December 26, 2024

भुजबळ इफेक्ट.. अजित पवार लपून का बसले?

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक दोन दिवस गायब झाले. नागपुरात असूनही विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी दोन दिवस हजेरी लावली नाही, त्यामुळे गेले अजित पवार कुणीकडे अशीच चर्चा सुरू झाली. कुणी म्हणाले दादा दिल्लीत गेले, तर कुणी म्हणाले आजार आहेत. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिपदी डावललेल्या छगन भुजबळ यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यामुळे कोंडीत अडलकेल्या अजित पवारांनी दोन दिवस मीडियापासून पळ काढल्याचे सांगितले जाते. भुजबळांना मंत्रिपद का नाकारले,? या प्रश्नाचे उत्तर अजित पवार माध्यमांना व जनतेला देऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी आजारपणाचे नाटक करुन सरकारी बंगल्यातच आराम करणे पसंत केले काय? असे प्रश्नही विचारले जात आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊ या..मिशन पॉलिटिक्समधून..

ईडीच्या धास्तीने अनेक नेते भाजपसोबत..?

मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचाराचे डाग असणाऱ्या नेत्यांना संधी देऊ नका, असे फर्मान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केवळ भाजपसाठीच नव्हे तर शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठीही काढले हाेते. कदाचित त्यामुळेच अजित पवारांना छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारावे लागले, अशी पहिल्या दिवशी चर्चा होती. पण जर हाच नियम लागू करायचा ठरवले तर शिंदेसेनेचे प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना कसे काय मंत्रिमंडळात स्थान मिळाले? हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण या दोन्ही नेत्यांचीही ईडी चौकशी झाली असून ती अजूनही बंद ‌झालेली नाही. स्वत: अजित पवार यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असून अजून त्यांना यातून पूर्णपर्ण क्लीनचिट मिळालेली नाही, फक्त प्रकरणे होल्डवर ठेवलेली आहेत. मग ही मंडळी मंत्रिमंडळात कशी काय? हा प्रश्न अाहेच. पण आपण सर्वजणच जाणतो की, भाजपने दबावाचे राजकारण करुन व तपास यंत्रणांचा धाक दाखवून अनेक नेत्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले आहे. शिंदे गटातील व अजित पवार गटातील अनेक नेते केवळ ईडीच्या धास्तीपोटीच भाजपसोबत आले आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. मग छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारण्याचे काय कारण असावे, असा प्रश्न उरतोच.

अजित दादा कोंडीत फसलेत का?

बरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही होते. पण अजित पवारांनी निर्णय घेतला नाही, असा आरोप भुजबळांनी केला आहे. यामुळे अजित पवारांची मोठी कोंडी झाली आहे. अनेक भुजबळ समर्थक व ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते आता अजित पवार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भुजबळांना मंत्रिपद का नाकारले? हा प्रश्न ते विचारत आहेत. त्याचे उत्तर काही अजितदादांकडे नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे बोट दाखवावे तर भुजबळांनी आधीच क्लीअर केलंय की भाजपमधून मला विरोध नव्हता. त्याउपरही दिल्लीच्या निर्णयावर खापर फोडण्याचा प्रयत्न केलाच तर तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहात अन‌् आपल्या पक्षाचे निर्णय दुसऱ्या पक्षांच्या अध्यक्षांना विचारुन घेता का? असा प्रश्न अजित पवारांच्या बाबतीत उपस्थित केला जाऊ शकतो. म्हणजे त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. अशा कोंडीत फसलेल्या अजित पवारांनी माध्यमांसमोर व आपल्या पक्षाच्या आमदारांसमोर न येण्यासाठी दोन दिवस स्वत:ला बंगल्यातच कोंडून घेतले होते. पण त्यासाठी आजारपणाचे निमित्त पुढे करण्यात आले.

भुजबळ अजित दादांची साथ सोडणार?

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अनिल पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, अजित पवार नागपूरच्या घरीच आहेत. त्यांच्या गळ्याला इन्फेक्शन झाल्यामुळे ते दोन दिवस विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत. पण मग त्यांना भेटायला जाण्यासाठी सर्वांना बंदी का घालण्यात आली होती? याचे कारण मात्र समजू शकले नाही. कुणीही भेटू शकत नाहीत, इतके दादा नक्कीच गंभीर आजारी नव्हते. मग या सर्वांपासून तोंड लपवून बसण्याची वेळ त्यांच्यावर का आली? असा प्रश्न भुजबळ समर्थकांकडून विचारला जात आहे. तिसऱ्या दिवशी अजितदादा विधिमंडळात आले खरे पण भुजबळ प्रकरणावर बोलणे त्यांनी टाळले. आता छगन भुजबळ यांनी निर्णायक पाऊल उचलण्याचा निर्धार केला अाहे. मंत्रिपदावरुन डावलल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाकडे पाठ फिरवून त्यांनी तडक नाशिक गाठले. तिथे दोन दिवस आपल्या समर्थकांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेतली. बहुतांश समर्थकांचे म्हणणे आहे की आता भुजबळांनी अजित पवारांची साथ सोडावी. भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यांच्यामुळेच हा समाज मोठ्या संख्येने महायुतीकडे वळला अाहे. अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिपद नाकारुन फक्त त्यांच्या एकट्याचाच अपमान केलेला नाही तर तमाम ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे आता अजितदादांची साथ सोडाच, असा आग्रह समर्थक करु लागले आहेत.

‘जहां नी चैना, वहां नही रहेना’

भुजबळही त्याच मानसिकतेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची ’जहां नी चैना, वहां नही रहेना’ असे सांगत पक्षांतराचे संकेत दिले होते. पण मग भुजबळ जाणार कुठे ? हा प्रश्न निर्माण होतोच. राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाच्या या घडामोडींवर शरद पवार लक्ष ठेऊन आहेत मात्र त्यांनी आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भुजबळ समर्थकांपैकी एका गटाचे म्हणणे असे आहे की भुजबळांनी पुन्हा शरद पवारांकडे जावे तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे सत्तेतच राहायचे असेल तर मग भाजपसोबत जाण्यात गैर काय? पण भुजबळांनी अजून निर्णय घेतलेला नाही. भाजपचे नेते व फडणवीसांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ‘छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. ते महायुतीत राहणे आमच्यासाठी गरजेचे आहे. मी त्यासाठी प्रयत्न करेल. पण त्यांना भाजपात घ्यायचे की नाही याबाबत मी बोलू शकत नाही. मुळात भुजबळांनी तशी मागणी केलेली नाही, अन‌ केली तरी केंद्रातील नेते त्यावर निर्णय घेतील,’ असे महाजन म्हणाले. पण त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढला तर भुजबळ राष्ट्रवादी सोडण्याच्या मानसिकतेत आहेत हे आता भाजपनेही मान्य केले आहे.

भुजबळांना शिक्षा नेमकं कशाची?

भुजबळांप्रमाणे जळगावचे अनिल पाटील हेही मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज आहेत. राष्ट्रवादीत अजित पवार सध्या फक्त प्रफुल पटेल, सुनील तटकरे व धनंजय मुंडे यांच्याशीच सल्लामसलत करुन निर्णय घेतात. इतर नेत्यांना विचारतही नाहीत, असा बहुतेक नेत्यांचा व पदाधिकाऱ्यांचा आरोप असतो. मग भुजबळांचे मंत्रिपद कापण्याचा अजित पवारांचा स्वत:चा निर्णय आहे की या सल्लागार नेत्यांपैकी कुणाची त्यामागे फूस आहे? असाही संशय व्यक्त केला जात आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी नांदगावमधून शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात बंड केल्यामुळे त्यांना ही शिक्षा देण्यात आली असावी, असाही एक मतप्रवाह आहे. स्वत: सुहास कांदे यांनीही तसे जाहीरपणे सांगितले आहे.

आपणच महायुतीच्या नेत्यांकडे भुजबळांची तक्रार केली होती, म्हणून त्यांना मंत्रिपद दिले नाही, असे सांगून कांदे स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. पण प्रत्यक्षात कांदेसारख्या एखाद्या आमदाराला भुजबळांचे मंत्रिपद कापणे शक्य होणार नाही, हे सर्वच जाणतात. म्हणून या निर्णयामागे फक्त अजित पवार आहेत की अन्य कुणी सल्लागार मंडळ याचा शोध भुजबळ घेत आहेत. एक मात्र नक्की, की भुजबळांना दूर ठेवणे अजित पवारांना परवडणारे नाही. कदाचित त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेता जाऊ शकतो, पण तो आता स्वीकारणार नसल्याचे भुजबळांनी आधीच जाहीर केले आहे. म्हणजे मग आता माध्यमांसमोर येऊन बोलणार काय? भुजबळांच्या प्रश्नााला उत्तर देणार काय? या कोंडीत अजित पवार अडकले आहेत. म्हणूनच आजारपणाच्या नावाखाली त्यांनी दोन दिवस माध्यमांपासून पळ काढला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.