मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताठरपणा सर्वश्रूत आहे. म्हणूनच त्यांच्या फारसे जवळ जाण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. मात्र आता स्वत: राज ठाकरेंनाच आपल्या मुलाच्या विजयासाठी भाजप व शिंदेसेनेच्या मदतीची गरज भासू लागलीय. पण त्यांचा ताठरपणा काही जात नाही. शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांनी माहिममधून अमित ठाकरेंसाठी माघार घ्यावी यासाठी भाजपकडून दबाव वाढत होता. पण सरवणकर मात्र जागा सोडायला तयार नव्हते. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सरवणकरांनी आपला मुलगा समाधान याला राज ठाकरेंच्या भेटीसाठी पाठवले, पण राज ठाकरेंनी काही त्यांना भेट दिली नाही. झालं.. सरवणकरांचाही इगो हर्ट झाला. त्यांनी आधी माघारीची तयारी ठेवली होती, पण राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाला जी अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. आता अमित ठाकरेंना पराभूत करुच, असा चंग सरवणकरांनी बांधला आहे. माहिमच्या जागेवरुन भाजप- शिंदेसेनही कसा तणाव निर्माण झाला आहे ते जाणून घेऊया मिशन पॉलिटिक्समधून..
सरवणकर भूमिकेवर ठाम…
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहिममधून यावेळी राज ठाकरेंनी आपले पूत्र अमित यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. भाजप व शिंदेसेनेशी आधीपासूनच ‘सेटिंग’ असल्यामुळे आपल्या मुलाचा विजय सुकर होईल, अशी राज ठाकरेंना अपेक्षा होती. भाजपने तसा शब्दही त्यांना दिला होता. त्यामुळे जेव्हा अमित यांनी उमेदवारी जाहीर केली तेव्हाच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आधी त्यांना पाठिंब्याचा प्रस्ताव शिंदेसेनेसमोर ठेवला. पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्या प्रस्तावाला अनुमाेदन दिले. शिंदेसेनेचे नेते व स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र ही जागा सोडण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी भाजपला वरवर आपण तयार असल्याचे दाखवले पण दुसरीकडे त्यांचे उमेदवार आमदार सदा सरवणकर यांना लढण्यासाठी प्रोत्साहनही दिले. त्यामुळे सरवणकर माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम राहिले.
राज ठाकरेही संतापले…
भाजपच्या विनंतीवरुन शिंदेसेनेेचे मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका वटवण्याचा प्रयत्न केला. पण ते तोंडघशी पडले. आधी त्यांनी सरवणकर यांची भेट घेऊन त्यांना माघार घेण्यास राजी करण्याचा प्रयत्न केला. पण सरवणकरांनी ‘तुमचा मतदारसंघ मनसेला द्या,’ असे सांगून केसरकरांनाच सुनावले. दुसरीकडे राज ठाकरेंना भेटायला गेलेल्या केसरकरांना त्यांनीही भेट दिली नाही, त्यामुळे ते तोंडघशी पडले. नंतर त्यांनी मध्यस्थीचा नाद सोडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भाजपकडून दबाव वाढत होता, मात्र त्यांनी या दबावाला जुमानले नाही. माहिमची जागा आम्ही सोडली तर उद्धव सेनेच्या उमेदवाराला फायदा होईल, असे सांगून त्यांनी सरवणकरांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यामुळे भाजपचाही नाईलाज झाला. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनही ते आपल्या मुलासाठी एकही जागा सोडू शकत नाहीत, हे पाहून राज ठाकरेही संतापले. त्यांनी भाजप व शिंदेसेनेशी संपर्कच बंद केला.
अन् सरवणकरांचाही दुखावला इगो…
इकडे सदा सरवणकर यांनी सोशल मीडियातून एक पोस्ट लिहून राज ठाकरेंना बाळासाहेबांची आठवण करुन दिले. ‘आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आपल्या नातेवाईकासाठी एका सच्या शिवसैनिकाला मतदारसंघ सोडायला लावला नसता,’ अशी फटकारही ओढले. त्यामुळे राज आणखी नाराज झाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन सरवणकर माघारीस तयार झाले होते. त्यांनी हा निरोप देण्यासाठी आपले पूत्र समाधान यांना राज ठाकरेंच्या घरी पाठवले. मात्र ताठर स्वभावाच्या राज यांनी समाधान यांना भेटण्यास नकार दिला. ‘तुम्हाला काय लढायचे ते लढा. माझी अाता चर्चेची इच्छा नाही’ असे सांगून त्यांनी समाधान यांच्यासाठी दारे बंद केली. हा अपमान मनात ठेऊन समाधान घरी आले व त्यांनी सदा सरवणकरांना हा प्रकार सांगितला. मग सरवणकरांचाही इगो दुखावला. त्यांनी आता काहीही झाले तरी माघार घ्यायची नाही, असे ठासून सांगत उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे आता अमित ठाकरेंची अडचण झाली आहे.
राज ठाकरेंचा मान ठेवला असता…
आमदार सदा सरवणकर म्हणाले की, माझा मुलगा समाधान सरवणकर आणि महत्वाचे चार पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते, माझे वडील तुमच्याशी बोलू इच्छितात असे माझया मुलाने सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला चर्चा करायला सांगितलं आहे. पण मला काही बोलायचं नाही. तुम्ही निवडणूक लढणार असाल तर लढा असा निरोप राज ठाकरेंनी दिला. मुख्यमंत्रयांच्या सांगण्यावरून आम्ही जात असल्याने ते आम्हाला भेटतील असं वाटत होतं. पण ते आज भेटण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे काही समीकरणं त्यांना समजवावीत असं मला वाटलं होतं. पण त्यांनी भेट नाकारली. त्यामुळे विषय संपला. मी अमित ठाकरेंविरूध्द निवडणूक लढवणारच आहे. पुढे काय करायचं हे मतदार ठरवतील. राज ठाकरे काही बोलले असते तर त्यांच्या शब्दाचा मान ठेवला, पण काय करता त्यांनी भेटच नाकारली, अशी खंत सरवणकरांनी व्यक्त केली. सरवणकरांच्या या भूमिकेमुळे भाजपची काेंडी झाली आहे. मुंबईतील भाजपचे नेते आम्ही अमित ठाकरेंचाच प्रकार करणार असल्याचे सांगत आहेत. आणि जर महायुतीत जर काही दगाफटका झाला तर त्याचे परिणाम भाजपला इतर मतदारसंघात भोगावे लागू शकतात, असा इशारा शिंदेसेनेकडून दिला जात आहे. त्यामुळे युतीत विघ्न निर्माण झाले आहे. या वादाचे पडसाद मुंबईच्या इतर मतदारसंघावर पडतात काय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.