महायुतीचे मित्रपक्ष बच्चू कडू, महादेव जानकर, सदाभाऊ खोत भाजपवर नाराज

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच भाजपला आपल्या छोट्या मित्रपक्षांची आठवण आली. ५ जानेवारी रोजी रात्री मुंबईत महायुतीच्या सर्व ११ घटक पक्षांची बैठक घेण्यात आली. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule,), राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सुनील तटकरे (sunil tatkare), आमदार रवी राणा (ravi rana), सदाभाऊ खोत (sadabhau khot), आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आदी उपस्थित होते.

या बैठकीत बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या आहेत, हे आपले उद्दिष्ट सांगून सर्व घटकपक्षांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र आम्हाला किती जागा देणार? सत्ता असूनही आमची कामे का होत नाहीत या घटक पक्षांच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर मात्र बावनकुळे देऊ शकले नाहीत. त्यांनी दिल्लीकडे बोट दाखवून वेळ मारुन नेली.

मुळातच, राज्यात शिंदे गट व अजित पवार गट या दोन मोठ्या पक्षांची ताकद सोबत आल्यापासून भाजपला छोट्या घटक पक्षांची किमत वाटत नाही. त्यामुळेच आतापर्यंत हा पक्षांचा विसर त्यांना पडला होता. मात्र आता लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने समन्वय समितीच्या बैठकीची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात आहे का? असा प्रश्न बैठकीत विचारल्याचे एका घटक पक्षाच्या सदस्याने सांगितले.

दुसरीकडे, आमदार बच्चू कडू यांनीही सर्वच मित्रपक्ष नाराज असल्याचे कबूल केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘ज्या दिवशी बैठक ठेवली त्यादिवशी सकाळी मला मेसेज मिळाला. बैठकीचा अजेंडा आधी कळवला जात नाही. मित्रपक्षांना गृहित धरुन भाजपचे काम सुरु आहे. हे चुकीचे आहे. आम्ही लहान पक्ष असलो तरी आमचे स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा देणार ते भाजपने स्पष्ट करायला हवे. जिल्हा नियोजन समित्या असो की निराधार योजना, या संदर्भात आम्हाला विचारले जात नाही. त्यामुळे सर्वच घटकपक्ष नाराज आहेत.’

मुख्यमंत्र्यांनी बोलवावी बैठक

आमदार कडू म्हणाले, ‘खरे तर घटक पक्षांची बैठक मुख्यंमत्र्यांनी बोलावून आमचे मत जाणून घ्यायला हवे. मुख्यमंत्री आता महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्यापूर्वी तरी त्यांनी मित्रपक्षांशी चर्चा करुन त्यांचे मुद्दे जाणून घ्यावेत, अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली.

जानकर, खोत पडले अडगळीला

२०१४ मध्ये शिवसेनेशी काडीमोड घेताना भाजपने महादेव जानकर (mahadev jankar), सदाभाऊ खोत, रामदास आठवले (ramdas aathwale) या नेत्यांचे पक्ष सोबत घेतले होते. नंतर आठवले यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्री केले. सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांनाही विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपदे देण्यात आली. २०१९ मध्येही हे मित्रपक्ष सोबत होते. मात्र आता २०२२ मध्ये ठाकरेंचे सरकार पायउतार करण्यासाठी शिंदे गट सोबत आला व त्यानंतर अजित पवार गटाचीही भक्कम ताकद मिळाल्यामुळे भाजपला सदाभाऊ खोत, जानकर यांचा विसर पडल्याचे दिसते. मध्यंतरी नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनडीएची बैठक घेतली त्याचे निमंत्रणही खोत यांना नव्हते. आता महायुतीच्या सरकारमध्येही या छोट्या मित्रपक्षांना कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. म्हणून ही नेतेमंडळी नाराज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics