लोकसभा निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यामुळे आता विधानसभेसाठीही आघाडीने या भागात जोरदार तयारी सुुरु केली आहे. मुंबईतील ३६ पैकी २० जागांवर उद्धव सेनेने दावा केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसलाही १८ जागा हव्या आहेत. हा वाद अजून मिटलेला नाही. मात्र यंदा काहीही झाले तरी भाजप व शिंदेसेनेचे दिग्गज उमेदवार पाडायचे याची संयुक्त रणनिती काँग्रेस व उद्धव सेनेने आखली आहे. त्यात उद्धव सेनेवर कायम जोरदार टीका करणारे भाजपचे आमदार आशिष शेलार यांना घेरण्याची रणनिती आखण्यात आली आहे. त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात यावेळी काँग्रेसकडून माजी खासदार प्रिया सुनील दत्त यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. दत्त यांना मानणारा मोठा वर्ग या भागात असल्याने यावेळी शेलार यांची विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. काय आहे मागची खेळी जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून..
हॅटट्रीक करण्यासाठी शेलार मैदानात…
मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष व केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे विश्वासू कार्यकर्ते अशी अोळख असलेले भाजप आमदार आशिष शेलार हे मुंबईच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. आता हॅटट्रीक साधण्यासाठी ते २०२४ ची निवडणूक लढवणार आहेत. एक फायरब्रॅन्ड नेते म्हणून त्यांची मुंबईत ओळख आहे. २०१४ मध्ये जेव्हा भाजप व शिवसेना सर्वप्रथम स्वबळावर लढले तेव्हापासून मुंबईत शेलार हे भाजपातील एकमेव नेते आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंना अंगावर घेण्याची धमक दाखवली. नंतर २०१४ च्या निवडणूक निकालांनतर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले तरी शेलार यांनी ठाकरेंचा समाचार घेणे सोडले नव्हते. नंतर झालेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीतही भाजप स्वतंत्र लढली तेव्हा ठाकरेंच्या सेनेला कडवे आव्हान देत भाजपने स्वबळावर शिवसेनेपेक्षा फक्त दोनच कमी नगरसेवक निवडून आणले. तेव्हा काहीही करी आपला महापौर बसवायचा असा चंग शेलार यांनी बांधला होता. पण युतीच्या सरकारमध्ये अडचणी यायला नकोत म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव सेनेला बाय देत महापौरपदावरची भाजपचा दावा सोडून दिला. शेलार यांना नाईलाजाने हा निर्णय मान्य करावा लागला. मात्र तेव्हापासून आजतागायत शेलार उद्धव व आदित्य ठाकरेंवर भरपूर तोंडसुख घेत असतात.
तेव्हापासून प्रिया दत्त राजकारणापासून दूर…
याच शेलारांना आता विधानसभेला घेरायचे उद्धव सेनेने व काँग्रेसने ठरवले आहे. त्यासाठी काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना शेलार यांच्याविरोधात विधानसभेला मैदानात उतरवण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. शेलार यांचा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा उत्तर मध्य मुंबई लोकसभेत येतो. याच मतदारसंघातून पूर्वी प्रिया दत्त खासदार झाल्या होत्या.मात्र २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा झटका बसला होता. तेव्हापासून प्रिया राजकारणातून दूर आहेत. यावेळी दत्त यांच्या मतदारसंघातून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढवली. त्यांनी भाजपचे अॅड. उज्वल निकम यांचा पराभव केला. या निवडणूकीत शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. १० वर्षे शेलार तेथून आमदार आहेत तरी ते भाजपचे उमेदवार निकम यांना फक्त ३६०० हजारांची लीड देऊ शकले. २०१९ च्या तुलनेत या मतदारसंघात काँग्रेसची मते चांगलीच वाढली. त्यामुळे हा मतदारसंघ आपण जिंकू शकतो असा आत्मविश्वास काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे. त्यातही उद्धव सेनेचे बळ आता काँग्रेसच्या पाठीशी असल्यामुळे विधानसभेला आपण आशिष शेलार यांनाही हरवू शकतो, असा विश्वास काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच वर्षा गायकवाड यांनी थेट प्रिया दत्त यांच्या घरी जाऊन त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची राजी केल्याची माहिती आहे. यानुसार प्रिया दत्त पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंची ताकदही दत्त यांच्या पाठीशी…
प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते व खासदार सुनील दत्त यांच्या कन्या अाहेत. त्यांच्या कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. मुस्लिम, ख्रिश्चन ही पारंपारिक मते दत्त परिवाराचे संबंध व काँग्रेसमुळे प्रिया यांना मिळू शकतात. वांद्रेतील उच्चभ्रू वसाहतींमध्येही दत्त यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे हिंदू मतदारही त्यांच्याकडे ओढला जाऊ शकतो. तसेच उद्धव सेनेची ताकदही दत्त यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. त्यामुळे प्रिया दत्त यांच्यासारखी सक्षम उमेदवार व काँग्रेस- उद्धव सेनेच्या पाठबळावर आशिष शेलार यांची हॅटट्रीक रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनिती आखली जात आहे. यात ते कितपत यशस्वी होतील, हे निकालानंतर कळेलच. पण आशिष शेलार यांच्यासारखा भाजपचा दिग्गज नेता दरवेळी फक्त निवडणूकीच्या वेळीच पक्षात सक्रिय होणाऱ्या प्रिया दत्त यांच्याकडून पराभूत होऊ शकेल का? याबाबत तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.