सत्तार विरुद्ध शिरसाट आता आरपारची लढाई.. एकनाथ शिंदेंना डोकेदुखी

एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले सिल्लोडचे शिंदेसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवशी १ जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करुन पक्षाला व पक्षातील विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली. पण सध्या तरी पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत शिवसेनेतच राहणार’ असे ते बोलून गेले. पण मंत्रिपद नाकारण्याचा निर्णय घेऊन शिंदेंनी यापूर्वीच सत्तार हे आता आपल्या विश्वासातले नसल्याचे सिद्ध केले आहे, मग सत्तार कशाची वाट पाहात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.. पाहू या काय आहे यामागे दबावाचे राजकारण… जाणून घ्या मिशन पॉलिटिक्समधून

अन् अब्दुल सत्तार सर्वांना पुरुन उरले…

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे बंडखोर नेते म्हणून ओळखले जातात. जिथे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो तिथे लाथ मारुन ते निघून जातात. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांना एकदा मंत्रिपद देण्यात आले होते, पण नंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तिथेही आपल्याला किंमत राहिलेली नसल्याचे लक्षात येताच सत्तार यांनी काँग्रेसला लाथ मारुन भाजप- शिवसेनेशी हातमिळवणी केली. सत्तार यांना निवडून येण्यासाठी कोणत्या पक्षाची गरज भासत नाही. ते स्वत:च एक पक्ष आहेत. सिल्लोडमध्ये सलग चौथ्यांदा ते अामदार झाले आहेत. सत्तारांना पक्षाची गरज भासत नाही तर सर्वच पक्षांना सत्तार मात्र हवेहवेसे वाटतात. कारण केवळ विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा बँक, दूध संघ, बाजार समित्या या सहकार क्षेत्रावरही त्यांचा चांगला दबदबा आहे. यावेळी मात्र सत्तार यांना पराभूत करण्यासाठी भाजप, संघ, उद्धव सेनेसह दोन्ही काँग्रेसने चंग बांधला होता. काहीही झाले तरी यंदा सत्तारसेठची पाठ लोळवायची असा विडा उचलून सर्वांनी काम केले. पण सत्तार या सर्वांना पुरुन उरले. काठावर का होईना ते विजयी झाले. त्यामुळे या सर्वांचा भ्रमनिरास झाला. मात्र भाजपने प्रतिष्ठा पणाला लावून सत्तार मंत्री कसे होणार नाही? यासाठी पुरेपुर फिल्डींग लावली होती. ती फलदायी ठरली. भाजपच्या या प्रयत्नांना शिंदेसेनेच्या नेत्यांचेही बळ होते.

मंत्रिपद नसले तरी सत्तारांची मोठी ताकद…

आपल्याला मंत्री व्हायचे असेल तर सत्तारांचा पत्ता कापावा लागेल हे संजय शिरसाट यांना चांगले ठाऊक होते. त्यामुळे त्यांनीही भाजपच्या हाताला हात लावून सत्तार यांना मंत्रिमंडळाबाहेर कसे ढकलता येईल, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अखेर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पक्षातील दबावाला बळी पडून सत्तार यांना मंत्रिपद नाकारावे लागले. सत्तार यांना हा निर्णय खूपच खटकला. मुळात सत्तार हे अल्पसंख्यांक समाजाचे असूनही ते महायुतीत आले ते फक्त मंत्रिपदासाठी. आता हे मंत्रिपदच मिळत नसेल तर मग युतीत राहून काय उपयेाग? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. सत्तार यांनी शिवसेना सोडावी, अशी मागणीही कार्यकर्ते करत आहेत. पण सत्तारसेठ भावनेच्या आहारी जाऊन काहीही निर्णय घेणार नाहीत. मात्र आपला पत्ता कट करणाऱ्यांना सहजासहजी सोडणारही नाहीत. याची झलक त्यांनी नुकतीच १ जानेवारीला दाखवून दिली. मंत्रिपद नसले तरी आपल्यामागे किती मोठी ताकद आहे हे विरोधकांना व स्वत:च्या पक्षाला दाखवून देण्यासाठी त्यांनी १ जानेवारीचा मुहूर्त निवडला. या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो. दरवर्षी ते सिल्लोडमध्येच वाढदिवस साजरा करतात. पण यावेळी आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे भव्य मैदान निवडले. जिथे बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभांनी मैदान गच्च भरायचे तिथे सत्तार यांनी आपल्या समर्थकांच्या गर्दीने मैदाना गच्च भरुन दाखवले. कुठल्याही पक्षाचे बॅनर न लावता, फक्त मित्रमंडळाच्या नावाखाली एखादा स्थानिक नेता हे मैदान भरवू शकतो, असा विक्रम संभाजीनगरमध्ये प्रथमच झालाय.

तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा तो दौर आयेगा…

या सत्कार सोहळ्याला खासदार कल्याण काळे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव सेनेचे बहुतांश नेते व कायर्कर्ते उपस्थित होते. सत्तार ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा मात्र एकही आमदार, नेता व्यासपीठावर हजर नव्हता. भाजपचाही कुणी बडा नेता नव्हता. मुळात त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले गेले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. यातूनच सत्तार यांनी आता भाजप- शिंदेसेनेशी अंतर राखणार असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे व इतर नेत्यांनी सत्तार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करुन त्यांना परत पक्षात घेण्यासाठी जाळे टाकण्याची संधी सोडली नाही. पण सत्तेची उब सोडून बुडू लागलेल्या काँग्रेसच्या जहाजात बसण्याचा धोका ते पुढील ५ वर्षे तरी किमान घेणार नाहीत, असे वाटते. आपल्याला अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळणार अाहे, असे सांगून त्यांनी कार्यकर्ते आपल्यापासून दूर जाऊ नयेत याची काळजी घेतली. यासोबतच पक्षांतर्गत विरोधक असलेले कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचाही नाव न घेता समाचार घेतला. सत्तार म्हणाले, ‘कुछ देर तक खामोशी है, फिर कानो में शोर आयेंगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा तो दौर आयेगा” असा शेर एेकवत त्यांनी शिरसाट यांना लक्ष्य केले.

संभाजीनगरात शिरसाट विरुद्ध सत्तार संघर्ष वाढण्याची चिन्हे…

मंत्रिमंडळात समावेश होताच शिरसाट यांनी सिल्लोडची गुंडगिरी संपवणार अशी घोषणा करुन सत्तार यांना अंगावर घेतले होते. तसेच सत्तार यांनी पालकमंत्री असताना गेल्या सहा महिन्यात जे निर्णय घेतले त्याचाही फेरविचार करण्याचा इशारा दिला होता. सत्तार यांच्यामुळे गेल्या अडीच वर्षात आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही हा राग शिरसाट यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवतोय. शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्याच सांगण्यावरुन शिंदेंनी सत्तार यांचा पत्ता कट केला, हे सत्तारही जाणून आहेत. म्हणून आता सत्तार यांनीही संभाजीनगरात येऊन शिरसाट यांची गुंडगिरी संपवण्याचे खुले चॅलेंज दिले आहे. परिणामी भविष्यात संभाजीनगरमध्ये शिरसाट व सत्तार यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्तार म्हणाले, ‘काही लोक जसा नाला खळखळ करतो, तशी खळखळ करू लागले आहेत. पण, जोपर्यंत शिंदे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्यांचाच राहणार, कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी तुमच्या आदेशाचं पालन करणार, अजून देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास माझ्यावर आहे, अजितदादांवरही विश्वास आहे’ असे सांगून सत्तार यांनी तूर्त वरिष्ठ नेते दुखावले जाणार नाहीत याची काळजी घेतली आहे.

संधी न मिळाल्यास सत्तार शिंदेसेनेची साथ सोडतील?

एकूणच, किमान लाखभर कार्यकर्ते गोळा करुन शक्तीप्रदर्शन करण्याच्या निमित्ताने सत्तार यांनी आपणच लोकनेता असल्याचे दाखवून दिले आहे. पण ते यानिमित्ताने पक्षांतर करतील का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच देता येईल. याचे कारण म्हणजे पुढचे ५ वर्षे महायुतीची सत्ता राज्यात असेल. मंत्रिपद मिळाले नसले तरी या सत्तेचा कसा उपयोग करुन घ्यायचा हे सत्तार चांगले जाणून आहेत. त्यामुळे शिंदेसेनेतून बाहेर पडण्यापेक्षा पक्षात राहूनच आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्यावर त्यांचा भर असेल. शिरसाट पालकमंत्री झाले तर त्यांच्या कामात अडथळा आणण्याची एकही संधी सत्तार सोडणार नाहीत. जिल्हा बँक असो की दूधसंघ, जिथे भाजपला वर्चस्व मिळवायचे आहे तिथेही सत्तार यांचा शब्द अंतिम असेल. महायुतीतील या दुफळीचा काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेतेही फायदा घेत राहतील. सत्तार दोन्ही डगरीवर हात ठेवून लाभाची पदे आपल्या समर्थकांच्या पदरात टाकत राहतील. या संस्थांवर जर पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर महायुतीलाही सत्तार यांना दुर्लक्षित करुन चालणार नाही. म्हणूनच मंत्रिपद नाही मिळाले तरी आपले महत्त्व कायम ठेवण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असेल. १ जानेवारीचा मेळावा ही त्याचीच एक झलक होती असे मानले जाते. अडीच वर्षांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ खांदेपालटात पुन्हा आपली वर्णी लागावी यासाठी सत्तार यांचे प्रयत्न राहतीलच. तीच आशा ठेवून त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा समर्थकांसमोर केली आहे. पण तेव्हाही संधी मिळाली नाही तर मात्र सत्तार शिंदेसेनेची साथ सोडू शकतात, असे राजकीय वि‌श्लेषकांना वाटते.