मोहम्मद अझहरुद्दीन, नवजोतसिंग सिद्धू, गौतम गंभीर, यूसुफ पठाण या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीतून निवृत्त होत राजकारणांच्या पिचवर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात फारसे कुणाला यश आले नाही. नवज्योतसिंग फक्त जास्त चर्चेत राहिले. आधी भाजप मग काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी पीच बदलून पाहिले, मात्र तरीही त्यांना राजकारणात फारसे यश आले नाही. आता महाराष्ट्रातील मराळमोठा क्रिकेटपटू याने भाजपात प्रवेश करुन राजकीय कारकिर्दीत आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या वर्षीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ४५ वर्षीय केदारची क्रीडा क्षेत्रातील काय आहे कामगिरी? व राजकारणात क्षेत्रात पदार्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…
केदार जाधवही धोनीचा चाहता…

केदार जाधव हा मुळ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जाधववाडीचा रहिवाशी. त्याचे वडील महावितरण कंपनीत लिपिक पदावर होते. वडील महादेव जाधव हे नोकरीत असल्यापासून हे कुटुंब पुण्यातच राहत होते. केदारचा जन्मही 26 मार्च 1985 रोजी पुण्याचाच. त्याचे शिक्षणही तिथेच झाले. केदारला लहानपणापासूनच क्रिकेटचा भारी शौक तो कर्णधार धोनीचा चाहता. धोनीपासून प्रेरणा घेतच केदारने टीम इंडियात प्रवेश मिळवला. मराठमोळ्या या खेळाडूने आपल्या फलंदाजीने आणि अष्टपैलू कौशल्याने नाव कमावले. तो उजव्या हाताचा फलंदाज असून, आवश्यकतेनुसार यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजीही करतो. तो महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधारही होता. त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच महाराष्ट्राच्या संघातून झाली. २०१४ मध्ये केदारला वयाच्या २९ व्या वर्षी टीम इंडियात एन्ट्री मिळाली. 16 नोव्हेंबर 2014 रोजी रांची येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वन डे मॅचमधून त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. त्यानंतर 17 जुलै 2015 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध त्याने आपल्या कारकिर्दतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, पण केदारचा स्वभावही वन डे किंवा टी-२० क्रिकेटसारखाच होता. त्याने कमी कालावधीत या सामन्यांत उत्तम कामगिरी करुन आपली छाप पाडली.
अन् केदार जाधवची निवृत्ती जाहीर…

२०१४ ते २०२० या सहा वर्षाच्या कार्यकाळात केदारने ७३ वनडे सामने खेळले.यात त्याने ४२ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या. यात दोन शतके व सहा अर्धशतकांचाही समावेश आहे. संघ अडचणीत असताना केदारने गोलंदाजीही केली. त्याच्या नावावर आतापर्यंत २७ विकेट आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये त्याने सरासरी ५ धावा दिल्या होत्या. नऊ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने त्याने खेळून १२२ धावा केल्या. आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगमध्येही केदारने ९५ सामने खेळले. २००९ ते २०२३ या १४ वर्षात त्याने आयपीएलमध्ये १२०८ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्स (CSK), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), दिल्ली डेअरडेव्हिल्स , कोची टस्कर्स केरळ आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केदारची ओळख. 2017 मध्ये आपल्या होम ग्राउंडवर पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात केदारने १२० धावा केल्या. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आहे. 2018 च्या आशिया कप फायनलमध्येही 23 धाव करत त्याने भारताच्या विजयात महत्वाचे योगदान दिले होते. केदार जाधवने 2020 मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. नंतर जून 2024 मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती.
भाजपकडून केदारची विधान परिषद किंवा राज्यसभेवर वर्णी..?

यानंतर सुमारे एक वर्षाने म्हणजेच ८ मार्च २०२५ रोजी केदारने भाजपात प्रवेश केला. मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्याने जाहीर प्रवेश केला. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर थेट राजकारणाची वाट कशी काय निवडली? या प्रश्नावर केदार म्हणाला, “2014 पासून केंद्रात भाजप सरकार आल्यापासून देशाला मिळालेले प्रेम, समर्थन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवलेल्या यशाने मी प्रभावित झालो आहे. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. मला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षासाठी योगदान द्यायचे आहे. मला जे काही काम मिळेल, ते मी प्रामाणिकपणे करेन. “आता भाजपकडून केदारला विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. प्रसंगी मंत्रिपद देऊनही त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवा वर्गाला भाजपकडे आकर्षित करण्याचा देवेंद्र फडणवीस व बावनकुळे यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.
केदार जाधवकडे बक्कळ पैसा…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केदार जाधवची एकूण मालमत्ता 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. केदार जाधवने क्रिकेट व जाहिरातींमधून बक्कळ पैसा कमावला. आयपीएलमधूनही त्याची कोट्यवधी रुपये कमाई झाली. सीएसकेने तीन हंगामांसाठी त्याला 7.8 कोटी रुपये दिले हाेते. त्याच्याकडे सुमारे ८४ लाख रुपये किमतीची BMW X4 कार आहे. पुण्याच्या अतिश्रीमंतांची वसाहत असलेल्या कोथरुडमध्ये केदारने चार मजली घर बांधल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर फारकाळ न टिकलेला केदार आता राजकारणाच्या मैदानावर काय कामगिरी करुन दाखवतो? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.