काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आठ वेळचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. आता काँग्रेस पक्ष व थोरात पराभवाचे आत्मचिंतन करण्यात मग्न असताना त्यांच्या आमदार निवासातील खोली नंबर २१२ वर ताब्यासाठी दोन आमदारांमध्ये वाद सुरू झाले आहेत. त्यापैकी एक आमदार आहेत शिंदेसेनेचे अमोल खताळ. तर दुसरे अामदार आहेत नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले विधान परिषदेेचे आमदार सत्यजित तांबे. थोरातांच्याच खोलीसाठी या दोघांचा अट्टहास का? जाणून घेऊया मिशन पॉलिटिक्समधून….
आमदार निवासातील खोल्यांचा मोह काही सुटेना…

मुंबईत आमदारांना राहण्यासाठी सरकारच्या वतीने तीन आमदार निवासांची उभारणी करण्यात आलेली आहे. आकाशवाणी, मॅजेस्टिक व मनोरा अशी तीन आमदार निवासस्थाने आहेत. यात प्रत्येकी साधारणत: दोन रुमचे हे निवासस्थान असते. यात आमदार, त्यांचे स्वीय्य सहायक यांनी राहणे अपेक्षित असते. पण गेल्या काही वर्षांपासून या खोल्या म्हणजे आमदारांचे कार्यकर्ते व त्यांच्या मतदारसंघातून एक- दोन दिवसांसाठी मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या लोकांचे आश्रयस्थानच बनले आहे. या खोलीत पाच- सात लोक सहजपणे मुक्कामाला राहू शकतात, अशी व्यवस्था असते. पण काही लोकप्रिय आमदारांच्या खोलीत तर १५ ते २० लोकांचा मुक्काम असतो. जागा मिळेल तिथे दाटीवाटीने लोक झोपलेले असतात. मुंबईत तसे राहणे महाग असते. एखाद्या हाॅटेलात रात्रभर पाठ टेकवायची म्हटलं तरी हजार- दोन हजार रुपये खर्च येतो. त्यापेक्षा मंत्रालयापासून जवळच असलेल्या आमदार निवासात जर आश्रय मिळाला तर पैसेही वाचतात व हॉटेल ते मंत्रालय अंतरही कमी होते. आमदाराचे शिफारस पत्र असेल तर कुणालाही या आमदार खोलीत प्रवेश मिळू शकतो. काही कार्यकर्ते तर वर्षानुवर्षे इथे ठाण मांडून बसलेले आहेत. आता इतका सावळा गोंधळ वाढल्यामुळे आमदार काही या खोल्यांमध्ये राहात नाहीत. अनेक टर्मपासून जे ज्येष्ठ आमदार आहेत त्यांनी मुंबईत एकतर आपले फ्लॅट घेतलेले आहेत किंवा पंचतारांकित हाॅटेलात राहण्यास ते पसंती देतात. तरीही आमदार निवासातील खोल्यांचा मोह काही त्यांना सुटत नाही.
आमदारकी गेली अन् थोरातांनी लगेच सोडला खोलीचा ताबा…

सध्या तीनपैकी दोन आमदार निवास दुरुस्तीच्या नावाखाली बंदच आहेत. मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. तर मॅजेस्टिकमध्येही काही नूतनीकरणाची कामे सुरु असल्याने दोन्ही निवासस्थाने बंद आहेत. त्यामुळे सगळा लोड आकाशवाणी आमदार निवासस्थानात येतो. अर्थात या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या आमदारांची सरकारने दुसरीकडे व्यवस्था केली आहे. ज्यांची व्यवस्था सरकार करु शकले नाही त्या आमदारांना दरमहा १ लाख रुपये घरभाडे भत्ताही दिला जातो. त्यामुळे आमदारांची काहीच गैरसोय होत नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा मतदारसंघातून येणाऱ्या लोकांना मात्र मुक्कामाला जागा राहिलेली नाही, अशी ओरड होत असते. आमदार निवासाचे इतके गुऱ्हाळ लांबवण्याचे कारण म्हणजे आकाशवाणी आमदार निवासातील एका खोलीवरुन सध्या दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आठ टर्मचे आमदार होते. त्यांच्या नावावर आकाशवाणी अामदार निवासात खोली नंबर २१२ वर्षानुवर्षे बुक असते. तिथे त्यांचे कार्यकर्ते, मतदारसंघातील लोकांचा राबता असतो. मात्र आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी ही खोली सोडली आहे. खरे तर अजूनही निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अजूनही आठ ते दहा आमदारांनी खोल्यांचा ताबा सोडलेला नाही. पण थोरातांनी लगेच सोडला. आता ही खोली आपल्याला मिळावी म्हणून थाेरातांना पराभूत करुन विजयी झालेले शिंदेसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे, अनेक वर्षे थोरातांच्या ताब्यात असलेल्या या खोलीबद्दल त्यांच्या समर्थकांमध्ये जिव्हाळा आहे.
आमदार पराभूत झाल्यास नव्या आमदाराला खोलीचा ताबा?

थोरात पडले तरी ही खोली आपल्या हातून जाऊ द्यायची नाही असा चंगच त्यांनी बांधलेला आहे. म्हणूनच थोरात यांचे भाचे व नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार सत्यजित तांबे यांनीही या खोली नंबर २१२ वर दावा केला आहे. खताळ यांच्या मते, विधानसभेत अशी परंपरा आहे की एखादा आमदार पराभूत झाल्यास त्याच्या खोलीचा ताबा नव्या विजयी आमदाराला दिला जातो. त्यानुसार बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर सदर खोली आमदार अमोल खताळ यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी ती खोली बळकावल्याचा दावा खताळ यांनी केला आहे. यामुळे संगमनेरच्या जनतेला मुंबईत राहण्यासाठी असणाऱ्या सुविधेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण आमदार सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी हा दावा खोडून काढला आहे. सुरुवातीला सत्यजित तांबे यांनी आपल्या नावावर ही खोली मिळवली आणि आपले सामान तिथे हलवले. मात्र, आमदार अमोल खताळ यांना याची माहिती मिळताच त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन खोली आपल्या नावावर करुन घेतली. यावर सत्यजित तांबे यांनी पुन्हा विधिमंडळाकडे तक्रार करून ती खोली स्वतःच्या ताब्यात घेतली असल्याचे समजते. यामुळे, एकाच खोलीसाठी तीन वेळा आदेश निघाल्याचा प्रकार समोर आला आहे.
खोली वाटपाचे नियम काय सांगतात?

आमदार अमोल खताळ यांनी हा मुद्दा केवळ खोलीचा नसून, संगमनेरच्या जनतेसाठी असलेल्या सोयींना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप केला आहे. “मुंबईत विविध सरकारी कामांसाठी संगमनेरमधील नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यांना थांबण्यासाठी आमदार निवास हे एकमेव ठिकाण आहे. मात्र, सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या जनतेला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न केला आहे. हा मुद्दा मी विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार आहे.” असे खताळ म्हणाले. या संदर्भात विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे माध्यमांनी विचारणा केली. आमदार खोली वाटपाचे काय नियम आहेत हे विचारले. त्यावर भोळे म्हणाले, ‘विधिमंडळात खोली वाटपासाठी ठोस नियम नाही. ज्येष्ठतेनुसार खोलीवाटप केले जाते. त्यातही महिला आमदारांना प्राधान्य दिले जाते. मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघातील आमदारांना खोली मिळत नाही. असे त्यांनी सांगितले.
खोली मिळवण्यामागचे राजकारण काय..?

एकूणच हा वाद केवळ आमदार खोली मिळवण्याचा नाही तर परस्परविरोधी गटावर कुरघोडीचा असल्याचे दिसून येते. थोरातांच्या पराभवामुळे त्यांचे समर्थक संतप्त आहेत. म्हणून ते आमदार खताळ यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर खताळ यांनाही थोरातांना पराभूत केल्याचा गर्व चढलेला असून, काहीही झाले तरी ही खोली मिळवायचीच असा चंग त्यांनी बांधलेला आहे. काँग्रेसकडून दबाव टाकला जातोय, हा खताळांचा आरोप मात्र हास्यास्पद वाटतोय. कारण सत्ता महायुतीची आहे. खताळ सत्ताधारी शिंदेसेनेचे आमदार आहेत. मग अशा वेळी विरोधी बाकावरील काँग्रेस अधिकाऱ्यांवर कसा दबाव टाकू शकते? हा प्रश्न आहेच.