December 13, 2024

भाजपने जाहीर केली २० उमेदवारांची यादी;  गेल्या वेळी साडेचार लाखांच्या सर्वाधिक मताधिक्याने विजयी गाेपाळ शेट्टींसह चार खासदारांची तिकिटे कापली

भाजपने २०१९ मध्ये निवडून आलेल्या चार खासदारांची तिकिटे कापली, तर १३ खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली. तीन मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे बदल करण्यात आले.

नवी दिल्ली : महायुतीतील जागावाटपाचे कोडे सुटत नसल्याने अखेर भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी BJP’s 20 candidates from Maharashtra १३ मार्च रोजी जाहीर केली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने राज्यात २३ जागा जिंकल्या होत्या, त्यापैकीच २० मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. २०१९ मध्ये निवडून आलेल्या चार खासदारांची तिकिटे कापण्यात आली, तर १३ खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली. तीन मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे बदल करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), पीयूष गोयल (उत्तर मुंबई), रावसाहेब दानवे (जालना), कपिल पाटील (भिवंडी), भारती पवार (दिंडोरी) या केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली. तर चंद्रपूरमधून राज्याचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांचे तिकिट फायनल करण्यात आले. या मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपचे हंसराज अहिर पराभूत झाले होतेे, त्यामुळे यंदा इथून मुनगंटीवार यांच्यासारखा मातब्बर उमेदवार देण्यात आला. खरे तर मुनगंटीवार स्वत: अजिबात इच्छूक नव्हते, ते जाहीरपणे त्यांनी सांगितले होते. पण पक्षाने त्यांना बळजबरीने दिल्लीचे तिकीट काढून दिले, त्यांनीही ते नाईलाजाने स्वीकारले.

बहिणीचे तिकिट कापून पंकजांना उमेदवारी
Pankaja gets ticket by cutting sister’s ticket

२०१९ मध्ये परळी विधानसभेत पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडे पक्षात दुुर्लक्षित होत्या. पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत कायम वादग्रस्त विधाने केल्याची शिक्षा त्यांना साडेचार वर्षे भोगावी लागली. मात्र अलिकडेच त्यांनी या नेत्यांशी जुळवून घेतले होते. त्यातच अाता धनंजय मुंडेंमुळे पंकजांना परळीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून अखेर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी भाजपने बीड लोकसभेतून त्यांना उमेदवारी दिली. त्यांची सख्खी बहिण प्रीतम मुंडे १० वर्षांपासून बीडच्या खासदार आहेत. मात्र थोरल्या बहिणीसाठी त्यांना यावेळी खासदारकीचा ‘त्याग’ करावा लागला.

रावसाहेब दानवेंचा षटकार
Raosaheb Danve’s sixer

जालन्याचे खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सलग सहाव्यांदा तिकिट मिळाले अाहे. असा विक्रम करणारे ते महाराष्ट्रातील भाजपचे एकमेव नेते ठरले आहेत. २००९ पासून ते सलग लोकसभेवर विजयी होत आहेत. जालन्यात त्यांच्याएवढा सक्षम उमेदवार नसल्याने भाजपने त्यांच्याच नावाला पुन्हा पसंती दिली.

जळगावात तिकिट कापण्याची परतफेड

  1. पुण्यात भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी माजी महापौर मुरलीधर मोहोळ या युवा नेत्याला पक्षाने संधी दिली.
  2. अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे दोन वर्षांपासून गंभीर आजारी आहेत. त्यांच्या पक्षनिष्ठेचा आदर म्हणून भाजपने धोत्रे यांचे पूत्र अनुप यांना उमेदवारी दिली.

जळगावात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापून विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली. गंमत म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या यादी आधी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांचे तिकिट रद्द करुन उन्मेश पाटील यांना अर्ज भरण्यास सांगितले. पक्षाचा हा आदेश स्मिता यांना बिनबोभाट मान्य केला. गेल्या ५ वर्षात उन्मेश पाटील यांचे काम समाधानकारक नसल्याचा अहवाल भाजपकडे आला. त्यामुळे त्यांचे तिकिट यंदा कापून स्मिता यांना संधी देण्यात आली.

मुंबईत दोघांचे तिकिटे कापली, पूनम महाजन यांचीही उमेदवारी धोक्यात Poonam Mahajan’s candidature in jeopardy

  1. २०१९ मध्ये मुंबईतील ६ पैकी ३ जागी भाजपचे खासदार निवडून आले होते. त्यात उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी हे राज्यात सर्वाधिक म्हणजे साडेचार लाख एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते. पण यंदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासाठी भाजपने शेट्टींना तिकिट नाकारुन त्यांचा सुरक्षित मतदारसंघ गोयल यांना दिला. आता गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेवर शेट्टी यांचे पुनर्वसन केले जाण्याची चर्चा आहे.
  2. उत्तर पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या कामगिरीबाबतही पक्ष समाधानी नव्हता. म्हणून त्यांचे तिकिट कापून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात गुजराती भाषिक मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कोटेचा या गुजराती उमेदवाराची निवड भाजपने केली.
  3. मुंबईतील तिसऱ्या मतदारसंघात उत्तर मध्य मुंबईत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या खासदार आहेत. त्यांची उमेदवारी यंदा धोक्यात मानली जाते. पक्षाने या मतदारसंघातील उमेदवारी गुलदस्त्यातच ठेवली आहे.

    या खासदारांवर भाजपचा विश्वास कायम
    BJP retains faith in these MPs

    धुळ्यातून सुभाष भामरे, रावेरमधून रक्षा खडसे, वर्धातून रामदास तडस, नंदुरबारमधून हिना गावित, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढा येथून रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगलीतून संजय पाटील या विद्यमान खासदारांची तिकिटे कायम ठेवण्यात आली.

    या खासदारांचीही उमेदवारी धोक्यात
    Candidature of these MPs is also in jeopardy.

    सोलापूरचे खासदार स्वामी जयसिद्धेश्वर शिवाचार्य, गडचिरोलीचे अशोक नेते, भंडारा- गोंदियाचे सुनील मेंढे या विद्यमान खासदारांची नावे भाजपच्या यादीत नाहीत. याचे कारण म्हणजे जयसिद्धेश्वर यांच्या जातप्रमाणपत्राबाबत शंका असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गडचिरोली व भंडारातील खासदारांबाबत मतदारसंघातून प्रतिकूल अहवाल भाजपला प्राप्त झाले आहेत व या दोन्ही मतदारसंघातवर अजितदादाच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे. हा पेच न सुटल्याने या मतदारसंघाचे उमेदवार जाहीर न करण्याची खबरदारी भाजपने बाळगली.

    सर्वाधिक मराठा समाजाचे ९ उमेदवार
    9 candidates from Maratha community

    भाजपच्या पहिल्या यादीत मराठा समाजाचे ९, ओबीसी समाजाचे ५, अनुसुचित जातीचा एक, दोन आदिवासी (अनुसुचित जमाती), ब्राह्मण समाजाचा एक उमेदवार आहे. मुंबईतील दोन्ही उमेदवार मराठी भाषिक नाहीत.

    ५ महिलांना संधी five women’s in list

    केंद्रीय मंत्री भारती पवार, हिना गावित, रक्षा खडसे या तीन विद्यमान खासदारांसह पंकजा मुंडे व स्मिता वाघ अशा ५ महिलांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

खडसेंच्या सुनेची उमेदवारी कायम ठेवल्याने आश्चर्य Surprised that Khadse’s daughter-in-law’s candidature was retained

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षांतर्गत त्रासाला कंटाळून भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी भाजपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांची खासदारकी तेंव्हा कायम राहिली. आता खडसे राष्ट्रवादीतच असल्याने रक्षा खडसे यांना भाजप उमेदवारी पुन्हा देणार नाही अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र रावेरमधून त्यांची उमेदवारी पुन्हा जाहीर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीने या चर्चेला पुष्टी मिळत आहे. यातून खडसे लवकरच स्वगृही म्हणजे भाजपमध्ये येऊ शकतात अशी ही चर्चा सुरू झाली आहे.

 

https://missionpolitics.com/lok-sabha-polls-maha-yuti-maha-vikas-aghadi-yet-to-finalise-seat-sharing/

About The Author