ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; 2 कोटींचा ऐवज लुटला, बंदुकीच्या धाकाने कर्मचाऱ्यांनाही डांबले
धाराशिव : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर शनिवारी सशस्त्र दरोडा टाकून लाखोंच्या सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. चोरलेल्या मुद्देमालाची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास हा दरोडा पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी सांयकाळच्या सुमारास बँकेत प्रवेश केला. बंदुकीचा धाक दाखवून सर्व कर्मचाऱ्यांना डांबून घातले. त्यानंतर सोन्यासह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा सर्व थरार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चार दरोडेखोर सीसीटीव्हीत दिसत आहेत. सायंकाळच्या सुमारास या बँकेतील कर्मचारी काम करत असतानाच अज्ञात पाच व्यक्ती बँकेत घुसले. त्यांनी आपल्याकडील पिस्तुल तसेच चाकूचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. यानंतर काही क्षणातच सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड घेऊन पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.