माहिम-वरळीत ठाकरे बंधूंचं साटंलोटं

मुंबईत विधानसभेला दोन मतदासंघ एकदम हॉट आहेत. एक म्हणजे वरळी अन‌् दुसरा म्हणजे माहिम. वरळीत उद्धव ठाकरेंचे पूत्र आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी उभे आहेत. तर माहिममध्ये राज ठाकरेंचे पूत्र अमित पहिल्यांदा नशिब आजमावत आहेत. दोन्ही मतदारसंघात उद्धव व राज ठाकरेंनी आपल्या पुतण्याविरोधात उमेदवार दिले आहेत. मात्र या मतदारसंघांबाबतची दोन्ही भावांची भूमिका एकमेकांना पूरक असल्याचे आता दिसू लागले आहे. त्यांनी एकमेकांसाठी सेटिंग केल्याची शंका येतेय. कसे ते पाहू या.. मिशन पॉलिटिक्समधून…

पुतण्यासाठी मतदारसंघ सोडल्याची मोहीममध्ये चर्चा…

माहिम विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी अमित ठाकरेंसाठी माघार घ्यावी म्हणून भाजपने खूप दबाव टाकला. मात्र तो ना एकनाथ शिंदेंनी जुमानला न सदा सरवणकर यांनी. त्यामुळे अमित ठाकरेंसमोर पहिल्या परीक्षेला मोठे संकट उभे राहिले आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे त्यांच्या मदतीला धाऊन आल्याचे दिसते. या मतदारसंघात उद्धव सेनेचे महेश सावंत हेही उमेदवार आहेत. मात्र तरीही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी मुंबईत जे प्रचाराचे नियोजन केले आहे त्यात महेश सावंत यांच्यासाठी माहिम मतदारसंघात एकही सभा ठेवलेली नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वरळी मतदारसंघात राज ठाकरेंकडून परतफेड कशी केली जाणार?

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेसेनेचे खासदार मिलिंद देवरा व मनसेचे संदीप देशपांडे हे उमेदवार आहेत. २०१९ मध्ये इथे आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडून आले त्यावेळी मनसेने वरळीत उमेदवार दिला नव्हता.यावेळी मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी पहिली सभाही घेतली. या सभेत राज यांनी अापल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भाषण ठोकले, उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. पण आश्चर्याची बाब म्हणजे या मतदारसंघात जे विद्यमान आमदार आहेत व मनसेचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत त्या आदित्य ठाकरेंचा साधा नामोल्लेखही राज ठाकरेंनी सभेत केला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज म्हणाले, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची अडीच वर्ष आठवून पाहा. त्यावेळी शिवसेनेच्या होर्डिंगवरुन बाळासाहेब ठाकरेंच्या नावासमोरील हिंदुहदयसम्राट हा शब्द काढण्यात आला. का तर म्हणे काँग्रेस-राष्ट्रवादीला वाईट वाटेल. काही होर्डिंग तर उर्दूतून लागले व बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहदयसम्राटएेवजी जनाब शब्द आला. आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकेकाला फोडून काढलं असतं.’ अशा शब्दात राज यांनी आपल्या भावाचा समाचार घेतला. पण आदित्य ठाकरेंविषयी ते चकार शब्दही बोलले नाहीत. एरवी प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराचा समाचार घेणारे राज ठाकरे आदित्य यांचे नाव कसे विसरले? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याचा असा अर्थ काढला जात आहे की, वरळी व माहिममध्ये शिंदेसेनेने ठाकरे बंधूंची अडचण करण्याचा प्रयत्न चालवल असताना हे दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांना ‘बाय’ देऊन आपापल्या पूत्रांची राजकीय सोय करण्याचे ठरवले असल्याचेच संकेत त्यांच्या वागण्यातून मिळत आहेत.