December 26, 2024

माघार घेतली तरी जयदत्तच ठरवणार बीडचा आमदार

गेली २५ वर्षे ज्या क्षीरसागर घराण्याची बीड मतदरसंघावर सत्ता आहे, त्या घराण्यातच २०१९ मध्ये फूट पडली. त्यावेळी काका जयदत्त क्षीरसागर व पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात लढत झाली व पुतण्याने बाजी मारली. यावेळी आणखी एका पुतण्याने डॉ.योगेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने दोन पुतणे व एक काका अशी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. पण शेवटच्या क्षणी समजुतदारपणा दाखवत जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. मग आता काकाची माघार कोणत्या पुतण्याच्या पथ्यावर पडते हे आपण जाणून घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून…

अन् जयदत्त क्षीरसागरांना बसला धक्का…

बीड मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आतापर्यंत दोन वेळा म्हणजे २००९ व २०१४ मध्ये निवडून आले होते. आघाडी सरकारच्या व युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवले. बीडच्या राजकारणावर त्यांचे चांगले वर्चस्व आहे. विशेष म्हणजे सर्वजातीधर्माच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे बीडमध्ये त्यांना पराभूत करणे भल्याभल्यांना जमले नाही. मात्र २०१९ मध्ये क्षीरसागरांच्या घरातच फूट पडली व त्यांचे धाकटे बंधू रवींद्र क्षीरसागर यांचे पूत्र संदीप यांनी काकांना आव्हान दिले. या निवडणुकीत शिवसेनेकडून उभे असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या संदीप यांनी पराभव केला. हा जयदत्त यांना मोठा धक्का होता. मात्र तरीही गेली ५ वर्षे ते सातत्याने मतदारसंघात काम करत आले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे व ठाकरे गटापासून काही अंतर दूर राहणेच पसंत केले. कोणत्याही एका गटाजवळ जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बीडमध्ये विकास निधी आणून कामे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे वैयक्तिक संबंध आजही आहेत.

शरद पवारांच एक फोन आणि…

दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार असल्याने त्यांचा पक्ष पहिली अडीच वर्षे सत्तेत होता. या माध्यमातून त्यांनीही निधी आणून विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यावर संदीप यांना शरद पवार गटासोबत राहणे पसंत केले. २०१९ मध्ये अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा संदीप हे त्यांच्यासोबत गेले होते. मात्र शरद पवारांच्या एका फोनने ते तत्काळ काही तासात त्यांच्यासमोर हजर झाले होते. तेव्हापासून संदीप शरद पवारांसोबतच आहेत. आता जयदत्त यांचे दुसरे पुतणे डॉ. याेगेश क्षीरसागर हे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकिट मिळवले आहे. योगेश यांचे वडिल डाॅ. भारतभूषण क्षीरसागर हे गेली ३५ वर्षे बीडचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या आईही पंचायत समितीच्या सभापती होत्या. शहरात भारतभूषण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या जोरावरच योगेश यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली. आता दोन पुतणे दोन्ही राष्ट्रवादीकडून उभे राहिल्याने काका जयदत्त यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.

फडणवीसांनीही फोनवरुन केली विनंती…

काहीही झाले तरी बीडचा आमदार क्षीरसागरच होणार हे जवळपास नक्की झाले आहे, पण काका की पुतण्या हा प्रश्न कायम होताच. पण तिन्ही क्षीरसागर मैदानात राहिले तर चौथाच उमेदवार जिंकून येऊ शकतो हा धोकाही होताच. ही परिस्थिती जयदत्त क्षीरसागर यांना समजली. दोघापैकी एकही पुतण्या माघार घेत नसल्याचे पाहून त्यांनी स्वत:च समजुतदारपणा दाखवून माघार घेतल्याचे सांगितले जाते. क्षीरसागर यांच्या निकटवर्तीयांच्या मते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन जयदत्त यांना माघार घेण्याची विनंती केली, त्याचा मान राखूनही त्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मग आता बीडमध्ये खरी लढत होईल ती योगेश व संदीप या दोन चुलत भावांमध्ये. या लढाईत जयदत्त यांचा पाठिंबा कुणाला मिळतो? तो जिंकू शकेल हे त्रिवार सत्य आहे. जयदत्त यांनी अजून आपले पत्ते उघडलेले नाहीत. मात्र त्यांचा कल योेगेश यांच्याकडेच असल्याचे निकटवर्तीय सांगतात.

योगश क्षीरसागरांची नवी राजकीय इनिंग सुरु…

२०१९ मध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त यांचा पराभव केला होता. संदीप यांच्यामुळे आपले घर फुटले ही भावना काकांच्या मनात आजही सल करुन आहे. त्यामुळे त्यांना जयदत्त मदत करणार नाहीत, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. जयदत्त व भारतभूषण या दोन भावांमध्ये चांगले संबंध होते आणि आहेत. योगेश विधानसभेच्या माध्यमातून नवीन राजकीय इनिंग सुरु करत आहे, त्यामुळे जयदत्त हे त्याच्याच पाठीशी आपले राजकीय वजन लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता महाविकास आघाडीचे पाठबळ संदीप यांना पुन्हा आमदारकी मिळवून देणार की योगेश यांच्या रुपाने बीडला नवा चेहरा मिळणार हे २३ नोव्हेंबर रोजीच कळून येईल.