ठाण्यातील शिंदेशाहीला भाजप लावणार सुरूंग, फडणवीसांची नवी खेळी

गेली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघरसह मुंबईत आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला. यात मुंबईत त्यांना फारसे यश आलेले नसले तरी ठाणे व पालघरमध्ये मात्र शिंदेसेना अधिक मजबूत करण्यात शिंदे यशस्वी झाले. मात्र आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण शिंदेंचा प्रभाव कमी झाल्याशिवाय भाजप वाढणार नाही, हे ते जाणून आहेत. आणि म्हणूनच आता आगामी मनपा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना ठाणे- पालघरच्या मैदानात उतरवून शिंदेसेनेला शह देण्याची रणनीती भाजपने आखली आहे, आता त्याला शिंदेसेना कसे प्रत्त्युत्तर देते याबद्दल जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

मनपा, जिल्हा परिषद निवडणूका स्वबळावर?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. केवळ सत्ता आली नाही तर २८८ पैकी २३७ हून अधिक आमदारांचे बळ महायुतीच्या तिन्ही पक्षांना मिळाले. म्हणजे आता राज्यात अगदी बोटावर मोजण्याइतकेच विरोधक उरले आहेत. उरल्या- सुरलेल्या ५० आमदारांपैकी अजून कुणी गळाला लागताय का? याचेच प्रयत्न युतीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षे सत्ता चालवताना विरोधकांचे फारसे भय किंवा धास्ती राहिलेली नाही. पण विरोधकांपेक्षा सत्तेतील मित्रपक्षांचे भय मात्र त्यांना आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला दगाबाजीचा इतिहास असल्यामुळे सत्तेतील मित्रपक्ष फारसे वरचढ होऊ नयेत यासाठी भाजपचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रबळ बहुमत मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी व गृहखात्यासाठी जे नाराजी नाट्य केले, त्यावरुन हे मित्रपक्ष आपल्याला कधीही अडचणीत आणू शकतात याबाबत फडणवीस यांना शंका आहे. म्हणूनच मित्रपक्षाची ताकद फार वाढणार नाही, किंबहुना पुढच्या निवडणुकीपर्यंत राज्यात सगळीकडे ‘शत- प्रतिशत’ भाजपचाच विस्तार व्हावा या दृष्टीने या पक्षाच्या हायकमांडपासून ते बूथ- पन्नाप्रमुखांपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आगामी मनपा, जिल्हा परिषदा निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

मित्रपक्षांना नामोहरण करण्याची भाजपची रणनिती?

विरोधकांसोबत मित्रपक्षांनाही नामोहरम करण्याची भाजपची रणनिती एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यापासून सुरु झालीय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या ठाणे व शेजारच्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करुन येथे मतदार, कार्यकर्त्यांचे भक्कम नेटवर्क उभे केले. आधीपासूनच ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला होताच, तो अधिक भक्कम करुन शेजारच्या पालघरवरही शिंदेंनी प्रभाव वाढवला होता. आता शिंदे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढवण्याची तयारी सुुरू केली अाहे. शिंदेंना तिथे शह देण्यासाठी भाजपने पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या गणेश नाईकांना मैदानात उतरवले आहे. गणेश नाईक मुळ नवी मुंबईतील. तिथे त्यांचे चांगले वर्चस्व आहे. या नाईकांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हाच शिंदेंना शह देण्यासाठी त्यांना मंत्री केल्याचे संकेत मिळाले होते. आता याच नाईकांना फडणवीस यांनी पालघरचे पालकमंत्री करुन तेथील शिंदेंशाहीला धक्का देण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. गणेश नाईक हेही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाकांक्षी नेते आहेत. फडणवीस यांनी नवी मुंबईसोबतच पालघरची जबाबदारी दिली असली तरी तेवढ्यावरच न थांबता आता नाईकांनी ठाण्यातही आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे. ज्या ठाण्याचे एकनाथ शिंदे पालकमंत्री आहेत तिथे जाऊन जनता दरबार घेण्याची नुकतीच घोषणा नाईकांनी केलीय.

गणेश नाईकांनी फुंकले स्वबळाचे रणशिंग…

ठाण्यातील भाजपच्या एका मेळाव्यात नाईक म्हणाले, ‘देशात एक काळ असा होता की जेव्हा ‘ओन्ली विमल’ ही जाहीरात सर्वत्र गाजत होती. आता देशात ‘ओन्ली कमळ’ हा एकमेव नारा सर्वत्र घूमत आहे. ठाणे शहरात भविष्यकाळात सुशासन हवे असेल, २४ तास पाणी हवे असेल तर ठाण्यातही ‘ओन्ली कमळ’ हा नारा घुमायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने जर मला ठाण्याची जबाबदारी दिली तर तुमच्या जगणे सुरळीत करण्याचा मी तुम्हाला शब्द देतो’, अशा शब्दात नाईक यांनी अप्रत्यक्षपणे ठाण्यात स्वबळावर मनपा निवडणूक लढवण्याचे रणशिंगच फुंकले. वर्षानुवर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई, ठाणे या मनपा ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न आहे. पण मुंबईची राजकीय परिस्थिती पाहता तिथे भाजपला हे स्वप्न पूर्ण करतात आलेले नाही. मागच्या मनपा निवडणुकीत स्वतंत्र लढून भाजपच्या शिवसेनेच्या जवळ जाऊन पोहोचली हाेती, पण तरीही दोन जास्तीचे नगरसेवक निवडून आणून शिवसेनाच मोठा भाऊ ठरली होती. तेव्हाच्या राज्याच्या सत्तेतील अपरिहार्यता लक्षात घेऊन फडणवीस यांनी शिवसेनेला मंुबई मनपाची एकहाती सत्ता दिली होती. पण ठाण्यात मात्र भाजप तेवढेही यश मिळवू शकलेले नाही.

भाजपच्या खेळीला शिंदे प्रत्त्युत्तर देणार का?

गेल्या दोन- अडीच वर्षांपासून मात्र ठाण्यावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. आमदार संजय केळकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे या नेत्यांनी ठाणे भाजपच्या ताब्यात हवे, असा आग्रह सुरु केला आहे. त्यासाठी आधी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाणे व कल्याण या दोन्ही मतदारसंघावर दावा केला. पण तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. नंतर लोकसभेत पराभव झाल्यामुळे तडजोडीच्या भूमिकेत असलेल्या भाजपला विधानसभेलाही ठाण्याच्या बाबतीत फारसा आग्रह करता आला नाही. पण आता मिळालेल्या बहुमताच्या ताकदीवर ठाणे मनपा मात्र शिंदेंच्या ताब्यात हिसकावून आणण्याची तयारी भाजपने केलेली आहे. आणि त्यासाठी तितक्याच ताकतीचा नेता गणेश नाईक यांच्याकडे भाजपने नेतृत्व सोपवल्याचे दिसून येते. आता भाजपच्या या खेळीला एकनाथ शिंदे कसे प्रत्त्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. जसे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घुसून भाजप त्यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहे, तसेच भाजपच्या ताब्यात असलेल्या मनपात शिंदेसेनेकडूनही त्यांना आव्हान दिले जाऊ शकते. विशेषत: मुंबई मनपासाठी भाजपला शिंदेसेनेची गरज आहे. जर शिंदेसेनेने भाजपचे मुंबईत नाक दाबले तर मात्र ठाण्यात ते तोंड उघडू शकतात, तशी रणनिती शिंदेसेनेकडून आखली जात असल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात येते. किंवा भाजपचे दिग्गज नेते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे जाऊन शिंदेसेनेचे मंत्रीही जनता दरबार घेऊन जशास तसे उत्तर देऊ शकतात. अजून मनपा निवडणुकांना किमान सहा- आठ महिने आहेत. तोपर्यंत सत्ताधारी पक्षांमध्ये असे कुरघोडीचे प्रयोग होत राहतील. त्याचा शेवट कुठे होतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल.