आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची कहाणी सांगणार आहे जी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. ही कहाणी आहे अरविंद श्रीनिवास यांची. ते परप्लेक्सिटी एआय या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअपचे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. केवळ दोन वर्षांत त्यांच्या या स्टार्टअपने आठ बिलीयन डॉलर्स म्हणजेच ७० हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. कोण आहेत अरविंद श्रीनिवास समजून घेऊ या मिशन पॉलिटिक्सच्या माध्यमातून…
अन् त्या अनुभवाने श्रीनिवास एआयच्या खोलवर जाण्यास झाले प्रेरित…

अरविंद श्रीनिवास यांचा जन्म 7 जून 1994 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अरविंद श्रीनिवास लक्ष्मीनारायणन असे आहे. त्यांचे कुटुंब ज्ञानाला पैशांपेक्षा जास्त महत्त्व देणारे होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड होती. अरविंद यांचे बालपण चेन्नईमध्ये गेले. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले. शालेय जीवनात त्यांनी भारत सरकारची राष्ट्रीय प्रतिभा शोध (NTS) योजनेची शिष्यवृत्ती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (KVPY) शिष्यवृत्ती मिळवली. त्याचबरोबर त्यांनी भारतीय राष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड (INMO) मध्ये गुणवत्ता पुरस्कार जिंकला. अरविंद यांच्या कुटुंबाने त्यांना नेहमीच ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहित केले. त्यांना विकिपीडिया आणि ज्ञानकोश वाचण्याची आवड होती. या वातावरणाने त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती आणि शिकण्याची उत्कट इच्छा निर्माण केली, जी त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली. एका मित्राने त्यांना मशीन लर्निंग स्पर्धेबद्दल सांगितले. या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि ती त्यांनी जिंकलीदेखील. या अनुभवाने त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आणखी खोलवर जाण्यास प्रेरित केले.
याच झपाटलेल्या विचारातून झाला परप्लेक्सिटी एआयचा जन्म…

पदवी प्राप्त केल्यानंतर, अरविंद अमेरिकेत गेले आणि त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे संगणक शास्त्रात पीएचडी केली. त्यांचे संशोधन कॉम्प्युटर व्हिजन, कॉन्ट्रास्टिव्ह लर्निंग आणि ट्रान्सफॉर्मर मॉडेल्सवर केंद्रित होते. या काळात त्यांनी अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप केली. अरविंद यांनी 2018 मध्ये ओपनएआय येथे रीइन्फोर्समेंट लर्निंगवर काम केले. 2019 मध्ये डीपमाइंड, लंडन येथे कॉन्ट्रास्टिव्ह लर्निंगवर काम केले. 2020-2021 मध्ये गूगल येथे HaloNet आणि ResNet-RS सारख्या व्हिजन मॉडेल्सवर काम केले. पीएचडी पूर्ण केल्यानंतर, अरविंद ओपनएआयमध्ये संशोधक म्हणून परतले. इथे ते DALL-E 2 या क्रांतिकारक टेक्स्ट-टू-इमेज जनरेटरच्या टीमचा ते भाग होते. ऑगस्ट 2022 मध्ये, अरविंद यांनी डेनिस यारॅट्स आणि अँडी कोन्विन्स्की यांच्यासोबत परप्लेक्सिटी एआयची स्थापना केली. त्यांचे ध्येय काय होते? AI-संचालित चॅट-आधारित शोध इंजिन तयार करणे जे वापरकर्त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देईल. याच झपाटलेल्या विचारातून परप्लेक्सिटी एआयचा जन्म झाला.
परप्लेक्सिटी हे विकिपीडिया आणि चॅटजीपीटीचे मिश्रण?

अरविंद श्रीनिवास यांनी मोठे स्वप्न पाहिले आणि गूगलसारख्या दिग्गज कंपनीला आव्हान दिले. त्यांनी परप्लेक्सिटी एआय या स्टार्टअपची स्थापना केली, तेव्हा कोणीही विचार करत नव्हते की चॅटबॉट्स शोध इंजिनांची जागा घेतील. आज ते गुगल हाच आपला स्पर्धक असल्याचे मानतात. अरविंद यांच्या दृष्टीने, परप्लेक्सिटी हे विकिपीडिया आणि चॅटजीपीटीचे मिश्रण आहे. ते वापरकर्त्यांना थेट उत्तरे देते, जी वेबवरील स्रोतांद्वारे समर्थित असतात. हा दृष्टिकोन पारंपारिक शोध इंजिनांपेक्षा वेगळा आहे, जे केवळ दुवे देतात.
परप्लेक्सिटी एआयचे वैशिष्ट्य काय?
परप्लेक्सिटी एआय हे पारंपारिक शोध इंजिनपेक्षा वेगळे आहे.
वापरकर्ते सामान्य भाषेत प्रश्न विचारू शकतात.
दहा निळ्या दुव्यांऐवजी, AI तात्काळ उत्तरे देते.
प्रत्येक वाक्याला संदर्भ दिला जातो. यामुळे विश्वासार्हता वाढते.
या सर्व बाबी वापरकर्त्यांना त्यांचे प्रश्न स्पष्ट करण्यास मदत करतात.

‘परप्लेक्सिटी एआय’ने अनेक माईल स्टोन पूर्ण केले आहेत.
परप्लेक्सिटी एआयने अल्पावधीत प्रचंड वाढ अनुभवली आहे:
लाँच दिवशी 2,000-3,000 क्वेरीज होत्या.
सध्या ही संख्या दररोज 3-4 दशलक्ष क्वेरीजवर पोहचली आहे.
एका वर्षात साधारण 1000 पटीने वाढ झाली आहे.
सुमारे 10 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.
या अभूतपूर्व यशामुळे, परप्लेक्सिटी एआयने केवळ दोन वर्षांत $8 अब्ज मूल्यांकन गाठले आहे.
आपल्या रुपयांत सांगायचे तर ७०हजार कोटींचा टप्पा या स्टार्टअपने गाठला आहे.
अरविंद यांचे नेतृत्व तत्त्वज्ञान

अरविंद यांच्या यशाचे गमक त्यांचे व्यवस्थापन आहे. स्टार्टअपमध्ये येण्याचा विचार करणाऱ्या युवकांनी त्यांचे हे व्यवस्थापन आत्मसात करायला हवं. एका वेळी फक्त एका किंवा दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हा अरविंद यांचा नेहमी फोकस राहिला आहे. गुणवत्तेच्या बाबतीतदेखील ते तवढेच आग्रही आहेत.उच्च दर्जाच्या उत्पादनांवर त्यांचा नेहमी भर राहिला आहे.
कार्यसंस्कृती जलद आणि कार्यक्षम ठेवणे याला अरविंद प्राधान्य देतात. पैसे कमावण्यापेक्षा मिशनवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.तसे केले तर पैसा आपोआप मिळतो, असे ते सांग़तात. त्यांनी ते सिद्धही केले आहे.
आवडीचे क्षेत्र निवडा. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करा. जोखीम घ्या. कठीण परिश्रम करा. नवकल्पना आणि दृढ निश्चय यांच्या जोरावर मोठे यश मिळवा… अरविंद श्रीनिवास यांची ही कहाणी आपल्याला हेच तर सांगते.