नवी दिल्ली : एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या १९५ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी २ मार्च रोजी जाहीर केली. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांसमोर या यादीची घोषणा केली. मात्र त्याच तावडेंच्या महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचा या पहिल्या यादीत समावेश नव्हता, हे विशेष. खरे तर २०१९ च्या निवडणुकीत या राज्यात भाजपचे २३ खासदार निवडून आले आहेत. सध्या हा पक्ष राज्यात सत्तेवरही आहे. मग अशावेळी महाराष्ट्रातील एकाही खासदाराला किंवा उमेदवाराला भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत स्थान का नाही मिळू शकले याची कारणे आपण जाणून घेऊ या…
महाराष्ट्रात सध्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे महायुती सरकार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फोडून भाजपने आपले सरकार स्थापन केले आहे. आगामी लोकसभा निवडणूकही याच दोन्ही पक्षांच्या साथीने लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही अद्यापही या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे भाजपचे एकूण किती उमेदवार कोणत्या मतदारसंघात लढणार हे निश्चित होऊ शकलेले नाही. याच कारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराला स्थान मिळालेले नाही.
कुठे अडले जागावाटप?
- भाजपची शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती आहे.
- गेल्यावेळी शिवसेनेशी युती असताना भाजपने २५ व शिवसेेनेने २३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी अनुक्रमे २३ व १८ जागा दोन्ही पक्षांनी जिंकल्या होत्या. म्हणजे महाराष्ट्रातील ४८ पैकी एकूण ४१ जागा या दोन्ही पक्षांना मिळाल्या होत्या.
- आता भाजपला ३२ जागा हव्या आहेत. त्यामुळे त्यांनी शिंदेसेनेला १२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला फक्त ४ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
- दुसरीकडे शिंदेसेना २२ जागा लढवण्यावर ठाम आहे. कारण २०१९ मध्ये शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी त्यांचे १८ खासदार निवडून आले होेते. आता मुळ शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने ते २०१९ प्रमाणे २२ जागा लढवण्याचा दावा करत आहेत.
- अजित पवारांचा पक्षही किमान १० जागांसाठी आग्रही आहे. याचे कारण म्हणजे २०१९ मध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी करुन २२ जागा लढवल्या होत्या. मात्र त्यापैकी त्यांचे फक्त चारच खासदार निवडून आले होेते. आता पक्षात फूट पडल्यानंतर त्यापैकी एकच खासदार अजितदादांसोबत आहे व इतर ३ शरद पवारांसोबत आपली ही ताकद लक्षात आल्यामुळे अजितदादा गटाने आपल्या पक्षाचा दावा २२ वरुन १० पर्यंत खाली आणला आहे. मात्र त्यापेक्षा एकही कमी जागा घेणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
- भाजपशी फारस घासाघीस केल्यानंतर शिंदेसेना १८ व अजित पवार गट ८ जागा लढण्यास तयार आहे. असे झाले तरी भाजपच्या वाट्याला २२ जागाच येतात.
महायुतीचे ४५ खासदार निवडून आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट
- यंदा महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार निवडून आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. मात्र शिंदे सेना व अजितदादांचे जास्त उमेदवार निवडून येणार नाहीत, असे निष्कर्ष भाजपने केलेल्या सर्वेतून त्यांच्या हाती लागले आहेत. म्हणून आपले उमेदवार जास्त मैदानात उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिंदेसेना व अजित पवारांचे काही उमेदवारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असाही भाजपचा प्रस्ताव आहे. मात्र तो दोन्ही पक्षांना अमान्य आहे.
- या वाटाघाटीत राज्यात महायुतीचे जागावाटप अडकले आहे.
- २०१४ पासून सोबत असलेले रासप, रिपाइं यासारखे अन्य छोटे पक्षही आम्हाला किमान एखादी तरी जागा द्या, असा आग्रह धरुन आहेत. भाजप मात्र त्यांना एकही जागा देऊ इच्छित नाही. त्यामुळे त्यांचाही रोष आहे.
- या वादात वाटाघाटी अडकल्याने महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित होऊ शकलेले नाही. त्यामुळे भाजपच्या एकाही उमेदवाराचे नाव पहिल्या यादीत समाविष्ट झालेले नाही.