मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आ. बच्चू कडूंची भाजपचा ‘गेम’ करण्याची धमकी

अमरावती : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत उद्धव ठाकरेविरोधी बंडात सहभागी असलेले व मविआ सरकारमधील मंत्रिपदावर पाणी सोडून महायुतीला पाठिंबा देणारे अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू वर्षभरातच भाजपवर प्रचंड नाराज झालेले आहेत. १४ जानेवारी रोजी अमरावतीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्याकडेही त्यांनी पाठ फिरवली. ‘केवळ आम्हाला वापरुन घेण्याची भाजपची भूमिका दिसतेय. असे केल्यास आम्हीही गेम करू, आम्हाला गृहित धरु नका’ असा खणखणीत इशारा आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी भाजपला दिला.

निमंत्रण असूनही महायुतीच्या मेळाव्यास न जाण्याचे कारण सांगताना आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) म्हणाले, ‘आम्ही सत्तेसाठी शिवसेना- भाजपला पाठिंबा दिला. पण त्याबदल्यात आम्हाला काय मिळाले. आमची प्रहार पक्षाची दोन नगर पंचायतीत सत्ता आहे. अनेक ग्रामपंचायतीतही सत्ता आहे. मात्र त्यांना विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे यापुढे आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सत्तेत आहोत. मात्र कोणत्याही जिल्हा नियेाजन समितीवर आमच्या पक्षाचे सदस्य घेतलेले नाहीत.  संजय गांधी निराधार योजनेवरही आमच्या लोकांना स्थान मिळत नाही.

भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची आहे, तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यासाठी विकास निधी मिळायला हवा. तसेच महायुतीत लोकसभेबरोबरच विधानसभेतही कुठल्या जागा कुणाला असतील हे आताच स्पष्ट करायला हवे. जोपर्यंत हे ठरत नाही तोपर्यंत आमची भूमिका तटस्थच राहणार. आम्ही अजूनही वाट पाहू. पण केवळ आमची वापर करुन घेतला जात असेल तर मात्र ‘गेम’ करू, असा कडक इशारा आमदार कडू (Bacchu kadu) यांनी भाजपला दिला आहे.

बच्चू कडूंच्या नाराजीचे कारण मंत्रिपद

उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) बच्चू कडू (Bacchu kadu) यांना शिक्षण राज्यमंत्रिपद दिले होते. मात्र एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाची चाहूल लागताच तेही मंत्रिपद सोडून शिंदेंसोबत गुवाहटीला गेले. नंतर राज्यात शिंदेंचे सरकार आले, मात्र बच्चू कडू यांना मात्र मंत्रिपद मिळाले नाही. कडू हे दिव्यांगांसाठी काम करतात. त्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंडळ स्थापन करुन त्याचे अध्यक्षपद आमदार कडू (Bacchu kadu) यांना दिले. या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. मात्र त्यावर कडू खुश नाहीत. ना या कार्यालयात अध्यक्षांना बसायला जागा आहे ना दिव्यांगच्या कल्याणासाठी पुरेसा निधी. त्यामुळे हे पद म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ असल्याचे कडू वारंवार सांगत आले आहेत. किमान आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तरी आपल्याला संधी मिळावी, यासाठी आपल्याच सरकारविरोधात वारंवार ‘कडवट’ बोलून ते दबाव आणत असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.

रवी राणा- नवनीत राणांवरही राग

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) हे दांपत्य आमदार बच्चू कडू यांचे राजकीय शत्रू. अनेकदा त्यांनी एकमेकांविरोधात पातळी सोडून टीका केली आहे.

भाजप- शिवसेना वेगळे झाल्यापासून राणा दांपत्यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका सुरु केली. हनुमान चालीसाचे प्रखर आंदोलनही केले. त्यामुळे ‘ठाकरेविरोधी’ प्रतिमा असलेले हे दांपत्य आता भाजपचे विश्वासू बनले आहे. अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा यांना भाजप पुन्हा अमरावतीतून उमेदवारी देणार आहे. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्या प्रहार पक्षाने अमरावती लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये अमरावतीत राजकीय वाद उद‌्भवण्याची चिन्हे आहेत. तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांच्यासाठी आमदार रवी राणा (Ravi Rana) हेही स्पर्धक मानले जातात. एकाच जिल्ह्यातून दोघांना मंत्रिपद मिळू शकत नसल्याने आपला पत्ता कट होण्याची भीती दोघांनाही वाटते.

अजितदादांना विरोध

महाविकास आघाडीतून बाहेर पडताना आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी आम्हाला पुरेसा निधी मिळत नसल्याचे तक्रार तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना उद्देशून केली होती. मात्र कालांतराने महायुती सरकारमध्येही अजित पवार यांच्याकडेच अर्थखाते आले. जेव्हा याबाबत चर्चा सुरु झाल्या तेव्हा अजितदादांना अर्थ खाते देण्यास बच्चू कडू यांच्यासह शिंदेसेनेच्या नेत्यांनी विरोध केला होता. मात्र त्याला भाजपने भीक घातली नाही. या प्रकारामुळे नाराज असलेले बच्चू कडू अजूनही विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करतात, तेव्हा त्यांचा रोख अजित पवारांविरोधी असतो. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर कडू कधीही टीका करत नाहीत. त्यांचा मुख्य रोष हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व अजित पवारांवरच (Ajit pawar) असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics