December 26, 2024

ठाकरेंची श्रीमंती : नवख्या अमितपेक्षा आदित्य जास्त धनिक

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन नातू यावेळी विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य हे दुसऱ्यांदा वरळी विधानसभा मतदारसंघातून नशिब आजमावत आहेत. तर राज ठाकरे यांचे पूत्र अमित हे माहिम मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढवत आहेत. दोघांनीही निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यासोबत आपल्या नावावरील मालमत्ताही जाहीर केली आहे. चला तर मग ‘मिशन पॉलिटिक्स’मधून आपण जाणून घेऊ दोन ठाकरे बंधूंमध्ये कोण किती श्रीमंत आहे ते…

राज ठाकरेंचे पूत्र अमित हे नेमका व्यवसाय काय करतात, त्यांना उत्पन्न काेणत्या व्यवसायातून मिळते हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. पण निवडणूक शपथपत्रात त्यांनी याचा उलगडा केलाय. ऑपरेशल अँड टेक्निकल एक्झिेकेटिव्ह असा आपला व्यवसाय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आता हा व्यवसाय असतो काय? हा प्रश्न तुम्हाला पडेल.. पण म्हणतात ना ऋषीचे कुळ अन‌् मोठ्या माणसाच्या व्यवसायाचे मुळ शोधू नये म्हणून.

आपण अमित ठाकरेंची कागदोपत्री किती संपत्ती आहे हे पाहू…

अमित ठाकरे यांच्या नावावर जंगम मालमत्ता १२ कोटी ५४ लाख रुपयांची अाहे. तर त्यांची एकूण स्थावर मालमत्ता १ कोटी २९ लाख रुपयांची आहे. दोन्ही मिळून अमित हे सुमारे १४ कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या बँक खात्यात 40 लाख 99 हजार जमा आहेत. त्यांच्या नावावर एकूण ठेवी 6 कोटी 29 लाख रुपयांच्या आहेत. शेअर्स आणि म्युचअल फंडमध्ये त्यांची गंुतवणूक 3 कोटी 98 लाख रुपये आहे. पीपीएफमधील गुंतवणूक 20 लाख 37 हजार इतकी आहे. कर्ज दिल्यानंतर मिळणारा लाभापोटी त्यांना वडील राज ठाकरे यांच्याकडून 84 लाख 44 हजार रुपये मिळाल्याची माहिती शपथपत्रात देण्यात आली अाहे. तुम्हाला माहिती अाहे का.. राजपूत्र असलेल्या अमित याच्या नावावर एकही वाहन नाही. पण इतकी श्रीमंती पाहून हुरळून जाऊ नका. कारण या राजपुत्राच्या डोक्यावर 4 कोटी 19 लाख रुपयांचे कर्जही आहे. एकविरा ट्रस्ट, मधुवंती ठाकरे, शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे, मिताली ठाकरे यांच्याकडून त्याने ही रक्कम घेतली आहे. ही माहिती स्वत: अमित ठाकरे यांनी शपथपत्राद्वारे निवडणूक आयोगाला दिलेली असल्यामुळे ती खरी आहे असे आपण मानू या..

आता त्यांचे चुलत बंधू आदित्य ठाकरेंच्या मालमत्तेचा तपशील आपण पाहू या…

निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आदित्य ठाकरे यांनी आपल्याकडे १५ कोटींची जंगम मालमत्ता व ६ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. म्हणजे एकूण २१ कोटींच्या संपत्तीचे ते मालक आहेत. अर्थात अमित यांच्यापेक्षा ७ कोटींनी अादित्य श्रीमंत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आदित्य ठाकरे यांनी त्यांचा व्यवसाय सामाजिक आणि राजकीय सेवा दिला आहे. त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत हा व्याज, भाडे, डिव्हिडंट आणि पगार असा नमूद केला आहे. मात्र ते नोकरी कुठे करतात याचा उल्लेख शपथपत्रात शोधूनही सापडला नाही. आदित्य ठाकरेंनी 43 लाखांचे कर्जही घेतल्याचेही नमूद केले आहे. त्यांच्या नावावर एक BMW कार देखील आहे. त्यांच्याकडे असलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत 1 कोटी 91 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून ठाकरे कुटुंबाकडे सोनं आणि चांदीचे सुमारे 84 लाख 3 हजाराचे दागिने आहेत. यात ३ लाख ९० हजार रुपयांचे सोने व हिऱ्याचे ब्रेसलेटही आहे. १ कोटी ३३ लाख रुपये किमतीचा रत्नजडीत हार सुद्धा आदित्य ठाकरेंच्या मालकीचा आहे.

एकूणच अमित ठाकरेंपेक्षा अादित्य हे जास्तच श्रीमंत असल्याचे दिसून येते. अर्थात पाच वर्षे आमदार व अडीच वर्षे मंत्रिपदाची ‘श्रीमंती’ही त्यांच्या नावामागे आहेच. अमित आता कुठे राजकारणाच्या मैदानात उतरलाय. यावेळी तो आमदार झाला अन‌् जर मंत्रिपदाची लॉटरी लाग‌ण्यासारखे मनसेचे डावपेच यशस्वी झाले तर पुढच्या ५ वर्षात मात्र अमित हा अादित्य यांनाही मागे टाकेल, अशी शक्यता गृहित धरली तरी वावगे ठरणार नाही. अर्थात अमितच्या व्यवसायातही पुढच्या ५ वर्षात भरभराटी होवो व त्यांचे उत्पन्न वाढो याच आमची यामागे शुभेच्छा अाहेत, दुसरं काय?