मोदींच्या गॅरंटीचा नव्हे तर भाजपला आधार हिंदुत्वाचाच

गेली १० वर्षे भाजपने देशात विकासाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला. त्याला मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात भरीव यश मिळाले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र लोक भाजपच्या घोषणांना भुलले नाहीत. मोदी की गॅरंटीही चालू शकली नाही. त्यामुळे भाजपची पिछेहाट झाली. त्यामुळेच आता महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ना विकासाचा अजेंडा हायलाईट करायचे ठरवले नाही ना मोदी की गॅरंटीचे गुऱ्हाळ चघळायचे ठरवले आहे… आता फक्त त्यांच्या प्रचाराची लाईन प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारित असलेली दिसतेय… काय आहे या मागची रणनिती जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…

मोदींच्या गॅरंटीला फारसा कुठे थारा नाही!

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. भाजपच्या एका खासदाराने केलेले संविधान बदलण्याच्या वक्तव्याचे विरोधी पक्षाकडून इतके मोठे भांडवल करण्यात आले की त्यात भाजपची बोट जवळपास बुडाल्यातच जमा आहे. विरोधकांचे हे फेक नॅरेटिव्ह आहे हे सांगण्याचा भाजपने घसा कोरडा पडेपर्यंत प्रयत्न केला, पण मतदारांचा विशेषत: आरक्षणवादी जनतेच्या मनातील संविधान बचावची भावना ते बदलू शकले नाहीत. महाविकास आघाडीने राज्यात संविधान बदलण्याच्या गोष्टीचा इतका बभ्रा केला की त्यात भाजप व मित्रपक्षांच्या विकासाच्या मुद्द्याला किंवा मोदींच्या गॅरंटीला फारसा कुठे थारा मिळाला नाही. मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही भाजपसाठी डोकेदुखी हाेऊन बसला होता. आता विधानसभेलाही थोडे वेगळे मुद्दे असतील. ही देशाची नव्हे तर राज्याची निवडणूक असल्याने संविधान बदलाचा मुद्दा आता मागे पडलाय पण आरक्षणाचा मुद्दा अजूनही ज्वलंत आहे. त्यात निवडणूक होईपर्यंत तरी काही मार्ग निघू शकत नाही. त्यामुळे आता जाती- पातीच्या राजकारणात न अडकता ज्वलंत हिंदुत्व या व्यापक अजेंड्यावर भाजप आपल्या प्रचाराचे नियाेजन करत असल्याचे दिसून येते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले प्रखर मुद्दे…

कोल्हापूरजवळील कन्हेरी मठात नुकताच एक धार्मिक कार्यक्रम झाला. त्यात भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदु धर्माच्या रक्षणाचा मुद्दा मांडताना लव्ह जिहादचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. राज्यात आपल्या मुली- बाळींना फसवण्याचे प्रकार राजरोस होत आहेत. आतापर्यंत आमच्याकडे १ लाखाहून अधिक लव्ह जिहादच्या तक्रारी आल्या आहेत. हे प्रकार थांबवायला हवेत. काही मुले आपली खरी ओळख लपवून आपल्या मुलींना जाळ्यात ओढतात. त्यांच्याशी लग्न करतात. दोन- तीन अपत्ये झाली की मात्र नंतर या मुलींना सोडून देतात. हे प्रेम नव्हे तर एक षडयंत्र आहे, हा लव्ह जिहाद आहे. हे थांबवण्याची गरज आहे,’ असे प्रखर विचार फडणवीस यांनी मांडले. आता राज्याचा गृहमंत्रीच इतकी स्फोटक माहिती देत आहे म्हटल्यावर लोकांचाही त्यावर विश्वास बसतोच ना. एकूणच मुस्लिम समाजाकडून हिंदु मुलींना कसे टार्गेट केले जात अाहे. ख्रिश्चन मिशनरींकडूनही हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर गुपचूप धर्मांतर केले जात असल्याकडेही त्यांनी लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आणि हे थांबवण्यासाठी आपल्या देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकारची गरज आहे… हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केलेला दिसतो. सरकार म्हणून हे गैरप्रकार रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न केले किंवा लव्ह जिहादचे किती प्रकार थांबवले याबाबत माहिती देण्याचा मात्र गृहमंत्र्यांना विसर पडला.

हे रोखायचे असेल तर हिंदुत्ववादी सरकारची गरज असल्याचे संकेत…

आता राज्यात नवरात्रोत्सव सुरु आहे. दांडिया, गरब्यात तरुणाईचा जल्लोष ओसंडून वाहात असतो. त्यावरही भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या काही वर्षात अशा महोत्सवात देव-देवतांवर श्रद्धा नसलेली मुले शिरत आहेत व ते आपल्या हिंदू मुलींना जाळ‌्यात ओढत आहेत. इथेही लव्ह जिहादचे विष पेरले जात आहे, असे सांगत कपाळाला टिळा असेल तरच गरब्यात मुलांना प्रवेश द्या, असे आवाहन करणारी पत्रके विश्व हिंदू परिषदेकडून काढण्यात आली आहेत. काही स्थानिक गरबा आयेाजकांनीही आधार कार्डची तपासणी व कपाळाला टिळा या अटी ठेवल्या आहेत. विधानसभेच्या तोंडावर आलेल्या नवरात्रोत्सवातही लव्ह जिहाद व आपल्या सण- उत्सवात अल्पसंख्यांकांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करुन भाजप व त्यांना पूरक असलेल्या हिंदुत्ववादी संघटना ज्वलंत हिंदुत्वाचे बिज मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे सर्व रोखायचे असेल तर आपल्याला हिंदुत्ववादी सरकारची गरज आहे, हा मेजेस अप्रत्यक्षपणे अशा आवाहनातून दिला जात आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना केले आकर्षित…

केंद्रीय मंत्री अमित शाह नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. महाराष्ट्रात जर महायुतीचे सरकार आले तर समान नागरी कायदा लागू करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, अशी साद त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांना घातली. समान नागरी कायदा लागू झाला म्हणजे सर्वांना समान न्याय, कुणालाही आरक्षण नाही असा बहुतांश लोकांचा गैरसमज आहे. आरक्षण नसलेल्या लोकांमध्ये म्हणूनच या कायद्याविषयी उत्सुकता आहे. अशा लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अमित शाह यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीपूर्वी उपस्थित केल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.

मुख्यमंत्री शिंदेंकडून महत्त्वाचे घोषणा…

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोमातेचा… हिंदु धर्मामध्ये गाईला मातेइतकेच महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गाईला गोमातेचा दर्जा बहाल करण्याची घोषणा केली, त्याबाबतचा जीआरही काढला. देशी गाईंचा सांभाळ करणाऱ्या गोशाळांच्या अनुदानातही वाढ केली. इतकेच नव्हे तर दोन अडीच महिन्यांपूर्वी जे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हटले हेाते त्याच शंकराचार्यांना शिंदेंनी वर्षा बंगल्यावर आणून गोमातेचा दर्जा दिलेल्या अध्यादेशाची प्रत त्यांच्या चरणावर वाहिली. मग याच शंकराचार्यांनी शिंदेंना सनातन धर्मरक्षक, गोमातेचा खरा पूत्र अशी उपाधी बहाल केली. हाही घडवून आणलेला इव्हेंट होता. गोमातेच्या निर्णयातून आमचे सरकार कसे हिंदुत्ववादी आहे हे ठसव‌ण्याचा प्रयत्न शिंदे व भाजपने केलेला आहे.

अजित दादा हिंदुत्वाच्या मार्गावर?

महायुतीचा तिसरा मित्रपक्ष असलेला अजित पवार गट अशा हिंदुत्ववादी निर्णयाचे श्रेय कधीही थेटपणे समोर येऊन घेत नाही. कारण हा पक्ष काँग्रेसची विचारधारेवर वाढलेला आहे. त्यांचा बहुतांश मतदार हा धर्मनिरपेक्षवादी आहे, ती व्होटबँक अजित पवारांना गमवायची नाहीए. पण एरवी कधीही मंदिरात न जाणारे अजितदादा आता भाजपशी युती केल्यापासून ते दौऱ्यातील प्रत्येक प्रसिद्ध देवस्थानावर जाऊन डोके टेकवण्यात व्यग्र झालेले दिसतात. आम्हीही हिंदुत्ववादी मार्गावर आहोत. इतकेच नव्हे तर यावेळी प्रथमच अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजितदादांनी चक्क आपल्या समर्थकांसह सिद्धीविनायकाच्या चरणी अभिषेक करुन आशीर्वाद घेतल्याचा इव्हेंट घडवून आणला. अर्थात भाजपच्या सल्ल्यानेच दादा पुण्यकर्माच्या मार्गाला लागलेत हे लपून राहिलेले नाही. मात्र अशा कृतीमधून आपणही हिंदुत्वाच्या मार्गावर असल्याचा संदेश अजितदादा मतदारांना देत आहेत. एकूणच काय तर आता विकास, राज्याची प्रगती, नवीन धोरणे हे मुद्दे प्रचारात बाजूला पडत असून हिंदुत्व, हिंदुत्व अन‌् हिंदुत्व या एकाच अजेंड्यावर भाजप व महायुती प्रचाराचे मैदान गाजवणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.