प्रचंड बहुमताने सत्तेवर येऊनही देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अजूनही जनमाणसाच्या मनात सकारात्मक स्थान निर्माण करु शकलेले नाही. मुळात पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी फडणवीस यांनीच जो मार्ग पत्कारला, ज्या नकोशा लोकांना सोबत घेतले तेच लोक आज फडणवीस सरकारच्या मुळावर उठले आहेत. ज्या अजित पवारांना महायुतीत घेण्यास भाजपचे कार्यकर्ते व भाजपप्रेमी मतदारांचा विरोध हेाता, तो झुगारुन भाजप हायकमांडने ही अभद्र युती केली. आता त्याचे परिणाम फडणवीस सरकारला भोगावे लागत आहेत. सुरुवातीच्या दोनच महिन्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचे कारनामे उघडकीस आले असून त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. हे दोन्ही मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. तरीही फडणवीस मात्र या दोघांची पाठराखण करत असल्यामुळे केवळ सरकारच नव्हे तर फडणवीसांची प्रतिमाही डागाळली जात आहे. काय होतील याचे राजकीय परिणाम… अजित पवारांप्रमाणे देवेंद्र फडणवीसह नैतिकतेला तिलांजली देत आहेत का? याबाबतचे विश्लेषण जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
अन् मग पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वादाचा भडका…

महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले खरे पण हे यश सेलिब्रेट करण्याची किंवा या यशाचा जनतेच्या कल्याणासाठी उपयोग करण्यात मात्र अजून फडणवीस सरकारने अपेक्षित पावले उचललेली दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये वाढत चाललेला बेबनाव. आधी मुख्यमंत्री कोण? यावरुन एकनाथ शिंदे- फडणवीस यांच्यात बेबनाव झाला. त्यामुळे बहुमत असूनही मुख्यमंत्री निवड दोन- तीन आठवडे लांबली. त्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे यावरुन मुंबई ते दिल्ली खल झाला. त्यामुळे विस्तारही लांबला. नंतर खातेवाटपाचा वाद शिगेला पोहोचला. ही आग धुमसत असतानाच पालकमंत्रीपदावरुनही महायुतीत वादाचा भडका उडाला. एकूणच एकीकडे फडणवीस सरकार पहिल्या शंभर दिवसांच्या कामकाजाचे आराखडे बनवत असताना ते दृष्टीक्षेपात येण्याएेवजी या सरकारच्या मित्रपक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडीचेच राजकारण जास्त शिरजोर चढत असल्याचे दिसून येते. या खुद्द फडणवीस यांची व त्यांच्या सरकारची प्रतिमा डागाळत आहे.
दादांच्या मंत्र्यामुळे फडणवीस सरकारची नाचक्की?

एकमेकांची कोंडी करण्यात या सरकारचे सर्वच मंत्री व्यस्त आहेत. त्यातच शिंदे- फडणवीस गटात दरी अधिकच वाढत असल्याची संधी साधून अजित पवारांनी फडणवीस यांच्याशी सख्य वाढवले आहे. मात्र त्यामुळे फडणवीस जास्त अडचणीत येत आहेत. याचे कारण म्हणजे सरकार सत्तारुढ झाल्यानंतरच्या देान महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या देान मंत्र्यांमुळे फडणवीस सरकारची नाचक्की झाली आहे. शपथविधी झाल्यापासूनच धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी पक्ष व महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे. वाल्मीक कराडसारख्या खंडणीखोर आरोपीला मुंडेंच्या दरबारातून मिळणारे अभय, सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुंडेंच्या समर्थकांची अटक झाल्याने त्याच्या संशयाची सुई थेट मुंडे यांच्यापर्यंत पोहोचणे, भाजपचेच आमदार असलेल्या सुरेश धस यांनी वेगवेगळ्या घोटाळ्यांचेही आरोप मुंडे यांच्यावर करणे, इतकेच नव्हे तर आपली पहिली पत्नी करुणा मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार केल्याचा ठपका ठेऊन कौटुंबिक न्यायालयाने मंत्री मुंडे यांना करुणा यांना पोटगी देण्याचे दिलेले आदेश… या सर्व प्रकरणामुळे फडणवीस सरकारमधील एक बडा मंत्री वादात अडकला आहे. मात्र करुणा मुंडे प्रकरण सोडले तर अजून एकाही प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप सिद्ध न झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून त्यांची पाठराखण होत आहे.
मुंडेंवर कारवाई न करण्यास फडणवीस हतबल?

आता या प्रकरणात अंजली दमानिया यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना सरकारी यंत्रणेत कसा कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला हे सप्रमाण दाखवून दिले आहे. तरीही अजित पवारांच्या दबावामुळे फडणवीस कारवाई न करण्यासाठी हतबल झालेले दिसतात. भाजपचाच आमदार एकीकडे मुंडेंविरोधात लढा देत असताना त्याच भाजपचे नेते फडणवीस मात्र राजकीय अपरिहार्यतेमुळे संशयिताला अभय देत आहे, हा संदेश जनमाणसात गेलाय. त्यामुळे फडणवीस यांच्या स्वच्छ चारित्र्याच्या प्रतिमेला निश्चितच तडे गेले आहेत. हे सर्व रामायण सुुरू असताना आता फडणवीस सरकारमधील दुसरे एक मंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत आले आहेत. १९९५ मध्ये अत्यल्प उत्पन्न असल्याची खोटी कागदपत्रे देऊन कोकाटे व त्यांच्या भावाने सीएम कोट्यातील चार फ्लॅट लाटल्याचे कोर्टात सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे मंत्री कोकाटेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेच आहेत. २ वर्षाची शिक्षा झाल्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोेकाटेंची आमदारकीही रद्द होऊ शकते.
फडणवीसांचे मुंडेंप्रमाणे कोकाटे यांनाही अभय?

मुंडे यांची पाठराखण करताना अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, अशी कारणे पुढे करुन मुंडेंचा बचाव आहेत. पण आता कोकाटेंच्या बाबतीत तर खुद्द कोर्टानेच त्यांना दोषी ठरवून २ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. मग किमान कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचे धाडस तरी फडणवीस सरकार दाखवणार अाहे का? असा प्रश्न आता केवळ विरोधकच नव्हे तर राज्यातील जनता विचारत आहे. कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे अधिकार दोषी कोकाटेंना अाहेत, त्यामुळे ते राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. पण सरकारला तरी कोर्टाच्या निर्णयावर विश्वास आहे की नाही? की अजित पवारांच्या दबावामुळे फडणवीस नैतिकता विसरून मुंडेंप्रमाणे कोकाटे यांनाही अभय देणार आहेत? अशी शंका आता उपस्थित हेात आहे.

मुळात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचे आरोप असलेले अजित पवार- सुनील तटकरे, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना केलेल्या घोटाळ्यातील प्रफुल पटेल, महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात तुरुंगवास भोगून आलेले छगन भुजबळ, राज्य सहकारी बँकेत घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार व त्यांचे इतर शिलेदार या सर्वांना सोबत घेण्याचा निर्णय फडणवीस यांच्या भाजपने घेतला तेव्हाच या पक्षाने नैतिकतेला तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील असेच एक- एक घोटाळेबहाद्दर यापुढे उघडे पडतील, पण त्यांचे राजीनामे घेण्याचे धाडस फडणवीस दाखवू शकणार नाहीत. ‘असंगाशी संग’ करुनच ज्यांनी सत्ता मिळवली त्यांच्याकडून आपण तरी नैतिकतेची अपेक्षा कशी काय करणार? हा प्रश्न आहेच.
फडणवीस कोकाटेंचा राजीनामा घेणार का?

महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक, अनिल देशमुख हे मंत्री भ्रष्टाचार, देशद्रोहाच्या आरोपावरुन तुरुंगात गेले. तरी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा न घेण्याचा निगरगट्टपणा दाखवला होता. आता तोच कित्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेले सरकार दाखवत असेल तर मग आघाडी व महायुतीच्या सरकारमध्ये फरक तो काय? लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी जाऊ शकते, पण त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा की नाही हे सांगण्यासाठी कुठल्या कायद्याची नव्हे तर मुख्यमंत्र्यांमध्ये उरलेल्या नैतिकतेची गरज आहे. महाराष्ट्रातील ९ कोटी मतदारांनी ज्या विश्वासाने फडणवीस यांच्या पदरात भरभक्कम बहुमत टाकले, अभद्र युती करुनही ज्या जनतेने फडणवीसांवर विश्वास टाकला किमान त्या मतदारांच्या विश्वासाला तरी तडा जाऊ नये, याची काळजी फडणवीस यांनी घ्यावी, एवढीच यानिमित्ताने जनतेची अपेक्षा आहे. अन्यथा अजित पवारांची राष्ट्रवादी व देवेंद्र फडणवीस यांचा भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेच हतबल जनतेला म्हणून किमान पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी गप्प बसावे लागेल… एवढेच तर त्यांच्या हातात आहे.