अशोक चव्हाणांची काँग्रेसमध्ये सेटिंग; मुलीविरोधात आपलाच कार्यकर्ता

महाविकास आघाडी व महायुतीतील ५ प्रमुख पक्षांनी जागावाटप जाहीर होण्याची वाट न पाहता आपापले उमेदवार जाहीर करुन टाकले. काँग्रेसच त्यात मागे पडली होती. जागावाटपातील वाद मिटवण्यावरच त्यांचे जास्त लक्ष होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर नेतेमंडळी त्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसली होती. मात्र उशिरा का होईना २५ ऑक्टोबर रोजी काँग्रेसनेही आपली ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात २६ विद्यमान आमदारांना स्थान दिले आहे. मात्र जालन्याचे अामदार कैलास गोरंट्याल यांच्यासह इतर ५ विद्यमान आमदारांची नावे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अशोक चव्हाणांसोबत किंवा त्यापूर्वी जे आमदार पक्ष सोडून गेले त्यांच्या जागी पक्षाने निष्ठावंतांमधून नवीन चेहरे दिले आहेत. कोणी मिळवले अाहे काँग्रेसच्या पहिल्या यादीत स्थान व त्यांच्या उमेदवारी मागची गणिते समजून घेऊ या..

कोंडेकर अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक…

अपेक्षेप्रमाणे कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, साकोलीतून नाना पटोले, ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार, पलूस- कडेगावमधून विश्वजित पतंगराव कदम, लातूर शहर व ग्रामीण मतदारंसघांमधून अनुक्रमे अमित देशमुख व धीरज देशमुख या विलासरावांचे दोन्ही पूत्रांची नावे पहिल्या यादीत आहेत. २०१९ मध्ये मराठवाड्यातून काँग्रेसचे ७ आमदार निवडून आले होते. त्यापैकी चार आमदारांचीच नावे पहिल्या यादीत आहेत. आश्चर्य म्हणजे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांचे नाव पहिल्या यादीत नाही. हदगावमधून माधवराव पाटील जवळगावकर, पाथरीतून सुरेश वरपुडकर, लातूर शहरमधून अमित देशमुख, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख या विद्यमान आमदारांची नावे यादीत आहेत. याशिवाय भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांच्या भोकरमधून तिरुपती (पप्पू) बाबूराव कदम कोंडेकर यांना उमेदवारी दिली. त्यांची लढत अशोकरावांच्या कन्या श्रीजया यांच्याशी होईल. कोंडेकर हे अशोक चव्हाणांचेच कट्टर समर्थक आहेत. त्यांच्यासोबत कोंडेकरही भाजपात जातील अशी चर्चा होती. पण ते पक्षातच थांबले. मात्र आता आपली मुलगी श्रीजया यांचा मार्ग सूकर होण्यासाठी अशोकरावांनी आपल्याच जुन्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवून दिली काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

भास्करराव पाटील खतगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये…

अशोक चव्हाणांसोबत भाजपात गेलेले भास्करराव पाटील खतगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यांच्या सुनबाई मीनल यांना नायगावातून उमेदवारी देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत विलास केशवराव औताडे यांना संधी दिली आहे. त्यांचा सामना भाजपच्या अनुराधा चव्हाण यांच्याशी होईल. काँग्रेसच्या पहिल्या यादीत ५ अनुसुचित जमातीचे तर २ अनुसुचित जातीचे उमेदवार आहेत. यशोमती ठाकूरसह ३ महिलांनाही स्थान दिले आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा व नुकत्याच निवडून आलेल्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या बहिण ज्ंयोती गायकवाड यांना धारावीतून तिकिट दिले आहे. पूर्वी वर्षा या भागाच्या आमदार होत्या, त्यांची जागा घरातच देण्यात आली आहे. भाजपातून आलेले राजेंद्र गावित यांनाही शहाद्यातून उमेदवारी दिली आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसने पुन्हा प्रफुल गुडघे पाटील यांनाच संधी दिली. २०१४ मध्ये फडणवीस यांनी त्यांना पराभूत केले होते. विदर्भ व मुंबईतील ज्या जागांवरुन काँग्रेसचे उद्धव सेनेशी वाद आहेत त्या जागांवरील उमेदवार होल्डवर ठेवले आहेत. दुसऱ्या यादीत ती नावे जाहीर केली जातील, असे पक्षातून सांगण्यात आले.