बारामती जिंकण्यासाठी शरद पवारांविषयी केलेले वक्तव्य अजितदादांच्या अंगलट
मुंबई : शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जसा त्यांचेच पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला, (Split in NCP) तसाच आता पवारांचे होमग्राउंड असलेल्या बारामती मतदारसंघावरही या पुतण्याने दावा केला आहे. आपल्या काकांच्या विचारांना, त्यांच्या शब्दाला वर्षानुवर्षे बांधिल असलेला हा मतदारसंघ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दादा गटाने केल्याचे संकेत मिळत आहेत. (Sharad pawar- Ajit Pawar disput).
बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात आधी शरद पवार (Sharad Pawar) आणि नंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे (supriya sule) तर बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) असे समीकरण अनेक वर्षांपासून आपण पाहात आलो आहोत. पवार काका- पुतण्याच्या शब्दाबाहेर आजपर्यंत कधीही हा मतदारसंघ गेला नाही. कुणी बाहेरुन येऊन कितीही वल्गना केल्या, आमिषे दाखवली. गेल्या दोन निवडणुकीत तर भाजपने शर्थीचे प्रयत्न केले पण या मतदारसंघात पवारांना हरवणे त्यांना जमले नाही. मात्र आता पवार घराण्यातच फूट पाडून अजित पवार भाजपला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे जुनी ‘परंपरा’ मोडून अजित पवार यावेळी लोकसभेलाही आपली चुलत बहिण सुप्रिया सुळेंविरोधात (Supriya Sule) स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी बारामतीत व्यापारी संघटनांच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांचे आपले मनसुबे सर्वांसमोर उघड करुन सांगितले. ‘आजपर्यंत आपण बारामती व बारामतीकरांसाठी खूप काही केले. या कामाची पावती तुम्हाला द्यायची असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत मी जो महायुतीचा उमेदवार देईल तो उमेदवार निवडून द्या. अजित पवारच उभा आहे असे समजून मतदान करा,’ असे आवाहन दादांनी केले. खरे तर प्रत्येकच निवडणुकीत दादा, ताई किंवा काका असे आवाहन करतच असतात. मात्र यावेळची आवाहन जरा वेगळे होते. कारण दादांच्या तोंडी यंदा आपल्या बहिणीला पराभूत करण्याची भाषा होती. ती बारामतीकरांना काही पटत नव्हती.
यांची शेवटची निवडणूक कधी येईल.. काय माहिती?
बारामतीच्या व्यापारी मेळाव्यात अजित पवार म्हणाले, ‘कुणी (शरद पवार) भावनिक होऊन तुम्हाला आवाहन करतील. आपली ही शेवटची निवडणूक आहे असेही सांगतील. पण तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी विनंती आहे. खरंच, यांची (शरद पवारांची) शेवटची निवडणूक कधी होणार माहिती नाही. पण सतत असं सांगितले जाते…’ असा टोमणाही लगावत आता तरी वय झालेल्या नेत्यांनी थांबावे, असा पुनरुच्चार अजित पवारांनी केला होता.
पवारांच्या मरणाची वाट पाहताय का, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
अजित पवार यांच्या या भाषणाची बारामतीत उलटसुलट चर्चा सुरु झाली (contravercy on ajit pawar statment). तर दुसरीकडे शरद पवार यांचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनीही दादांचा कडक शब्दात समाचार घेतला. ‘अजित पवार आपल्या काकाच्या मृत्यूची, प्रतिभा काकीचे कुंकू कधी पुसले जातेय याचे वाट पाहात आहेत का? अशा माणसासोबत इतकी वर्षे काम केल्याची लाज वाटते,’ अशी परखड टीका आव्हाड यांनी केला. ते म्हणाले, ‘अजित पवार १०- १५ वर्षांपासून शरद पवारांशी ज्या पद्धतीने वागलेत ते कुणाला कळले नव्हते. पण मला मात्र कळले होते. शरद पवारांचा एखादा मुद्दा चर्चेत आला की अजित पवार संध्याकाळी त्यातही हवा काढायचे.
शरद पवार हे बारामतीपुरते मर्यादित नाहीत तर ते देशाचे नेते आहेत. अजित पवारांना महाराष्ट्राबाहेर कोण ओळखतो. कधी राजीनामा, तर कधी खोटं बोलायचं. या सुपाऱ्या अजित पवारांनी खूपदा वाजवल्या आहेत,’ असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.
भाजपचा व्हायरस दादांना लागलाय का : रोहित पवार
शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनीही अजितदादांच्या वक्तव्यावर आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आम्ही पाहिलेले दादा वेगळे होते. आज भाजपसोबत गेल्यावर मात्र ते वेगळेच वागत आहेत. भाजपचा व्हायरस त्यांच्यात शिरला आहे काय? आपण खरेच पवारांविरोधात लढत आहोत याची भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना खात्री पटवून देण्यासाठी तर दादा अशी वक्तव्ये करत नाहीत ना? असाही प्रश्न पडतोय. माझे दादांना एकच सांगणे आहे, तुम्ही सत्तेत आहात. जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवांसाठी काय करणार ते सांगून मते मागा ना. पण ते सातत्याने साहेबांच्या वयाबद्दल बोलतात. कदाचित दादांच्या मनात अजूनही भीती आहे की लोक आपल्याला स्वीकारतील की नाही?’
शरद पवार मात्र या वादावर अजून एक शब्दही बोलले नाहीत.
ध चा मा करू नका : अजित पवार
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेनंतर अजितदादांवर सोशल मीडियातूनही टीकेची झोड उठली. दादांनी शरद पवारांबद्दल केलेले वक्तव्य राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला व पवारप्रेमी जनतेलाही पटले नाही. आपल्या प्रतिमेवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, हे लक्षात आल्याने मग अजितदादांनी तातडीने सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिले.
अजित पवार म्हणतात ‘माझ्या बारामतीतील कार्यक्रमातील वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. राष्ट्रवादी एकत्र असल्यापासून माझे म्हणणे होते की ज्येष्ठ नेत्यांनी फार दगदग न करता प्रकृतीची काळजी घ्यावी व नव्या पिढीच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवावीत. मात्र काही लोक स्वत:च्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा (शरद पवारांचा) वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या शरद पवारांबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करण्याची सवयच असेल, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. पण सर्वसामान्य लोकांना माझे म्हणणे कळावे म्हणून मी हे सांगत आहे,’ असे अजितदादांनी स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
वक्तव्य अंगलट येण्याची चिन्हे
एकूणच नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात आघाडीवर असलेल्या अजित पवार यांना आता शरद पवारांबद्दल केलेले वक्तव्य मात्र चांगलेच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. कारण, शरद पवार गटाच्या नेत्यांनी आता याच मुद्द्यावरुन दादांना चांगलेच घेरले आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), अमोल मिटकरी (Amol Mitkari) या दादा समर्थक नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांवर आगपाखड करुन दादांची पाठराखण करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु केला आहे, मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
दुसरीकडे, आगामी निवडणूक प्रचारात बारामती, पश्चिम महाराष्ट्रासह शरद पवारांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांत दादांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडून अजित पवारांची प्रतिमा डॅमेज करण्याची रणनीती शरद पवार गटाकडून आखली जाईल असे संकेत मिळत आहेत.
राज ठाकरेंनीही काढले होते बाळासाहेबांचे खाणे
यापूर्वी एका जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) राजकीय आरोप करताना त्यांचे चुलत बंधू, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शेवटच्या दिवसात खाण्याची खूप अबाळ झाली, असे सांगितले होते. (Raj Thackeray and Balasaheb Thackeray) दोन तळलेले वडे त्यांच्यासमोर ठेवले जायचे. तेव्हा मी साहेबांना चिकन सूप पाठवायला सुरुवात केली होती, असे जाहीरपणे सांगून त्यांनी ठाकरे घराण्यातील कथित विसंवाद चव्हाट्यावर आणला होता. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेला राज ठाकरे यांचे हे वक्तव्य अजिबात पटले नव्हते. त्यावेळच्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाचे ‘पानिपत’ झाले होते, हा अनुभवही महाराष्ट्राच्या गाठीशी आहे. आता अजित पवारांना शरद पवारांविषयीच्या वक्तव्याची काय किमत मोजावी लागू शकते, हे येणाऱ्या निवडणुकीतच दिसून येईल.