वरळी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी यंदाची निवडणूक तितकीशी सहज सोपी राहिलेली नाही. त्याचे कारण म्हणजे आता दोन्ही सेनेने त्यांची कोंडी करण्यासाठी डावपेच टाकले आहेत. मनसेने संदीप देशपांडे यांना या मतदारसंघातून उभे केले आहे. तर शिंदेसेनेने राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनाच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ठाकरेंसमोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे. काय आव्हाने आहेत हे आपण ‘मिशन पॉलिटिक्स’मधून जाणून घेऊया…
उद्धव ठाकरेंनी केला होता मार्ग सोपा…
२०१९ मध्ये शिवसेना- भाजप युती असताना आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मराठीबहुल वरळी मतदारसंघाची निवड त्यांनी केली. मुलगा प्रथमच निवडणूकीच्या मैदानात उतरत असल्याने त्याचा मार्ग सोपा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बेरजेचे राजकारण केले. या मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे हे राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांना पराभूत करुन निवडून आले होते. त्यामुळे तेव्हाच्या ५ वर्षात इथे शिवसेनेचा वरचष्मा होता. उद्धव ठाकरेंनी आदित्य यांच्यासाठी सुनील शिंदे यांना माघार घ्यायला लावली, त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा त्यांच्यासमोर राहिली नाही. आता प्रश्न राहिला तो विरोधी उमेदवारांचा. तर उद्धव ठाकरे यांनी २००९ मध्ये इथून निवडून आलेले व २०१४ मध्ये पराभूत झालेले सचिन अहिर यांनाही आपल्या पक्षात घेऊन टाकले. त्यामुळे तगडा विरोधकही संपला व आदित्य यांच्यासाठी निवडणूक सोपी झाली. या त्यागाच्या मोबदल्यात ठाकरेंनी सुनील शिंदे व सचिन अहिर या दोघांनाही विधान परिषदेची आमदारकी दिली, म्हणजे तेही खुश. मनसेनी इथे उमेदवार उभा करण्याचे टाळले होते. भाजपची ताकदही आदित्य यांच्यासोतब सर्वांच्या याच पाठिंब्याच्या जोरावर ९० हजार मते घेऊन आदित्य निवडून आले. अडीच वर्षासाठी मंत्रीही झाले.
मतांचे होणार विभाजन?
पण आता.. यावेळी मात्र आदित्य ठाकरेंना ही निवडणूक म्हणावी तशी सोपी नाही. याचे कारण म्हणजे या वेळी त्यांच्यासोबत भाजपची ताकद नाही. दुसरे म्हणजे मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी इथे मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेनेही इथे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा या अमराठी नेत्याला रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे शिवसेेनच्या मतांचे विभाजन तर होईलच यासोबतच अमराठी मतेही शिंदेसेनेकडे वळतील. त्यामुळे आदित्य यांची चांगलीच कोंडी होणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मतांची ताकद मात्र त्यांना यांना मिळू शकेल.
आता गेल्या निवडणुकांच्या मतदानातून आपण समजून घेऊ या वरळीचे गणित..
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून ४२,५०० मते मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना ७८ हजार मते मिळाली होती. म्हणजे शिवसेनेला ३६ हजाराची लीड होती. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना ९० हजार मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला २२ हजार मते मिळाली होती. म्हणजे ठाकरेंना ६८ हजाांची लीड होती. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणानुसार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेचे अरविंद सावंत यांना वरळीतून ६५ हजार मते मिळाली तर शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांना ५८ हजार मते मिळाली. म्हणजे उद्धव सेनेची लीड ७ हजारापर्यंत खाली आली. याच उद्धव सेनेच्या घटलेल्या मतांच्या व अमराठी मतांच्या जोरावर शिंदेसेना मिलिंद देवरा यांना विजयी करण्याचे नियोजन करत आहे. आता या आकडेवारीनुसार रचलेले शिंदेसेनेेचे डावपेच यशस्वी होतात की उद्धव सेनेविषयी असलेली सहानुभूती आदित्य ठाकरेंना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवते हे विधानसभेच्या निकालानंतरच कळेल…