महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे आणि वादाच्या भोवऱ्यात असणारे नाव म्हणजे अब्दुल सत्तार. एकेकाळचे काँग्रेसचे नेते, नंतर शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्रीपद, आणि मग शिंदे गटात बंडखोरी करत पुन्हा मंत्रीपद – असा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंगतदार आणि वळणावळणाचा आहे. सध्या ते शिंदे सेनेचे आमदार आहेत, मात्र मंत्रीपदावरून वगळल्यामुळे आणि स्थानिक राजकारणातील संघर्षामुळे गेल्या काही दिवसांपासून ते गायब आहेत. सत्तार सध्या आहेत कुठे? काय चाललंय राजकारण? समजून घेऊ मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडीओतून.

सत्तार यांची राजकीय कारकीर्द १९८४ साली ग्रामपंचायत निवडणुकीतून सुरू झाली. १९९० मध्ये सिल्लोड नगराध्यक्षपद मिळवून त्यांनी मतदारसंघात आपली पकड वाढवली. १९९४ मध्ये अपक्ष, १९९९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली, मात्र यात त्यांना पराभव पत्करावा लागला. २००१ मध्ये विधानपरिषद सदस्य झाले. २००९ मध्ये काँग्रेसकडून आमदार झाले. २०१४ मध्ये मंत्रीपदाचा अल्पकालीन अनुभव मिळाला आणि २०१९ मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश. पुढे ते उद्धव यांची साथ सोडून शिंदेंसोबत गेले. असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
शिवसेना प्रवेश आणि बंडखोरी

२०१९ मध्ये काँग्रेसने लोकसभेचे तिकीट नाकारल्याने सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल, ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री झाले. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे सरकारविरोधात शिंदे गटात बंडखोरी केली आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कृषीमंत्री झाले. सत्तेचे वारे पाहून राजकीय उडी घेणारे सत्तार २०२४च्या निवडणुकीत राजकीय वारे समजून घेण्यात कमी पडले. ते शिंदे सेनेकडून निवडून आले खरे.पण महायुती सरकार येऊनही काही जुन्या मंत्र्यांना वगळण्यात आले, त्यात अब्दुल सत्तार यांचाही समावेश होता. निवडणूक जिंकूनही मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. ही नाराजी त्यांनी अनेकवेळा जाहीर केली आहे. त्यांच्या जागी शिंदे सेनेच्याच छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली. काही काळ सत्तार हे राजकारणापासून दूर होते, मात्र वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी शक्तिप्रदर्शन केले आणि “मी पुन्हा येईन” असा संदेश दिला. या शक्तिप्रदर्शनानंतर ते पुन्हा गायब झाले आहेत.एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडणार नाही. वरिष्ठांनी अडीच वर्षे थांबायला सांगितले आहे; त्यानंतर मंत्रीपद मिळेल, या आशावादावर सत्तार दिवस काढत आहेत.
स्थानिक राजकारणातील आव्हाने

सिल्लोड मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत ‘हम करेसो कायदा’ अशा शैलीत वावरणारे सत्तार यांच्याविरोधात भाजप, शिवसेना (ठाकरे) आणि स्थानिक विरोधक एकवटले आहेत. भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सत्तारविरोधातील प्रचार सुरू केला आहे. सत्तार यांच्या कार्यशैलीवर, वक्तव्यांवर, आणि न्यायालयीन प्रकरणांवरून विरोधकांनी आघाडी बांधली आहे.
राजकीय ताकद आणि भविष्यातील दिशा

विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी सत्तार यांचा मतदारसंघातील जनाधार अजूनही मजबूत आहे. मुस्लीम, मराठा, राजपूत मतदारांची मोट बांधण्यात ते यशस्वी राहिले आहेत. कोणतेही चिन्ह असले तरी निवडून येईन,” असा त्यांचा आत्मविश्वास कायम आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. मात्र, स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांची पडद्याआड युती, आणि सत्तारविरोधातील वातावरण हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
सत्तार यांची कार्यशैली आणि वादग्रस्तता

सत्तार हे नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. टीईटी घोटाळा, महिलांविषयी वक्तव्य, प्रशासनातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ, आणि आर्थिक गैरव्यवहार – असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले आहेत. तरीही, स्थानिक राजकारणातील तडजोडी, विरोधकांशी छुपे संबंध, आणि मतदारसंघातील पकड यामुळे ते टिकून राहिले आहेत.
कुणाचा कसा गेम करायचा ते मला कळतं…

जालना येथे झालेल्या एका भाषणात अब्दुल सत्तार यांनी, “कुणाचा कसा गेम करायचा ते मला कळतं. कोणाला दिल्ली पाठवायचं, कोणाला घरी बसवायचं याची मला आयडिया आहे,” असे वक्तव्य केले. या विधानाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले गेले. त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना आणि इतर राजकीय प्रतिस्पर्ध्यांना सूचक इशारा दिला, असे मानले जाते. या विधानामुळे त्यांच्या राजकीय शैलीवर आणि हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
टीईटी घोटाळा काय आहे?

टीईटी (Teacher Eligibility Test) घोटाळा हा महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) मोठ्या प्रमाणावर झालेला गैरव्यवहार आहे. या परीक्षेच्या प्रक्रियेत परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी, आणि परीक्षा परिषदेचे काही अधिकारी यांच्या संगनमताने अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आले, असे या घोटाळ्यात उघड झाले आहे. या गैरप्रकारामुळे अनेक अपात्र उमेदवारांना बेकायदेशीरपणे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र मिळाले होते. या घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे समोर आली आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. आरोपानुसार, या मुलींनी किंवा त्यांच्या वतीने एजंटला पैसे देऊन पात्रतेचे प्रमाणपत्र मिळवले होते. मात्र, चौकशीअंती त्या अपात्र ठरल्या आणि त्यांची नावे अपात्र उमेदवारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेत (National Education Society) अशा बोगस प्रमाणपत्र असलेल्या इतर १२ शिक्षकांचीही नावे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सत्तार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून, हा आपली बदनामी करण्याचा कट असल्याचे सांगितले आहे. तसेच, आपल्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात सत्तार यांच्या मुलींसह इतर दोषी उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत आणि त्यांना शिक्षक म्हणून कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात आले आहे.
मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराला मदत

2024 लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी जालना मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना मदत केल्याचा आरोप आहे. खुद्द सत्तार यांनी देखील “माझ्या कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांचे काम केले,” असे मान्य केले. त्यामुळे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या पराभवासाठी सत्तार जबाबदार असल्याची चर्चा झाली.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती
अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेबाबत चुकीची आणि अपुरी माहिती दिल्याचा आरोप आहे. सिल्लोड कोर्टाच्या तपासणीत असे आढळले की, त्यांनी काही जमिनींच्या किंमती आणि मालमत्तांची माहिती चुकीची दिली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास त्यांची आमदारकी जाऊ शकते आणि ६ वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतात.

अब्दुल सत्तार हे सध्या शिंदे सेनेचे आमदार असून, मंत्रीपदावरून वगळल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. ते सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सक्रिय असून, आपल्या समर्थकांसोबत शक्तिप्रदर्शन करत आहेत. पक्षातील अंतर्गत तणाव, स्थानिक विरोध, आणि मंत्रीपदाची प्रतीक्षा – या सगळ्या घडामोडींमध्ये सत्तार कुठे आहेत, याचे उत्तर म्हणजे: ते अजूनही राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, आणि पुढील काही महिन्यांत त्यांची भूमिका, ताकद आणि राजकीय भवितव्य ठरणार आहे. या व्हिडीओबद्दल आपली प्रतिक्र्िया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.