एकीकडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी उद्धव सेनेकडून केली जात असताना केंद्रातील मोदी सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्याशी शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ राहिलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पदमभूषण पुरस्कार जाहीर करुन त्यांचा गौरव केला. खरे तर जोशी यांना असा काही पुरस्कार द्यावा, अशी मागणीही कुणी केली नव्हती. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या व उद्धव ठाकरेंकडून दुर्लक्षित करण्यात आलेल्या शिवसैनिकाचा आम्ही सन्मान करतोय, हे दाखवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीवरुन मोदी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. पण या मागचे नेमके राजकारण काय.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
संजय राऊतांचे एकप्रकारे आव्हानच…
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अलिकडेच केंद्र सरकारला पत्र पाठवून बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. या मागणीमागे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणे ही राऊत यांची अपेक्षा होती, पण बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन शिवसेनेवर ताबा मिळवणाऱ्या एकनाथ शिंदेंना अडचणीत आणणे हाही राजकीय हेतू होता. जर तुम्ही खरंच बाळासाहेबांच्या विचारांचे वारस असल्याचे दावे करत असाल तर मग त्यांचा सन्मान करुन दाखवाच, असे एक प्रकारे आव्हानच राऊत यांनी या माध्यमातून एकनाथ शिंदे व भाजपला दिले होते. या विषयावर ठाकरे परिवारातील कुणीही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. एकीकडे ही चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पदम पुरस्कारांची यादी जाहीर केली, त्यात अचानक माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांचे नाव आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. मोदी सरकारने जोशी यांना मरणोत्तर पद्भूषण पुरस्कार जाहीर करुन त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव केला आहे.
आज्ञाधारक शिवसैनिक म्हणून मनोहर जोशींचेच उदाहरण…
१९६७ ते २००४ पर्यंत अशी ३७ वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या मनोहर जोशी यांनी या काळात दोन वेळा मुंबईचे नगरसेवकपद, एकदा महापौर, तीन वेळा विधान परिषद तर दोन वेळा विधानसभेची आमदारकी, एकदा अल्पकाळाचे का होईना विरोधी पक्षनेतेपद, नंतर सुमारे चार वर्षे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री अशी राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली. या नंतर केंद्रीय राजकारणातही त्यांनी योगदान दिले. अटल बिहारी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. या सर्व राजकीय कारकिर्दीमध्ये मनोहर जोशींच्या नावावर अशी कुठलीही भरीव कामगिरी नाही. एक छोट्याशा कुटुंबातून आलेला माणूस थेट लोकसभा अध्यक्षांपर्यंत झेप घेतो, ही त्यांची वैयक्तिक प्रगती नक्कीच होती. पण राज्य किंवा देशाच्या राजकारणात या ३० ते ४० वर्षात ऐतिहासिक निर्णय त्यांच्या नावावर नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत व आज्ञाधारक शिवसैनिक म्हणून त्यांचे उदाहरण केवळ शिवसेनेत नव्हे तर इतर राजकीय पक्षातही आदराने सांगितले जाते.
अन् मनोहर जोशींनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा…
१९९५ ते १९९९ या काळात याच निष्ठावंत शिवसैनिकाचा गौरव म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी जोशींना शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान दिला. अखेरच्या काळात त्यांचे जावायाच्या नावावर काही भूखंड घोटाळ्याची चर्चा झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवलेल्या एका पत्रालाच आदेश मानून जोशींनी एका शब्दाचीही तक्रार न करता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. इतकी त्यांची निष्ठा होती. याच अाज्ञाधारकपणाची पावती म्हणून मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना केंद्रात मंत्री ते थेट लोकसभेचा अध्यक्षही बनवून त्यांचा सन्मान केला होता. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे २०१२ मध्ये निधन झाले, त्यानंतर मात्र जोशी यांचे शिवसेनेतील महत्त्व घटत गेले. तब्येतीच्या कारणावरुन तेही सक्रिय राजकारणापासून थोडेसे दूर गेलेले हाेते. दरम्यानच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली होती, पण त्याला विलंब लागत होता. म्हणून काही शिवसैनिकांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते. या प्रकाराची बरीच चर्चा झाली. त्यावर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते व त्यांच्या वडिलांच्या स्मारकाचा प्रश्न इतका रखडला नसता’ असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. ही टीका उद्धव समर्थकांना खूप झोंबली. त्याचे पडसाद ४८ व्या दसरा मेळाव्यात उमटले.
मनोहर जोशींचा अवमान होत असतानाही उद्धव ठाकरे गप्प का?
बाळासाहेबांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा उद्धव ठाकरेंनीही पुढे नेली. या कार्यक्रमासाठी मनोहर जोशी शिवाजी पार्क मैदानावरील व्यासपीठावर येताच सभेत उपस्थित शिवसैनिकांनी ‘मनोहर जोशी चले जाव’, ‘मनोहर जोशी हाय हाय’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत जोशींना हा पहिलाच अनुभव होता. आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपमानित झालेल्या जोशींनी मग स्टेजवरुन काढता पाय घेतला. यानंतरही जोशी शिवसेनेच्या कार्यक्रमात यायचे, पण मग त्यांचे पूर्वीसारखे मन लागले नाही. बाळासाहेब ठाकरेंशी तहहयात निष्ठा राखलेल्या एका ज्येष्ठ नेत्याचा असा अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का बसले? असा प्रश्न त्यावेळी जुने शिवसैनिक विचारत होते. नंतर एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेत बंड करुन एक गट आपल्यासोबत नेला, त्यानंतर मात्र जोशींच्या अवमानाबद्दल पुन्हा पुन्हा शिंदेगटाकडून जाब विचारला गेला.
शिवसेनेतून बाहेर गेलेले राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे हे शेवटपर्यंत मनोहर जोशींशी चांगले संबंध ठेऊन होते. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी जोशी यांचे निधन झाले. आता त्यांना पद्भूषण पुरस्कार देऊन भाजप व शिंदेसेनेने आम्ही जुन्या शिवसैनिकाचा सन्मान करतो हे दाखवून देत उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला चांगले यश मिळाले. राज्यात शिंदेसेना सत्तेत आली, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह त्यांच्याकडे दिले त्यामुळे खरे बाळासाहेबांचे वारस आम्हीच हे शिंदे सातत्याने सांगत असतात. तर शिंदेंनी आमचा पक्ष व माझा बाप चोरुन नेला, अशी टीका उद्धव ठाकरे सातत्याने करतात.
शिंदेसेना व भाजपची राजकीय खेळी नेमकी काय?
मात्र ज्या उद्धव ठाकरेंसमोर ज्येष्ठ शिवसैनिकाचा अपमान झाला त्याच मनोहर जोशी यासारख्या नेत्याला आम्ही देशाचा सर्वोच्च पद्भूषण पुरस्कार दिलाय, आम्ही केवळ परिवाराचे राजकारण करत नाही तर बाळासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या सच्चा शिवसैनिकाचा गौरव करतो, त्यांच्या पाठीशी उभा राहतो, हा संदेश शिंदेसेना व भाजपने या पुरस्काराचे निमित्ताने जनतेला दिला आहे, असा याचा अर्थ काढला जातो. आता यापुढेही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचे राजकीय भांडवल करताना हे दोन्ही सत्ताधारी या निर्णयाचा फायदा घेणार यात काहीच शंका नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या निर्णयाचा प्रचार करुन आम्हीच सच्च्या शिवसैनिकांचा सन्मान करतो, हे एकनाथ शिंदे व त्यांचे नेते ठासून सांगतील. यातून उद्धव ठाकरेंकडे राहिलेले उरले सुरले शिवसैनिक व हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचून आणण्याची खेळी भाजप व शिंदेसेना करेल, यात शंकाच नाही. अन् उद्या बाळासाहेब ठाकरे यांनाही मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी मोदी सरकारने मान्य केलीच तर शिवसेनाप्रमुखांवरचा राजकीय हक्कही गमावून बसण्याची नामुष्की उद्धव ठाकरेंवर आल्याशिवाय राहणार नाही. असे केल्यास उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करण्याच्या डावपेचातील मोदींचा तो राजकीय मास्टरस्ट्रोक असू शकतो.