दोनदा पराभूत, प्रथमच आमदार तरी रेखा गुप्ता दिल्लीच्या सीएम

२७ वर्षानंतर दिल्लीच्या विधानसभेत सत्ता मिळवलेल्या भाजपने हे ऐतिहासिक यश नारीशक्तीच्या हाती या राज्याची सूत्रे देऊन सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० वर्षीय रेखा गुप्ता या पहिल्यांदाच आमदार झालेल्या महिलेला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपच्या हायकमांडने घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कोण आहेत या रेखा गुप्ता… त्यांचीच निवड का झाली.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून….

भाजपचे दिल्ली जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण…

गेली ११ वर्षांपासून केंद्रात मोदींचे सरकार असले तरी दिल्ली हे राज्य मात्र ‘आम आदमी’च्या ताब्यात होते. ही खंत मोदींना सातत्याने बोचत होती. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना अनेक मोफत योजना दिल्यामुळे राजधानीतील लोकांनी गेल्या ३ निवडणुकात सातत्याने केजरीवाल यांच्या आप पक्षाला निवडून दिले होते. देशातील बहुतांश राज्यांत मोदींच्या नेतृत्वात भाजपने सत्ता मिळवली, पण दिल्ली काही त्यांच्या हाती येत नव्हती. अखेर या निवडणुकीत ७० पैकी ४८ आमदार निवडून आणत भाजपने २७ वर्षानंतर दिल्ली जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. आता यावेळी आम आदमी पक्षाचा पराभव का झाला व भाजपला इतके चमत्कारिक यश कसे मिळाले? याचे विश्लेषण आपण नंतर करु या. पण आता भाजपला एक हाती सत्ता मिळाली तर मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? या विषयी वेगवेगळे तर्क लावले जात होते. मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे एखादा नवा चेहरा देऊन मोदी स्वपक्षीय नेत्यांना धक्का देतील, असे आडाखे बांधले जात होते. मात्र मध्येच महाराष्ट्रात मोदींनी या धक्कातंत्राच्या पॅटर्नला ब्रेक लावून निवडणुकीपूर्वी ज्या चेहऱ्याची राज्यभर चर्चा होती त्याच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावर पुन्हा संधी देऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे दिल्लीत मोदी धक्कातंत्रावर विश्वास ठेवतात की मातब्बर नेतृत्वालाच संधी देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

पहिल्यांदा आमदार अन् थेट मुख्यमंत्रीपदच…

मुख्यमंत्रीपदाकरिता सर्वाधिक चर्चेत नाव होते ते प्रवेश वर्मा यांचे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे ते देशभर चर्चेत आलेच होते. आता त्यांनाच मुख्यमंत्री केले जाईल, अशा अटकळी लावल्या जात हेात्या. जाट समुदयाचे नेतृत्व करणारे वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे सुपूत्र आहेत. म्हणजे त्यांचे घराणे अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठावंत आहे. प्रवेश वर्मा हे दुसऱ्यांदा आमदार झालेत. दोन वेळा खासदारही होते. म्हणजे त्यांना सांसदीय राजकारणाचा चांगला अनुभवही आहे. या कारणामुळे त्यांच्याकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जात होते. पण मोदींनी पुन्हा इथे धक्कातंत्राचा वापर करुन घराणेशाहीला प्राधान्य न देता रेखा गुप्ता या महिलेच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे रेखा या पहिल्यांदा आमदार झाल्या आहेत, लगेच त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दिल्लीतील शालीमारबाग विधानसभा मतदारसंघातून गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या आमदार वंदना कुमारी यांचा सुमारे ३० हजार मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे गेल्या दोन निवडणुकात याच वंदनाकुमारी यांच्याकडून रेखा गुप्तांना पराभव पत्कारावा लागला होता. त्या दोन टर्ममध्ये दिल्लीत आपची हवा होती, म्हणून वंदनाकुमारींना यश मिळत गेले. या वेळी भाजपाची हवा असल्यामुळे गुप्ता विजयी झाल्या व आता तर त्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

विद्यार्थी राजकारणापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत…

हरियाणाच्या जिंद गावात १९ जुलै १९७४ रोजी रेखा गुप्ता यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होते. रेखा दोन वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांची दिल्लीत बदली झाली, तेव्हापासून हे कुटुंब राजधानीत स्थाईक झाले. रेखा यांनी पदवीनंतर एलएलबी, नंतर एमबीए केले. १९९२ मध्ये त्या अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थी राजकारणात अाल्या. १९९५ मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या सचिव व १९९५ मध्ये विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष बनल्या. त्यानंतर सक्रिय राजकारणात उतरल्या. उत्तरी पीतमपुराच्या नगरसेविका बनल्या. २०१० मध्ये भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्याही झाल्या. तेव्हापासून दिल्लीतील राजकारणाच्या वर्तुळात त्यांचे महत्त्वाचे स्थान बनत गेले. आता त्या थेट राज्याचे नेतृत्व करतील. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर महिलेला संधी देण्यामागे मोदी व अमित शाह यांनी जे निकष लावले ते खालीलप्रमाणे असावेत असे पक्षाच्या वर्तुळात बोलले जाते.

आरएसएसने केली रेखा यांच्या नावची शिफरस…

एक म्हणजे… या निवडणुकीत भाजपला महिलांची ४५ % मते मिळाली. २७ वर्षानंतर मिळालेल्या यशात महिलांचाच मोठा वाटा आहे, याची जाणीव असल्याने मोदींनी यंदा महिलेलाच मुख्यमंत्री बनवायचे ठरवले होते. या वेळी दिल्लीत ५ महिला निवडून आल्या आहेत. त्यापैकी चार भाजपच्या आहेत. या चौघींमध्ये घराणेशाहीचा वारसा नसलेल्या उच्चशिक्षित असल्याने रेखा यांना संधी देण्यात आल्याचे मानले जाते. दुसरे कारण म्हणजे, रेखा यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून झाली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीची अभाविपपासून सुरुवात करणाऱ्या रेखा यांचे संघ परिवाराशीही जवळचे नाते आहे. पक्षाशी निष्ठावंत हाही एक निकष त्यांच्या निवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. रेखा गुप्ता या वैश्य समाजातून येतात. यापूर्वीचे तीन वेळेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही वैश्य समाजाचे होते. अर्थात केजरीवाल हे समाजाच्या जोरावर निवडून आले नव्हते, तर कामाच्या जोरावर त्यांना यश मिळत होते. पण केजरीवाल पायउतार झाले तरी पुन्हा वैश्य समाजालाच नेतृत्व देऊन मोदींनी या समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा इतिहास काय सांगतो..?

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान रेखा यांना मिळाला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी सर्वाधिक १५ वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषवले. नंतर एेन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या सुषमा स्वराज्य यांना काही काळासाठी मुख्यमंत्री बनवण्यात आले होते, पण नंतरच्या निवडणुकीत भाजप पराभूत झाली. गेल्या वर्षी दारु घोटाळ्यात अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यामुळे आपने अातिशी यांना मुख्यमंत्री केले. त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या. मात्र त्यांनाही अल्पकाळच हे पद भूषवण्याची संधी मिळाली. आताही आतिशी निवडून आल्या आहेत पक्ष त्यांचा आप पक्ष विरोधी बाकावर गेला अाहे. अन‌् चौथ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान रेखा गुप्ता यांना मिळाला. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले की मुख्यमंत्री हाेण्याचा मान फारच कमी नेत्यांना मिळतो. अगदी अपवादाने मिळतो, असेही म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पण दिल्लीने आतापर्यंत ८ मुख्यमंत्री दिले त्यापैकी ७ नेते हे पहिल्यांदा आमदार झाले की लगेच मुख्यमंत्री झाले होते. रेखा गुप्तांचे नशिबही असेच उजळले आहे. त्यांच्यापूर्वी ब्रह्मप्रकाश, गुरमुख निहालसिंह, मदनलाल खुराणा, साहिबसिंह वर्मा, शीला दीक्षित, अरविंद केजरीवाल आणि आतिशी हे सात नेते पहिल्यांदा आमदार होताच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले हाेते. फक्त सुषमा स्वराज अपवाद होत्या. त्या खासदार असताना मुख्यमंत्री बनल्या होत्या. दिल्लीसारख्या छोट्या राज्याने आतापर्यंत ८ पैकी चार महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विक्रम केलाय. स्वत:ला पुरोगामी राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राने मात्र गेल्या ६० वर्षात एकाही महिलेला मुख्यमंत्रिपदावर संधी दिली नाही, ही खंत मात्र आहेच.