शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा आपण अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एेकत आलो आहोत. पण आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र ‘केसानं गळा कापला’ ही म्हण जास्त चर्चेत आलीय. त्याची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या गावातील तासगावच्या सभेतून केली. मात्र आता दादांच्या या डायलॉगवरुन अनेक प्रतिप्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्याची उत्तरे मात्र अजित पवार देऊ शकत नाहीत? काय आहे या आरोपामागचे राजकारण जाणून घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून
त्यांनी तर माझा केसानंच गळा कापला राव..!
‘२०१४ मध्ये ७० हजार कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळा प्रकरणात माझ्या चौकशीच्या फाईलवर आमच्याच पक्षाचे नेते, आमचे सहकारी व तत्कालिन गृहमंत्री आर.अार. पाटील यांनीच सही केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनीच मला ही फाईल दाखवून हा गौप्यस्फोट केला. तेव्हा मला खूपच वाईट वाटलं. आर.आर. आबांनी तर माझा केसानंच गळा कापला राव..’ हे वक्तव्य आहे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नूतन अध्यक्ष अजित पवार यांचे…. सांगली जिल्ह्यातील तासगावमधील प्रचार सभेत ते बोलत होते. दिवंगत आर.आर. पाटील हे राष्ट्रवादीतील एक बडे व प्रामाणिक नेते. शरद पवारांचे कट्टर निष्ठावंत. त्यामुळे पक्षात असतानाही अजित पवार व आबांचे कधी फारसे जमले नाही. मात्र त्यांनी तसे कधी बाहेर जाणवू दिले नाही. २०१५ मध्ये कर्करोगाने आबांचे निधन झाले. गेल्या दीड वर्षात राष्ट्रवादीचीही दोन शकले झाली. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेले पवार काका- पुतण्यांचे व इतर नेत्यांची वाद जे आजवर ‘झाकल्या मुठी’त बंद हाेते ते आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. नव्हे हीच नेतेमंडळी ती बाहेर आणू लागली आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अन् सुप्रिया ताईंनी मागितली माफी…
शरद पवार व अजित पवार यांनी एकमेकांची अनेक गुपिते लोकसभेच्या प्रचारात जाहीर सभांमधून बाहेर काढलीच आहेत. पण आता दिवंगत आर.आर. पाटलाविषयी अजित पवारांनी त्यांच्याच तासगावात जाऊन केलेले ‘केसाने गळा कापल्या’चे वक्तव्याने आरआर यांच्या कुटुंबीयांसह त्यांना मानणाऱ्या समर्थकांची मात्र मने दुखावली आहेत. सुप्रिया सुळेंनी आरआर आबांच्या पत्नी सुमनताई यांना फोन करुन दादांच्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली. तासगावातून आरआर आबांचे पूत्र रोहित हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपमधून आलेले माजी खासदार संजय पाटील यांनी अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अजितदादांनी जाणीवपूर्वक त्यांच्या मतदारसंघात हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे.
रोहित पाटलांचे प्रत्त्युत्तर…
आबांचे पूत्र रोहित पाटील यांनीही मग दादांना चोख प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला,हे मला माहित आहे. आबा हयता असताना अनेकदा त्यांच्या पुण्यातील मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे.. त्यांना पक्षात कोण त्रास द्यायचं ते सांगायचे.. हे आबांच्या मित्रांनी मला सांगितलं आहे. त्रास देणाऱ्यांना आपण योग्य वेळी उत्तर देऊ,’ असा इशारा त्यांनी अजितदादांना दिलाय. आबा हयात असताना अजित पवार असे बोलले असते तर ठीक होते. पण हयात नसलेल्या व्यक्तीविषयी असे बोलणे योग्य नाही, अशी टीकाही आता अजित पवारांवर होऊ लागलीय. पण राजकारणी लोकांना याचे भान असते कुठे म्हणा… स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी ते कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. अारआर पाटलांवर केसाने गळा कापल्याचा आरोप करणारे अजित पवार यांनी आपल्याला राजकारणात स्थिरस्थावर करुन अनेक पदे देणाऱ्या आपल्या काकांचाच पक्ष पळवला, तेव्हा त्यांनी शरद पवारांचा केसाने गळा कापला नाही का? ‘लाडक्या बहिणी’साठी लाखो रुपये दिल्याचे सांगून त्यांच्याकडून राख्या बांधून घेणाऱ्या अजित पवारांनी आपलीच बहिण सुप्रिया यांना लोकसभेत बारामतीतून पाडण्यासाठी षडयंत्र रचले हा बहिणीचा केसाने गळा कापला नाही का? सत्तेसाठी व चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करुन घेण्यासाठी अजित पवारांनी पवार घराण्यात फूट पाडली हा केसाने गळा कापणे नाही का? असे प्रश्नही आता राष्ट्रवादीतूनच विचारले जाऊ लागले आहेत. याची उत्तरे मात्र अजित पवार देऊ शकत नाहीत. आज या प्रश्नांची दबक्या आवाजात चर्चा होत असली तरी उद्या विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हे प्रश्न जाहीर व्यासपीठावरुनही विचारले जातील, तेव्हा त्यांना उत्तर देण्याचे धाडस अजित पवारांमध्ये नसेल, हे मात्र नक्की.