विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या वतीने १० वचने देऊन पुन्हा सत्तेचा जोगवा मागितला आहे. तर महाविकास आघाडीने ५ गॅरंटी सांगत अजून एकदा मतदारांकडे संधी मागितली अाहे. या दोन्ही युती- आघाडीच्या केंद्रस्थानी महिला, शेतकरी व युवा वर्ग आहे. सत्तेच्या ५ वर्षात ज्या सरकारांना या वर्गाच्या कल्याणासाठी काहीही करावे वाटत नाही त्यांना एेन निवडणुकीच्या तोंडावरच हे वर्ग लाडके कसे काय वाटू लागतात? त्यांच्यासाठी दिलेली आश्वासने खरंच सरकार आल्यानंतर हे पक्ष पूर्ण करतात का? हा प्रश्न आहेच. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती- आघाड्यांमध्ये आश्वासनांची कशी स्पर्धा लागलीय ते आपण जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…
अन् मुख्यमंत्र्यांनी ५ वर्षांसाठी दिलीत १० वचने…
लोकसभेत दणकून पराभव झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महायुती सरकारने राज्यात तातडीने अनेक लोकप्रिय योजनांचा धडाक लावत मतदारांना थेट पैसे वाटायला सुरुवात केली. लाडकी बहिण योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. शेतकरी सन्मान निधी योजनेत केंद्राप्रमाणे राज्याकडूनही दर वर्षाला ६ हजार रुपये दिले जात आहेत. बेरेाजगार युवकांना भत्ता, शेतकऱ्यांना वीजबिलमाफी यासारख्या अनेक योजना गेल्या तीन- चार महिन्यात अचानक लागू करण्यात आल्या. त्यामुळे मतदारांना थेट बँक खात्यात पैसे मिळू लागले. हा फंडा काम करत असल्याचे लक्षात येताच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या वतीने पुढच्या ५ वर्षांसाठी १० वचने देऊन टाकली. त्यातही महिला, युवक व शेतकरी यांच्यावर फोकस ठेवण्यात आला आहे.
काय आहेत ही वचने जाणून घेऊ या…
1) लाडक्या बहिणींना आता यापुढे २१०० रुपये मदत देणार. म्हणजे सध्या चालू असलेल्या १५०० रुपये अर्थसाह्यात दरमहा ७०० रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या महिलांना दिले आहे. इतकेच नव्हे तर पोलिस दलात २५ हजार महिलांची भरती करण्याचे आश्वासनही दिले आहे.
2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला देण्याची ग्वाही सरकारने दिली आहे. सध्या ही रक्कम १२ हजार रुपयांपर्यंत आहे. त्यात ३ हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. शेतकऱ्यांना हमी भावावर २० % अनुदान देण्याचा शब्दी शिंदेंनी दिलाय.
3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!
4) वृद्ध नागरिकांना दरमहा २१०० रुपये मानधन देण्याचे आश्वासनही सरकारने दिलेय. सध्या ही रक्कम १५०० रुपये आहे, त्यात ७०० रुपये वाढ केली जाणार आहे.
5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार
6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देणार
7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधणार
8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 वेतन आणि सुरक्षा कवच देणार
9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र @2029 ’ शंभर दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!
एक मात्र लक्षात ठेवा.. जर महायुतीचे सरकार आले तर ही वचने पूर्ण होतील, हे सांगण्यात एकनाथ शिंदे विसरले नाहीत. आता महयुतीने इतकी भरमसाठ आश्वासने देऊन ठेवल्यावर महाविकास आघाडी तरी कशी मागे राहिल. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मुंबईत एक मोठी सभा घेऊन त्यात ५ लाभाच्या गोष्टी देण्याची गॅरंटीच जनतेला देऊन टाकली.
१. मविआची सत्ता आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवासाची सवलत दिली जाईल. म्हणजे महायुती सरकार ज्या महिलांना सध्या १५०० रुपये देते व सत्ता आल्यावर २१०० रुपये देण्याची घोषणा करतेय त्या महिलांना काँग्रेस आघाडीचे सरकार मात्र ३ हजार रुपये देण्यास तयार आहे.
२. जातनिहाय जनगणना व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार.
३. शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देणार.
४. कुटुंब रक्षण अंतर्गत २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषधे व बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत दिली जाईल.
५. बेरेाजगार युवकांना दरमहा ४ हजार रुपये दिले जातील.
आता विधानसभेच्या रणांगणात महायुतीच्या १० वचनांना मतदार भुलतो की महाविकास आघाडीच्या ५ गॅरंटीच्या आमिषाला बळी पडतो.. ते २३ नोव्हेंबरच्या निकालातच कळेल.