‘तुम्ही आमच्या मागे ईडी लावली, तर मी सीडी लावेन’ खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मागच्या वर्षभरात गाजलेला हा डायलॉग प्रत्यक्षात काही आला नाही. भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून खडसे अशी विधानं करायचे, पण ना कधी त्यांच्या मागे ईडी लागली ना कधी त्यांनी सीडी बाहेर काढली, त्यामुळे या बहुचर्चित सीडीत होते तरी काय ? हे गूढ कायमच राहिले. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही शिंदेसेनेचे मंत्री भरतसेठ गोगावले, आमदार महेश थोरवे व महेंद्र दळवी यांना गुवाहटीच्या हॉटेलातील व्हिडिओ बाहेर काढण्याची धमकी दिलीय. नेमकं असे काय ‘प्रताप’ या आमदारांनी त्या हॉटेलात केले, हे जनतेसमोर खरंच येणार आहे का? जाणून घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून
महायुतीत तणावाची परिस्थिती?
रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती सुनील तटकरे यांची निवड झाल्यापासून शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घमासात सुरू आहे. शिंदेसेनेचे भरतसेठ गोगावले यांना या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवे होते. ते न मिळाल्याने शिंदेसेना आक्रमक झालीय. रस्त्यावर उतरुन, टायर जाळून आंदोलन करण्यापर्यंत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही या आंदोलनाला मूकसंमती दिसून आली. त्यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती अाहे. नाशिकमध्येेही गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपदावर नेमल्याने या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व शिंदेसेनेेच नेते दादा भुसे नाराज झाले आहेत. हा वाद आणखी टोकाला जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशात असताना नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर झालेल्या नियुक्त्यांना स्थगिती दिली. दावोसहून परतल्यावरही अजून फडणवीस या वादावर तोडगा काढू शकलेले नाहीत, त्यामुळे शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद चिघळतच चालला आहे.
…अन्यथा गुवाहटीच्या हॉटेलमधील व्हिडिओ बाहेर काढू
अलिकडेच मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांचे वडील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीत गद्दारी करुन शिंदेसेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोटही केला होता. ‘मी रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्यामुळे तटकरेंनी मला पाडण्यासाठी काही लोकांशी हातमिळवणी केली. तसेच आमचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली होती,’ असा आरोप केला. तर सुनील तटकरेंनी भरतसेठ गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळण्यात काही अडचणी आणल्या तर त्यांना रायगड जिल्ह्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा आमदार दळवी यांनी दिला होता.
शिंदेसेनेच्या या नेत्यांची वक्तव्ये राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागली. त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण मैदानात उतरले व त्यांनी शिंदेसेनेच्या आजवर गुपित राहिलेल्या मुद्द्यालाच हात घातला. ‘तुम्ही जर आमच्या नेत्यांना त्रास दिला तर गुवाहटीच्या हॉटेलमधले व आतले व्हिडिओही आम्ही बाहेर काढू’ असा इशाराच चव्हाण यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांना दिला आहे. त्यावर ‘आम्हीही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे म्हणजे सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढू, तसे झो तर त्यांना महाराष्ट्रातच काय देशातही फिरणे मुश्कील होईल’, असे प्रत्त्युत्तर आमदार दळवींनी दिले आहे. एकूण, पालकमंत्रिपदावरुन रंगलेला हा वाद आता इतका टोकाला गेला आहे की त्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांनीही मध्यस्थी केली तरी कुणीही माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून येते. पण, या वादाच्या निमित्ताने एक नवा विषय चर्चेत आला, तो म्हणजे शिंदेसेनेच्या आमदारांनी गुवाहटीच्या हॉटेलात असे नेमके काय केले, जी जे बाहेर काढण्याची धमकी आता त्यांच्याच मित्रपक्षाकडून दिली जात आहे.
हॉटेलात काय गौडबंगाल लपलेले?
२० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पाडून सूरत गाठले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची गुवाहटीच्या हॉटेलात व्यवस्था करण्यात आली होती. भाजपच्या महाशक्तीच्या इशाऱ्यावर हे सर्व कटकारस्थान सुरू होते. इकडे मुंबईत उद्धव ठाकरे सरकार पायउतार होईपर्यंत व पुढे नवीन सरकार स्थापन करण्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थन करणारे सुमारे ५० आमदार गुवाहटीच्या हॉटेलातच आराम करत होते. त्यांच्या सेवेत भाजपचे सध्याचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व इतरही काही नेते होते. पण आतमध्ये काय चालले आहे ते बाहेर कुणालाही कळणार नाही याची व्यवस्था करण्यात आली होती. या आमदारांशिवाय हॉटेलमध्ये एकाही ग्राहकाला प्रवेश दिला जात नव्हता. आतमध्ये आमदारांच्या बैठकीचे एखादे फुटेज दिवसभरात टीव्ही चॅनलला किंवा सोशल मीडियावर उपलब्ध करुन दिले जायचे, बाकी आतमध्ये काय चालले अाहे ते कुणालाच कळत नव्हते. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हे आतले व्हिडिओ जगजाहीर करण्याची धमकी दिल्यामुळे नेमकं त्या हॉटेलात काय गौडबंगाल झाले, नेमकं तिथे हे आमदार काय ‘प्रताप’ करत होते याविषयी शंका निर्माण झाल्या आहेत.
अर्थात राष्ट्रवादीच्या या इशाऱ्यामुळे शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये जशी घबराट निर्माण झाली तशी भाजपमध्येही खळबळ उडाली आहे. याचे कारण म्हणजे या आमदारांना गुवाहटीत नेण्यापासून ते हॉटेलमध्ये सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी महाशक्तीच्या आदेशाने भाजपनेच तर केली होती. अन्यथा गुवाहटीसारख्या राज्यात शिंदेंच्या आमदारांना कोण विचारणार? त्यामुळे जर तेथील हॉटेलत घडलेले काही गोपनीय गौडबंगाल असलेले व्हिडिओ बाहेर आले तर त्यात शिंदेसेनेची तर बदनामी होईलच पण त्यांना सर्व सुखसुविधा पुरवणाऱ्या भाजपचेही नाव यात बदनाम होईल, यात शंकाच नाही.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचेच इशारे?
अर्थात सूरज चव्हाण यांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे नक्कीच नसतील व त्यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्यांकडे असे खळबळजनक व्हिडिओ असतील याबाबतही शंकाच आहे. याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूरज चव्हाण यांच्या तोंडून हे इशारे दिले जात असावेत, अशी शंका घ्यायला वाव आहे. अर्थात जर हे व्हिडिओ राष्ट्रवादीपर्यंत पोहोचले असतील तर गुवाहटी वारीची सर्व व्यवस्था करुन देणाऱ्या भाजपकडेही शिंदेसेनेच्या तेथील कारवायांचे सर्व व्हिडिओ असतीलच यातही शंकाच नाही. म्हणजे आज राष्ट्रवादीला त्रास दिल्यामुळे त्यांच्याकडून शिंदेसेनेला जी धमकी दिली जात आहे, उद्या भाजपलाही शिंदेसेनेने त्रास दिला किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर तेही हाच इलाज करुन शिंदेसेनेला शांत करु शकतात. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे तरी असे काय व्हिडिओ आहेत, ज्याची धमकी देऊन शिंदेसेना त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल असा इशारा देत आहे, तेही समोर येणे गरजेचे आहे.
एकूणच, शिंदेसेनेच्या आमदारांचे गुवाहटीतील व्हिडिओ बाहेर येतील का नाही? याबाबत शंका असली तरी गोपनीय ठेवण्यासारखे त्यांनी तिथे नेमके काय ‘प्रताप’ केलेत याविषयी मात्र जनतेच्या मनात आता शंका- कुशंका निर्माण होण्यास राष्ट्रवादीच्या धमकीमुळे वाव मिळाला आहे. यातून एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांची प्रतिमा मात्र मलिन नक्कीच होईल यात शंकाच नाही. आता पालकमंत्रिपदाचा वाद शिंदेसेनेने जास्तच ताणून धरला तर गुवाहटीतील एखादा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची रिस्कही राष्ट्रवादीच्या माध्यमातून भाजप घेऊन त्यांना शांत करु शकते, असे झाले तरी आश्चर्य वाटायला नको.