर करुन वाल्मीकने अनेक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली असेही सांगितले जात अाहे.

अजित पवार मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरच ठाम…

या प्रकरणातही आता गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे वाल्मीकची आता सखोल चौकशी होऊन त्याने लोकांची फसवणूक करुन किती कोटींची संपत्ती जमा केली याचाही हिशेब केला जात आहे. कदाचित या प्रकरणात ईडीकडूनही तपास केला जाऊ शकतो. राज्य सरकारने बीडमधील गुंडगिरीची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी न्यायालयीन समितीही नेमली आहे. कदाचित या समितीसमोर मंत्री धनंजय मुंडे यांचीही चौकशी होऊ शकते, कारण मुंडे व कराड हे किती निकटवर्तीय आहेत हे लपून राहिलेले नाही. एकूणच वाल्मीक प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद अडचणीत आले आहे. विराेधी नेतेही याच कारणामुळे हे प्रकरण जास्त तापवत आहेत, हेही तितकेच खरे. मुंडेंनी राजीनामा दिला तर कदािचत हे प्रकरण शांत होऊ शकते. पण अजित पवार व मुंडे राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. तर आमदार सुरेश धस व इतर आंदोलक राजीनामा घेण्यावर ठाम आहेत. या दोन्ही बाजूच्या ताठर भूमिकेमुळे फडणवीस सरकार मात्र पुरते बदनाम हेाऊ लागलेले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनाच कठोर भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसेल, हे मात्र तितकेच खरे.