अमराठी मतांसाठी संघाची भय्यागिरी

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन पहिला आठवडा आता लोटला आहे. कधी औरंगजेब प्रकरण, कधी धनंजय मुंडे- माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचे प्रकरण तर कधी मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या एका वक्तव्याने असाच गहजब माजला आहे. स्वत: मराठी माणूस असलेल्या जोशींनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकण्याची गरज नसल्याचे वक्तव्य करुन वाद ओढावून घेतलाय. आता कोण काय म्हणते याचा संघ परिवार फारसा विचार करत नाही, पण त्याचा फटका भाजपला बसू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले नसेल का? की अमराठी मतदारांना खूश करण्यासाठी जोशींनी जाणीवपूर्वक ही काडी केली?…. जाणून घेऊ या यामागचे राजकारण मिशन पॉलिटिक्समधून

मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना…

गेल्या ४० -५० वर्षांपासून मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर राजकारण सुरु आहे. सुरुवातीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी आंदेालनाची हाक देऊन शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केला. याच मुद्द्यावर त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली. सत्तेपर्यंतही त्यांनी झेप घेतली. याच शिवसेनेत असताना राज ठाकरे यांनी परप्रांतीय लोक, विशेषत: यूपी- बिहारमधील बेरोजगार मराठी तरुणांच्या रोजगाराच्या मुळावर उठलेत असे सांगून अनेकदा आंदोलने केली. एकदा तर रेल्वेच्या परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या यूपी- बिहारींना मारहाण करुन पिटाळून लावले. याच शिवसेनातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मनसे या पक्षानेही मराठी अस्मितेचा मुद्दा कायम ठेवला. मुबंर्सत दुकानावरील पाट्या मराठी असल्या पाहिजेत, असे सांगून त्यांनी अनेक दुकानांच्या पाट्यांवर दगडं भिरकावली. इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवले पाहिजे, कॉल सेंटरमध्ये मराठी भाषेचा पर्याय असला पाहिजे, मुंबईत मराठीच बोलले पाहिजे इतकेच काय आता हॉटस्टारवर मराठीतून क्रिकेटची कॉमेंट्रीही दिली पाहिजे इथपर्यंत मनसेने आंदोलने केली. त्यात कधी त्यांना यश आले तर कधी नुसताच गाजावाजा झाला.

भाजपचे राजकीय गणित मात्र वेगळेच…

महाराष्ट्रात कधीही निवडणूका लागल्या की मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा उफाळून येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनीही हा विषय तापत ठेवलाय. आता शिवसेनेतून फुट पडल्यानंतर शिंदेसेनेनेही हा मुद्द्याचे भांडवल करण्याची संधी सोडलेली नाही. एकूणच प्रादेशिक पक्षांकडून मराठीच्या मुद्द्याचे राजकारण भांडवल केले जाते. तर दुसरीकडे, या भूमिकेमुळे नाराज झालेल्या अमराठी मतदारांना गोंजारण्याचे काम राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप व काँग्रेसकडून केले जाते. भाजपची शिवसेनेच्या विविध गटांशी वेगवेगळ्या काळात युती राहिली असली तरी ते कधी मराठीच्या प्रेमात पडले नाहीत. शिवसेनेने मराठी मतांची जुळवाजुळव करावी व आपण राष्ट्रीय मुद्द्यावर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अमराठी मतदारांनाही आपलेसे करावे असे भाजपचे राजकीय गणित होते. भाजपची मातृतसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कधी मराठीप्रेम दाखवले नाही. विशेष म्हणजे या संघटनेचे प्रमुखपद असलेले सरसंघचालक अनेकदा मराठी माणूस होऊन गेले, पण राष्ट्रीय व्यापक विचारांनी भारावलेली ही संस्था कधी मराठीपुरतील मर्यादित राहिली नाही, पण त्यांनी कधी मराठीचा द्वेषही केला नाही. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, नुकतेच संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मात्र मराठी अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्याविरोधात व संघाविरोधात मराठी माणसामध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अन् भाजपप्रेमींच्याही मनात निर्माण झाली चीड…

५ मार्च रोजी घाटकोपर येथे एका कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी म्हणाले होते की, ‘मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे लोक राहतात. इथे कोणतीही एक भाषा नसून लोक अनेक भाषा बोलतात. जसे घाटकोपरची भाषा गुजराती आहे, तर गिरगावात मात्र हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे मराठी बोलणारेच लोक दिसतात. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे काही नाही,’ असे वक्तव्य जोशींनी केले हाेते. आता हे भय्याजी स्वत: मराठी माणूस आहेत. आपल्या मातृभाषेविषयी त्यांना जराही अभिमान नसल्यासारखे त्यांचे वक्तव्य दिसून येते. एकीकडे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष अगदी संघ विचाराचे सरकारही महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी यासाठी आग्रही असताना त्याच संघाचा एक वरिष्ठ पदाधिकारी मराठी शिकणे आवश्यक नसल्याची भाषा करतोय, हे पाहून संघ विचारांच्या, भाजपप्रेमी लोकांच्याही मनात चीड निर्माण झाली. पण भय्याजी हे संघाचे पदाधिकारी असल्याने ही मंडळी त्यांना जाब विचारु शकत नव्हती.

भय्याजींना जाब विचारण्यात काँग्रेसही अग्रेसर…

पण मराठीच्या मुद्द्यावरुन राजकारण करणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे इतकेच काय काँग्रेसनेही भय्याजींना जाब विचारला. जोशी बुवांनी अशा काड्या करण्याचे प्रकार बंद करावे. हिंमत असेल तर दक्षिणेत किंवा गुजरातेत जाऊन तेथील भाषेविषयी असे वक्तव्य करावे व परत महाराष्ट्रात येऊन दाखवावे, असे आव्हान राज ठाकरेंनी दिले. तर उद्धव ठाकरेंनी तर जोशींवर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या विषयाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. विधान परिषदेत स्थगत प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी भाजपची अडचण झाली. भय्याजींच्या विरोधात भूमिका घ्यावी तर संघ नाराज होण्याची भीती, अन‌ मराठीची उपेक्षा दुर्लक्षित करावी तर मराठी मतदारांची नाराजी.. या कोंडीत फडणवीस सरकार अडकले. अखेर संघापेक्षा मतदार महत्त्वाचे हे मानून फडणवीस यांनी महाराष्ट्रात मराठी हीच राज्याची व सरकारची भाषा असल्याचे सांगितले. या राज्यात येणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे, असेेही त्यांनी सांगून भय्याजींचे कान टोचले. राम कदम सारख्या भाजपच्या आमदाराने भय्याजींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे वक्तव्य तोडूनमोडून दाखवल्याचे सांगण्याचाही प्रयत्न केला, पण हा दिखावा फार काळ टिकला नाही.

भय्याजींचा २४ तासांत यू टर्न…

अखेर वाद टोकाला जात असल्यामुळे भय्याजींनीही २४ तासात यू टर्न घेत मराठीविषयी आपले प्रेम व्यक्त केले. ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे यात शंकाच नाही. मुंबईत बहुभाषिक लोक राहतात, ते सर्वांशी स्नेहसंबंध ठेवून आहेत. बाहेरुन मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकायला हवी अशी आपली अपेक्षा असतेच’ अशी सारवासारव करुन जोशीबुवांनी या वादातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण एकंदरीतच भय्याजींनी अचानक केलेल्या वक्तव्यामागे काय कारण असावे असा अर्थ राजकीय पंडित शोधू लागले आहेत. एकतर संघाचे पदाधिकारी कधीही निष्कारण वाद ओढावून घेतला जाईल, असे बोलत नाहीत. त्यांची काही वक्तव्ये ही पुढच्या राजकारणाचे संकेत देणारेही असतात. किंवा आपल्या संघटनेच्या उद्देशाला पुढे नेण्यासाठीही ही वक्तव्ये असतात. मग हा विचार केला तर आगामी मनपा निवडणुकीत अमराठी मतदारांना गोंजारण्यासाठी जोशींनी स्वत: मराठी असूनही अमराठी लोकांसाठी ही भय्यागिरी केली का? असा प्रश्न पडतो.

संघ परिवार राजकारणातून आपण अलिप्त असल्याचे कितीही सांगत असला तरी त्यांच्या जिवावरच भाजप सत्तेपर्यंत पोहोचला आहे हे नाकारता येणार नाही. अगदी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आम्हाला आता संघाची गरज राहिलेली नसल्याचे सांगितले असले तरी लोकसभेत त्यांना संघाने धडा शिकवला आहे. अन‌ मग याच संघाने विधानसभेतही भाजपला पुन्हा सत्तेपर्यंत नेऊन पोहोचवले आहे. त्यामुळे भय्याजींचे हे वक्तव्य मुंबई मनपा निवडणुकीत अमराठी मतांच्या पेरणीसाठी वापरले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण मुठभर अमराठी मतदारांना खुश करण्यासाठी लाखो मराठी माणसांच्या भावना दुखावण्याचा नतद्रष्टपणा जो भय्याजींनी केला आहे, त्याची किंमत भाजपला याच निवडणुकीत चुकवावी लागू शकते, हे संघाला कसे कळलेले नाही? हा प्रश्नच अाहे.