रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कमालीचा वाद भडकला आहे. शिंदेसेनच्या कार्यकर्त्यांनी अगदी रस्त्यावर उतरुन, टायरची जाळपोळ करत रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरेंच्या नियुक्तीला विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्त या नियुक्तीला स्थगिती देऊन वादावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला असला तरी दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. या वादाचे आता इतरही मुद्द्यांवर पडसाद उमटत आहेत. शिंदेसेनेकडे असलेल्या परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्याने अलिकडेच एसटी भाडेवाढीची घोषणा केली. विशेष म्हणजे एक दिवस आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाडेवाढ होणार नसल्याचे जगजाहीर सांगितलेले असतानाही त्यांच्या नाकावर टिच्चून हा निर्णय घेऊन अजितदादांना तोंडघशी पाडण्यात आले. आता अजित पवारांची राष्ट्रवादी त्याचे उट्टे काढण्याची संधी शोधत आहे. एकूणच महायुतीतील या दोन्ही मित्रपक्षात ‘शत्रूत्वा’चे नगारे वाजू लागले आहेत… त्याचे पडसाद कुठपर्यंत उमटतील, या वादामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची गोची झाली आहे का? याबाबत समजून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
अन् निवडणूका पार पडेपर्यंत सरकार थांबले…
विविध सवलतीच्या योजना, वाढता खर्च व कर्मचाऱ्यांचे पगार या कारणामुळे एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना अर्धे तिकिट जाहीर करुन तोट्याचा खड्डा अजूनच वाढवून घेतला आहे. या योजनेमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याचे दाव महामंडळ करत असले तरी त्यातून तोटा मात्र वाढतोय, हे लपवले जात आहे. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांची वाढीव वेतनाची मागणीही पूर्ण करावी लागल्याने एसटीच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे भाडेवाढ हा एकमेव पर्याय सरकारसमोर होता. पण विधानसभा निवडणुकीआधी हा निर्णय घेतला तर त्याचा फटका मतदानातून बसेल, अशी भीती असल्याने निवडणूका होईपर्यंत सरकार थांबले होते. आता शिंदेसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खाते आले आहे. तर त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते भरतसेठ गोगावले यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. निवडणूकाचे निकाल लागून सरकार सेटल होत नाही तोच या दोन्ही नेत्यांच्या खात्याने १५ टक्के एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला हाेता. त्याची लगोलग अंमलबजावणी करण्याच्या तयारीही सुरू केली होती. त्याची चर्चाही सुरू झाली.
अजितदादा पडले तोंडघशी…
या संदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी भाडेवाढीचा तूर्त अजिबात विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. ‘अजून मंत्रिमंडळापुढे भाडेवाढीचा प्रस्ताव आलेला नाही. एसटीला आधी सगळ्यांना चांगल्या बसेस पुरवण्याच्या दृष्टीने कटाक्षाने प्रयत्न करावा लागेल. जर उद्या काही भाडेवाढ करायची म्हटलं आणि बसेस खराब असतील तर लोक म्हणतील कशाची भाडेवाढ करता आहात. त्यामुळे मी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत चर्चा करू आणि त्यामधून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू,’ असे स्पष्टीकरण देत अजित पवारांनी तूर्त तरी भाडेवाढीचा काहीही निर्णय होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. पण अजित पवारांच्या या भाष्याला २४ तास उलटत नाहीत तोच परिवहन प्राधिकरणाने १५ % भाडेवाढीची घोषणा करुन २५ जानेवारीपासून हा निर्णय लागूही केला. या निर्णयामुळे अजित पवार मात्र चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
अजितदादांनी केली सारवासारव…
पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा अजित पवारांना गाठून विचारले, तेव्हाही त्यांनी अजून भाडेवाढ लागू झाली नसल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात त्या दिवशीच प्रवासी १५ % जादा दराने भाडे भरत होते, हे कदाचित अजित पवारांच्या गावीही नव्हते. अजित पवार म्हणाले, ‘जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन चांगली सुविधा शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना द्यायची आहे. अशी आमची चर्चा सुरू आहे मात्र अंतिम निर्णय अजून झालेला नाही. कारण मुख्यमंत्री पहाटेच परदेशातून आलेले आहेत. हे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घ्यायचे असतात. त्यामुळे त्यांना विचारून पुढचा निर्णय घेण्यात येईल. शेवटी महामंडळ पण व्यवस्थित चाललं पाहिजे आणि जनतेला पण त्रास कमी झाला पाहिजे. असा मध्यमार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे सांगून अजित पवारांनी अजून संभ्रम वाढवलाय. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारणा केली असता ‘आपल्याला तर बुवा याबाबत काहीच माहिती नव्हते,’ अशा अविर्भावात त्यांनी हात वर केले. भाडेवाढीचे अधिकार परिवहन प्राधिकरणाला असतात. त्या सचिवांनी परस्पर निर्णय घेतलाय. तो लागू झाल्यावरच आपल्याला माहिती झाले. अर्थात एखादी संस्था चालवण्यासाठी असे निर्णय घ्यावेच लागतात,’ अशी मखलाशी करुन त्यांनी भाडेवाढीचे एकप्रकारे समर्थनही केले.
भाडेवाढ म्हणजे शिंदेसेनेचा दादांना इशाराच?
एकूणच, एकमेकांना अडचणीच आणण्याची, एकमेकांची कोंडी करण्याची स्पर्धा शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू झाल्याचे यावरुन दिसून येते. तुम्ही रायगडच्या पालकमंत्रिपदाला विरोध केला तर आम्हीही तुम्हाला अडचणीत आणण्याची संधी सोडणार नाही, असा एकप्रकारे इशाराच शिंदेसेनेने अजित पवारांना भाडेवाढीच्या निर्णयातून दिल्याचे मानले जाते. पण गप्प बसतील ते अजित पवार कुठले? हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात नेऊन त्यावर काहीतरी फैसला घ्यायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जर फडणवीसांनीही शिंदेसेनेच्या खात्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला तर उद्या अजित पवारांचे कार्यकर्ते एसटी भाडेवाढीला विरोध करण्यासाठी आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरले नाही तर आश्चर्य वाटायला नको. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी जर शिंदेसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन जाळपोळ करत असतील तर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आमच्याही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर बिघडले कुठे? असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जाऊ शकतो. विशेष म्हणजे जर राष्ट्रवादीने हे आंदोलन हाती घेतले तर सर्वसामान्य जनतेचाही त्यांना पाठिंबा मिळू शकतो.
एकूणच, एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावरुन महायुतीत चांगलेच वातावरण तापलेले आहे. अद्याप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण प्रताप सरनाईकांच्या भूमिकेला त्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता पालकमंत्रिपदाचा वाद व एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावर दोन मित्रपक्षांमध्ये पेटलेल्या या वादावर मुख्यमंत्री काय तोडगा काढतात? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.