दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ…. अशी कैक वर्षांपासून आपल्याकडे म्हण आहे. जुन्या पिढीची माणसं नव्या पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी अशा म्हणींचा सातत्याने वापर करत असतात, पण फारच कमी लोक यातून बोध घेतात हा आजवरचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय घराणे असलेल्या ठाकरे बंधूंनाही अनेकांनी या म्हणीचा संदर्भ देत एक होण्याचे आवाहन, विनंती केली. पण दोघांनाही इगो महत्त्वाचा होता. अखेर याच इगोपायी उद्धव व राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला ओहोटी लागली अाहे. भाजपने कधी उद्धव यांचा हात धरुन तर कधी राज ठाकरेंचा टेकू घेऊन महाराष्ट्रात उंच भरारी घेतली. नंतर दोघांनाही ‘यूज अॅन्ड थ्रो’ केले. आता उशिरा का होईना ही बाब दोन्ही इगोस्टिक ठाकरे बंधूंच्या लक्षात आलीय. मराठी माणसाच्या हितासाठी व प्रखर हिंदुत्वासाठी एक होण्याची आमची तयारी असल्याचे ते सांगू लागले आहेत. मराठी माणसासाठी नसेना का पण स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी का होईना हे बंधू एकत्र येत असतील तर महाराष्ट्रातील जनता त्याचे स्वागतच करेल.. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंना आपला इगो दूर ठेवावा लागेल… हुजरेगिरी करणाऱ्या बडव्यांनी घेरलेल्या ठाकरेंना हे जमेल का? हाच खरा प्रश्न आहे. मिशन पॉलिटिक्समधून जाणून घेऊ या काय आहे या मागचे राजकारण…
महत्त्वाकांक्षेचा उदय आणि पडझड

महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या घरफुटीचा शाप लागलेला अाहे. त्यामागे प्रचंड राजकीय महत्त्वाकांक्षा व स्वार्थी भावना अाहेच, हे आता लपून राहिलेले नाही. याच भावनेतून २००५ मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले व त्यांनी स्वत:चा नवा पक्ष मनसे स्थापन केला. सुरुवातीच्या काळात राज ठाकरे लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होते, त्यामुळे या पक्षाला जनाधारही चांगला मिळाला. पहिल्याच निवडणुकीत त्यांचे १३ आमदार निवडून आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही त्यांना चांगले यश मिळाले. त्या तुलनेत उद्धव ठाकरेंची वाटचाल संथ सुरु होती. नंतर मात्र राज ठाकरेंची लोकप्रियता ओसरली, त्यांची आमदार संख्या एकपर्यंत घसरली हाेती. सध्या तर त्यांचा एकही आमदार नाही. याला राज ठाकरेंचा हटवादीपणा व मनमानी कारभार कारणीभूत ठरला. उद्धव ठाकरेंनी मात्र हळूहळू का होईना आपली लोकप्रियता वाढवली, भाजपच्या साथीने आधी सत्ताही मिळवली व नंतर भाजपच्याच विरोधात जाऊन स्वत: मुख्यमंत्रिपद मिळवले. पण जसा राज ठाकरेंना हट्टीपणा भोवला तसा उद्धव ठाकरेंना अतिमहत्त्वाकांक्षा भोवली. काँग्रेसशी हातमिळवणी त्यांच्या अंगलट आली अन् त्यामुळे पक्ष फुटला, सत्ताही गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली.
राजकीय नात्यांची किंमत आणि इगोचा परिणाम

एकूणच, आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे घरात फूट पाडणाऱ्या दोन्ही ठाकरे भावंडांवर आज हतबल होण्याची वेळ आलीय. भाजपने त्यांचा योग्य वेळी, सोयीने वापर करुन घेत महाराष्ट्रात आपली पाळे मुळे घट्ट केली. आता भाजप भक्कम झालाय व राज- उद्धव ठाकरेंचे पक्ष गलितगात्र झालेत. या पक्षांना पुन्हा उभारी देण्यासाठी व ठाकरे ब्रॅन्डचा लौकिक पुन्हा मोठा व्हावा म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी जनभावना आहे. कार्यकर्त्यांनाही तसे वाटते. पण इगोला कुरवळत बसणाऱ्या भावंडांना मात्र त्यात कधी स्वारस्य वाटले नाही. एकमेकांना दुषणं देण्यातच व एकमेकांची कपडे फाडण्यातच त्यांचा आसुरी आनंद वाटू लागला. या दुहीचा भाजपने फायदा घेतला. आता सारे काही संपत आले आहे. उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली, पक्ष गेला. मोजकेच शिलेदार पाठीशी आहेत, तेही आज ना उद्या सत्तेच्या आमिषाने एकनाथ शिंदेंसाेबत जाण्याची भीती आहे. राज ठाकरेंनी आधी भाजपला विरोध करुन पाहिला, नंतर त्यांनाच बिनशर्त पाठिंबाही दिला. पण त्यांना ना विरोधाचा लाभ झाला ना पाठिंब्याचा फायदा. राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांनाही विधानसभेला निवडून आणू शकले नाहीत. दोघांचेही पक्ष दुबळे झाल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. याच पार्श्वभूमीवर उशिरा का होईना ठाकरे भावंडांना सुबुद्धी सुचली व त्यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली.
संयमाचा सूर: राज ठाकरेचा नवा विचार

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला राज ठाकरे यांनी नुकतीच मुलाखत दिली. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं. “कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत. महाराष्ट्र फार मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं- एकत्र राहाणं यात फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. परंतु हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे आपण पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा,” असं राज ठाकरे म्हणाले. आयुष्यात प्रथमच उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंच्या वक्तव्यावर तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
उद्धव ठाकरेंचा प्रतिउत्तर – सहकार्य, पण अटींसह

उद्धव म्हणाले, ‘किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. परंतु, एकीकडे त्यांना (म्हणजेच भाजपाला) पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड, विरोध करायचा असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत-स्वागत करणार नाही, त्याच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा. मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे. माझ्याबरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजपाबरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे. चोरांना गाठीभेटी, कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग टाळी दिल्याची हाळी द्यायची,” असं ते म्हणाले. थोडक्यात काय… तुम्ही जर हात पुढे केला तर टाळी द्यायला मीही तयार अाहेे, पण त्यासाठी तुम्हाला भाजप व एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध तोडावे लागतील, असेच अप्रत्यक्षपणे उद्धव यांनी राज यांना सुनावले आहे.
भाजपचा वापर आणि ठाकरेंचे वळण

खरं तर अमित ठाकरेंच्या पराभवानंतर राज व शिंदे यांचे संबंंधही दुरावले आहेत. अमितसाठी दादरचा मतदारसंघ सोडण्यास भाजप राजी असूनही शिंदेंनी मात्र हट्ट सोडला नाही, परिणामी पहिल्याच निवडणुकीत अमित पराभूत झाले हा राग राज यांना आहेच. भाजपही गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे मित्रपक्षाचा वापर करुन त्यांना नंतर सोडून देते, हे राज ठाकरेंच्या लक्षात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जर दोन्ही सेनेचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि विशेषत: दोन्ही ठाकरे बंधूंचे अस्तित्व टिकवायचे असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना कळून चुकले आहे. मात्र या एकीकरणामुळे आपले महत्त्व कमी होईल की काय? अशी भीती आता त्यांच्या शेजारी जमलेल्या बडव्यांना वाटू लागली आहे. म्हणूनच मनसेचे नेते संदीप देशपांडे असतील किंवा उद्धव सेनेचे संजय राऊतांसारखे नेते असतील, ते काहीतरी वादग्रस्त वक्तव्ये करुन एकीकरणाआधीच एकमेकांची मने दुखावण्याचे काम करताना दिसत आहेत. उद्या दोन्ही ठाकरे बंधू एक आले तर त्यावेळी मनसे शिवसेनेत विलिन करणार की दोन्ही पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेऊन फक्त युती करणार ? या फॉर्म्युल्यावरही आता प्रश्न विचारले जात अाहेत. पण कोण कुणाच्या नेतृत्वात काम करणार? या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी कुणाकडेही नाही.
एकत्र येण्याच्या योजनेतील अडथळे

राज ठाकरे उद्धव यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार नसतील. ते करायचे नव्हते म्हणूनच तर ३० वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेना सोडली होती. तर उद्धव ठाकरे सध्या स्वत:च पक्षप्रमुख आहेत, ते राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्यास तयार होतील याची शक्यताही फारच कमी आहे. मग अशा वेळी दोन्ही पक्षाचे अस्तित्व कायम ठेऊन फक्त युतीचा फॉर्म्युला स्वीकारायचा व काम करायचे, या विषयावर एकमत होऊ शकते. पण पुन्हा तोच प्रश्न उरतो, तो म्हणजे बडव्यांचा. देान वेगवेगळे पक्ष राहिले तर त्यांच्यात कितपत सख्य राहिल, याबाबत शंका अाहेच. पण त्यासोबतच तू मोठा की मी मोठा, या वादात आपले स्थान दुय्यम तर होणार नाही ना? अशी भीती दोन्ही पक्षांतील क्रमांक दोनच्या नेत्यांना वाटतेय. म्हणूनच तर ठाकरे बंधूंनी कितीही मनात आणले तरी त्यांच्या भोवती जमलेले बडवे या दोन भावांना एकत्र येऊ देतील का? याविषयी मात्र शंका आहेच. तरीही कान भरणाऱ्या समर्थकांना दूर सारुन जर उद्धव व राज हे ठाकरे बंधू एकत्र आले तर मात्र महाराष्ट्रात एक नवी राजकीय शक्ती उभा राहण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही… हे मात्र खरे. आता महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे पुन्हा बदलण्यात ठाकरे बंधूंना रस आहे की, तोडा अन फोडा या भाजपच्या रणनितीतच गुरफटून आपला राजकीय अात्मघात करुन घेणे दोन्ही सेनेला मान्य आहे, हे येणारा काळच सांगू शकेल.