Ancient History of Chhattisgarh | दक्षिण कोसल!

प्राचिन भारताच्या तुलनेत आज अनेक राज्ये विकसित झालेली आहेत असे दिसून येते. अनेक शतकानंतर समाज बदलला, परिस्थिती बदलली आणि आधुनिकतेकडे जाताना पारंपरिक विचारसुद्धा बदलले. बदललेल्या परिस्थितीत सोयीसुविधेनुसार अनेक राज्यांचे विभाजन झाले आणि नवीन राज्ये अस्तित्वात आली. उदाहरणच द्यायचे झाल्यास महाराष्ट्रापासून गुजरातची निर्मिती झाली. आंध्र प्रदेशापासून तेलंगणाची निर्मिती झाली आणि मध्यप्रदेशपासून छत्तीसगड या राज्याची निर्मिती झाली. अनेक नवीन शहरांचीसुद्धा विभाजन झाले, निर्मिती झाली. असे जरी असले तरी त्या नवीन प्रदेशाला असलेल्या प्राचीनत्वाचा गौरवशाली इतिहास कधी नष्ट झालेला नाही आणि अनेकांना त्या इतिहासात रमून जायला आवडते. असाच आहे छत्तीसगडचा म्हणजे दक्षिण कोसलचा प्राचीन इतिहास.

मध्यप्रदेशाचा प्राचीन भाग असलेले आणि भारताच्या मध्यभागात वसलेले आजचे छत्तीसगड. उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश यांच्या सीमांच्या मध्यभागी वसलेले राज्य. १ नोव्हेंबर २००० मध्यप्रदेशातून विलग झालेले नवनिर्मित राज्य म्हणजे आताचे छत्तीसगड. प्राचीन काळातल्या ‘दक्षिण कोसल’ची ही पवित्र भूमी प्रभू रामचंद्राची आई ‘कौसल्या’ हिचे हे मुळस्थान असल्याने या भागाला आजही ‘कोसल प्रदेश’च म्हटले जाते. कोसलची कन्या म्हणून तिचे नाव ‘कौसल्या’ झाले असे म्हटल्या जाते. वनवासात असताना प्रभू रामचंद्राचासुद्धा स्पर्श या भूमीला झालेला, अशी मान्यता आहे.

येथील घनदाट जंगले आणि सुंदर वनराजी अनेक पर्यटकांना भुरळ घालते. खळखळ वाहणारे अनेक धबधबे, सर्वत्र डोंगररांगा, पुरातन लेण्या आणि आकर्षक स्मारके आणि मुख्य म्हणजे आदिवासींनी जपलेली सांस्कृतिक परंपरा, वेशभूषा हा येथील आकर्षणाचा केंद्र बिन्दु आहे. कला, हस्तकला,भाषा, धर्म, नृत्य, संगीत, अनेक धार्मिक कार्यक्रम आणि विविध सण यांनी परिपूर्ण असलेला हा प्रदेश म्हणजे लाखो करोडो आदिवासींचे श्रद्धास्थान. सुकमा, नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर, तिरथगड, चंपारण या जंगलाच्या घनदाट भागात फिरत असताना येथील आदिवासी समुदायासोबत परिचय होतो आणि इतिहासाचे एक एक सोनेरी पान उलगडले जाते.

या नैसर्गिक आणि खनिज संपन्नतेने नटलेल्या भूमीला ‘छत्तीसगड’ हे नाव देण्याचे श्रेय खर्‍या अर्थाने ‘नागपूरकर भोसल्यांना’ जाते. या ‘छत्तीसगड’ नावाचे जनक आहेत ते अठराव्या शतकातले नागपूरचे महाराज ‘बिंबाजीराजे भोसले’. रायपूर राजवटीत एकूण अठरा किल्ले होते आणि रतनपूर राजवटीत एकूण अठरा किल्ले होते. राजे बिंबाजी यांनी या दोन्ही राजवटींचे एकत्रीकरण केले आणि एकूण छत्तीस किल्ले झाले. किल्ल्याचा अर्थ होतो ‘गड’. त्यामुळेच त्यांनी या प्रदेशाचे नाव ‘छत्तीसगड’ ठेवले. इतकेच नव्हे तर १७९५ च्या सरकारी कागद पत्रात याचे पुरावे बघायला मिळतात. इंग्रज राजवटीतला एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ब्लॅक याने आपल्या पत्रात ‘छत्तीसगड’ म्हणून उल्लेख सर्वप्रथम केला. तसेच ‘नागपूरकर भोसल्यांची बखर’ या पुस्तकात सुद्धा ‘छत्तीसगड’ नावाचा उल्लेख बघायला मिळतो. अठराव्या शतकात मराठ्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार भारतभर केला आणि पवित्र भगवा फडकावला. यात नागपूरचे महाराज रघुजीराजे भोसले यांचे फार मोठे योगदान होते. त्यांना पहिले जानोजी, दुसरे मुधोजी, तिसरे बिंबाजी आणि चौथे साबाजी असे चार सुपुत्र होते. रघुजी राजेंचे तिसर्‍या क्रमांकाचे सुपुत्र असलेले बिंबाजी महाराज यांच्या वाट्याला सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने राज्यकारभार करण्याकरिता छत्तीसगड हे राज्य आले आणि त्यांनी येथील विकासावर सर्वप्रथम भर दिला. बिंबाजी हे अत्यंत सक्त प्रशासक होते. ते जितके सक्त होते तितकेच ते कनवाळुसुद्धा होते. या भागात त्यांनी ‘मोडी’ आणि मराठी भाषा प्रबल करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून साहित्य, कला आणि संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. आज दसर्‍याला आपण आपट्याची पाने ही सोने म्हणून देतो. पण बिम्बाजींनी ‘सुवर्णपत्र’ देण्याची प्रथा सुरू केली. खंडोबा मंदिर, रामटेकडी, तुळजाभवानी मंदिर अशा अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि अनेक भव्य वास्तुंची निर्मिती केली. त्यामुळे बिंबाजींचा काळ हा कोसल प्रदेशातला ‘सुवर्णकाळ’ मानला जातो. १७८७ मध्ये बिंबाजींच्या निधनाच्या वेळी युरोपिय प्रवासी ‘कॉल ब्रूक’ हे कोसल प्रदेशात होते. ते म्हणतात, बिंबाजी राजे हे एक महान आणि लोककल्याणकारी राजे होते. यावरुन बिंबाजी हे किती लोकप्रिय होते, याचा अंदाज येतो. बिंबाजी राजेंची समाधी आणि सती स्तंभ छत्तीसगडच्या गिरियाबंद जिल्ह्यातल्या ‘नर्रा’ गावात असून ओरिसाच्या सीमेलगत हे गाव आहे, जे रायपूर पासून १२० किमी दूर आहे. १७५८ ते १७८७ पर्यंत छत्तीसगडवर शासन करून एका आक्रमणात एक ‘जहरी तीर’ लागून ‘नर्रा’ या गावात बिंबाजीचा मृत्यू झाला. हा साम्राज्य विस्ताराचा वारसा बिंबाजींना आपल्या पूर्वजांकडून मिळाला. या विस्तारात नागपूरचे महाराज रघुजीराजे भोसले यांचे मोठे योगदान होते. त्यांच्याच नेतृत्वात मराठ्यांनी दक्षिण भारतापासून बंगाल, ओरिसापर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. छत्तीसगडच्या बाराशे वर्षाच्या कलचुरी राजवंशाचे साम्राज्य राजे रघुजी भोसले १७४१ ते १७४५ च्या दरम्यान आक्रमण करून उद्ध्वस्त केले आणि कलचुरी राजवंशाचे पतन झाले. कारण ते मुघलांच्या अंतर्गत मदतीने शासन चालवीत होते. रघुनाथसिंग आणि अमरसिंग हे कलचुरी वंशाचे शासक मराठ्यांना शरण आले. छत्तीसगडवर मराठ्यांचा स्वतंत्र अमल सुरू झाला. पुढे १४ फेब्रुवारी १७५५ ला राजे रघुजी भोसले यांचे निधन झाले आणि मराठ्यांच्या एका महान नेतृत्वाचा अंत झाला. एकूण ११४ वर्षे म्हणजे १७४१ ते १८५४ पर्यंत (मधल्या राजवटीचा काही ब्रिटिश काळ सोडून) छत्तीसगडवर बिंबाजी, चिमाजी, व्यंकोजी, पुरुषाजी आणि आप्पाजी या पाच मराठा राजांनी राज्य केले. १८५४ नंतर नागपूरचा ब्रिटिश साम्राज्यात विलय झाला आणि मराठ्यांचे शासन समाप्त झाले. छत्तीसगडमध्ये फक्त मराठ्यांचेच साम्राज्य असल्याने आणि मराठ्यांचे आक्रमण, परिवर्तन, शासन यामुळे या प्रदेशाला मराठ्यांचा प्रथम शासक बिंबाजींनी ‘रतनपूर’ या मराठ्यांच्या प्रथम राजधानीची स्थापना करून नवीन ओळख निर्माण करून दिली.

आजही नागपूरचे रघुजीराजे भोसले यांचे वंशज असलेले राजे मुधोजी भोसले यांना नागपूरचे महाराजा; हा विशेष शासकीय बहुमान ध्व्जासह प्राप्त आहे.

आज छत्तीसगडच्या जगदलपूर, बस्तर, नारायणपूर, दंतेवाडा, सुकमा, राजीम, चंपारण, तिरथगड, कांकेर अशा अनेक घनदाट जंगलातल्या शहरात फिरताना असंख्य प्राचीन मंदिरे, पुरातन मूर्ती, पारंपरिक शिल्पकला, हस्त कलाकृती, ऐतिहासिक स्थळे आणि मुख्य म्हणजे ‘आदिवासी संस्कृती’ यांचे जागोजागी दर्शन होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics