Baramati Loksabha : बारामतीच्या नणंद, भावजयीच्या वादाचा लोकसभेत भडका
बारामती : महाराष्ट्रातील पक्ष फाटाफुटीच्या राजकारणानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एका मतदारसंघाची लढत देशात लक्षवेधी ठरणार आहे. गेली अनेक वर्षे ज्या बारामतीवर पवार घराण्याचे अपराजित वर्चस्व होते, आता त्या मतदारसंघात त्याच घराण्यातील दोन महिला आमने सामने येणार आहेत. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Ajit Pawar निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित आहे. ही निवडणूक झाली तर एकीचा पराभव अटळ आहे. म्हणजे घराण्यातील वाद चव्हाट्यावर आल्यामुळे पवार कुटुंबियांना यंदा बारामतीत पराभवाची नामुष्की पाहावी लागणार हे निश्चित. Baramati Loksabha-Supriya Sule V/s Sunetra Ajit Pawar
महाराष्ट्राच्या राजकारणाला भाऊबंदकीचा शाप काही नवा नाही. आतापर्यंत अनेक जिल्ह्यात मातब्बर राजकीय घराणी अति महत्त्वाकांक्षेपायी फुटली व दोन राजकीय चुली निर्माण झाल्या. बीडचे पंडित- क्षीरसागर- मुंडे घराणे असो की अकलूजचे मोहिते पाटील, मुंबईचे ठाकरे असो की आता बारामतचे पवार घराणे. या सर्वांमध्येच राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी फूट पडली. त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही कुटुंबीयांचे राजकारणातील महत्त्व कमी कमी होत गेल्याचे आपण पाहतो.
पवारांच्या घरात आधीपासूनच धुसफूस
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार Sharad Pawar यांचे कुटुंबीय एकतेचा आदर्श मानले जायचे. याचा अर्थ या घरात कुरबुरी नव्हत्या असे अजिबात नाही. मात्र त्या उंबऱ्याच्या बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत हा शरद पवार व प्रतिभाताईंचा शब्द सर्वांनी आजवर पाळला. सुप्रिया सुळे Supriya Sule व अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई Sunetra Ajit Pawar यांच्यातही धुसफूस होती. कधी त्याला कौटुंबिक कारण असे की कधी राजकीय महत्त्वाकांक्षेचे. शरद पवारांनी बारामती मतदारसंघ सोडला आणि आपली मुलगी सुप्रिया यांना राजकीय वारसदार बनवले. अजित पवारांनाही त्यांनी राज्याच्या राजकारणात स्थिरस्थावर केले होते. नंतर कार्यकर्तृत्वाच्या जोरावर दादांनी राजकारणात स्वत:ची वेगळी ओळख व स्थान निर्माण केले. दिल्लीत ताई व राज्यात दादा अशी वाटणी काकांनी करुन दिली होती. तोपर्यंत घराण्यातील किरकोळ वाद फारसे कधी उंबऱ्याबाहेर आले नाहीत.
पार्थचा पराभव जिव्हारी
पवार नावाच्या वलयात वाढलेल्या आपल्या मुलांनाही राजकारणात संधी मिळावी, अशी सुनेत्राताईंची सुप्त इच्छा होती. त्यासाठी त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत आपले पूत्र पार्थ Parth Ajit Pawar यांना मावळ (जि. पुणे) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा आग्रह धरला. शरद पवारांना मात्र ते मान्य नव्हते. एकाच घरात दोन- दोन उमेदवारी नको, शिवाय मावळ मतदारसंघ आपल्याला फारसा अनुकूल नाही असे त्यांचे मत होते. पण सुनबाईच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. अखेर त्यांना पार्थला उमेदवारी द्यावी लागली. पण तिथे शिवसेनेकडून त्यांचा पराभव झाला. आतापर्यंत सार्वत्रिक निवडणुकीत कधीही पराभवाचे तोंड न पाहणाऱ्या अपराजित पवार घराण्याच्या ‘विक्रमा’ला अखेर पार्थ यांच्या पराभवामुळे बट्टा लागला. हा पराभव अजितदादांपेक्षा सुनेत्राताईंच्या Sunetra Pawar फार जिव्हारी लागली. तेव्हापासून त्यांच्यातील व सुप्रिया सुळे यांच्यातील अंतर वाढत गेले. त्यातच शरद पवारांचा दुसरा नातू रोहित राजेंद्र पवार Rohit Rajendra Pawar हे जामखेड-कर्जतमधून आमदार झाले, तेव्हा एका घरात दोन उमेदवारीचा प्रश्न का उद्भवला नाही हा सुनेत्राताईंचा प्रश्न होता. त्यामुळे आता रोहितप्रमाणे पार्थही आमदार किंवा खासदार व्हावा, त्यासाठी आता बारामतीसारखा सुरक्षित मतदारसंघच आपल्याला हवा असे सुनेत्राताईंना वाटू लागले.
Baramati Loksabha-Supriya Sule V/s Sunetra Ajit Pawar
दादांच्या बंडामुळे संधी चालून आली
सत्तेशिवाय अजितदादांचे Ajit Pawar फार काळ राजकारणात मन लागत नाही. त्यामुळे मविआचे सरकार पडताच त्यांनी पक्षात बंडाची भाषा सुरु केली. भाजपसोबत जाण्यासाठी ते उताविळ होते. २०१९ च्या पहाटे तसे एक प्रयोगही त्यांनी करुन पाहिला होता, मात्र काकांमुळे Sharad Pawar तो यशस्वी झाला नसल्याचा राग दादांच्या मनात होताच. यावेळीही काकांना भाजपशी जवळीक करण्याची योग्य वेळ नसल्याचे वाटत होते. किंवा त्यासाठी दादांनी पुढाकार घेणे हे काकांना पटत नसावे. मात्र आता कुणाचेही एेकायचे नाही या निर्णयापर्यंत दादा आले होते. भाजपने त्यांना सत्तेसाठी पायघड्या घातल्या होत्या. सत्तेत वाटा मिळवण्याबरोबरच चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करुन घेण्याचे भविष्यही दादांना दिसत होते. त्यांचे अनेक सहकारीही या मताशी सहमत होते, कारण त्यांनाही दादांप्रमाणे सत्तेचे आकर्षण होते अन् कुठल्या न कुठल्या प्रकरणात त्यांच्याही डोक्यावर चौकशीची टांगती तलवार होतीच. अखेर संयमचा कडेलोट झाला आणि २ जुलै रोजी दादांनी काकांशी बंड करुन सत्तेचा मार्ग पत्करला.
बारामतीचा गड मिळवण्यासाठी भाजपने फोडले घर
अजितदादा Ajit Pawar सत्तेत आले आणि त्यांच्या माध्यमातून बारामतीत सुप्रियांचा म्हणजेच शरद पवारांचा पराभव करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या भाजपच्या BJP आशा पल्लवित झाल्या. २०१४ व २०१९ च्या मोदी लाटेत त्यांनी तसा प्रयत्न करुन पाहिला होता. राहूल गांधींचा Rahul Gandhi पराभव करुन भाजपने अमेठी जिंकली पण बारामतीचा गड काही मिळवणे त्यांना शक्य झाले नव्हते. मग भाजपने पवारांच्या घरातच फुट पाडली. आता महायुतीच्या उमेदवार म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Ajit Pawar यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी दादांनी केली आहे. तसे झाले तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार Supriya Sule V/s Sunetra Ajit Pawar असा सामना होईल. सुप्रियांच्या पाठीशी शरद पवार नावाचा भक्कम आधार व गेल्या तीन निवडणुकीत विजयाचा अनुभव आहे. सुनेत्राताई प्रत्यक्ष राजकारणात सहभागी नसल्या तरी दादांच्या प्रतिनिधी म्हणून बारामती मतदारसंघात Baramati Lok Sabha constituency त्यांचाही संपर्क काही कमी नाही. सामाजिक कामात त्या नेहमी अग्रेसर असतात. धाराशिवचे मातब्बर नेते, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील Padmasing Patil हे सुनेत्राताईंचे भाऊ. म्हणजे माहेरहूनही ताईंना राजकारणाचे बाळकडू मिळालेले. त्यामुळे त्यांना अगदीच नवख्या राजकारणी असे कुणीही म्हणणार नाही.
प्रचाराचे रणशिंग फुंकले
खरी राष्ट्रवादी अजित पवारांचीच NCP belongs to Ajit Pawar असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्हावर राज्यात इतरत्र दादांना लाभ होऊ शकतो. बारामतीकर मात्र ना पक्ष पाहतात ना चिन्ह. शरद पवार आणि अजित पवार हे नाव त्यांच्यासाठी पक्ष व चिन्हासमान आहे. दरवेळी या दोघांच्या शब्दाला मान देऊन बारामतीकर मतदान करायचे, यावेळी दोघांपैकी एकाचेच एेकावे लागेल, मग कुणाचे एेकायचे हा संभ्रम त्यांच्याही मनात आहे.
आपणच स्थापन केलेला पक्ष इतरांनी पळवला. मात्र पक्ष चिन्ह गेले तरी हरकत नाही, बारामतीकर माझ्यासोबत आहेत, असे भावनिक आवाहन शरद पवार Sharad Pawar व सुप्रिया सुळे Supriya Sule करत आहेत.
दादांनी फुटायला नको होते, सत्तेच्या मोहापायी काका, बहिणीशी नाळ तोडायला नको असे अनेक बारामतीकरांना वाटते. तर आता काकांनी थांबायला हवे. दादांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे, आता त्यांना मोकळीक द्यायला हवी, असे काही लोकांना वाटते. पवारांचे घर फुटल्याची हळहळ बारामतीकरांच्या मनातही आहे.
मात्र काहीही झाले तरी बारामतीच्या मैदानात यंदा पवारांच्या घरातच ‘युद्ध’ होणे अटळ आहे. अजितदादांनी बूथ मेळावे घेण्यास सुरुवात केली. आजवर तुमच्यासाठी खूप काही केले, आता माझ्याच उमेदवाराला निवडून आणा अशी विनंती वजा आदेशाची भाषा ते बोलत आहेत. जाहीर सभांमधून काका- ताईवर दादा टीका करु लागलेत. सुनेत्राताईंच्या सामाजिक कामाचा प्रचार करणाऱ्या गाड्या बारामतीत फिरु लागल्या आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या विरोधकांच्या भेटीगाठीही सुनेत्राताई घेत आहेत. पार्थ, जय ही त्यांचे मुलेही सक्रिय झाली आहेत.
दुसरीकडे, शरद पवार यांनीही बारामतीत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायला, संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. बारामतीकरांशी माझे ५० हून अधिक वर्षांचे भावनिक नाते आहे. सत्तेच्या मोहापायी भाजपसोबत गेलेल्यांना इथले लोक दाद देणार नाहीत, असा विश्वास पवार व्यक्त करत आहेत. सुप्रियाताईही ठिकठिकाणी भेटीगाठी करत आहेत. ८३ वर्षांच्या योद्ध्यामागे (शरद पवार) तुम्ही उभे राहा, असे भावनिक आवाहन ताई करताना दिसतात. पवार घराणे फोडण्याचे पाप भाजपने केले आहे, याकडेही त्या लक्ष वेधतात. आपण १५ वर्षांत केलेल्या कामांपेक्षा यावेळी त्यांच्या प्रचाराचा भर शरद पवारांच्या नावाने भावनिक आवाहन करण्यावर जास्त दिसतो. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांमधून अजितदादांविरोधात रोष दिसून येतो. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी दादांनी काकांना धोका देणे त्यांना योग्य वाटत नाही. याच रागातून काही ठिकाणी सुनेत्राताई व अजितदादांच्या पोस्टरवर शाईफेकीचा प्रकारही बारामतीत दिसला. अर्थात सुप्रिया सुळे यांनी असे प्रकार करणे अयोग्य असल्याचे सांगून आपली या प्रकारांना फूस नसल्याचे स्पष्ट केले होते.
एकूणच, यंदाच्या निवडणुकीत देशात सर्वात लक्षवेधी लढत बारामतीची होणार याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. Baramati Loksabha-Supriya Sule V/s Sunetra Ajit Pawar. त्यात अजितदादांचे कार्यकर्तृत्व पास होते की बारामतीची नाळ माहित असणारे शरद पवार एेनवेळी काही चमत्कार घडवून हातातून निसटू लागलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्यात यशस्वी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.