सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या भीतीने अजितदादांना घाम

ईडी, सीबीआयसारख्या संस्थांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्रात आहे. काही नेत्यांनी त्याची अप्रत्यक्ष कबूली दिली तर काहींनी खासगीत हे मान्य केले. इंदापूरमधील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तर ‘भाजपात आल्यावर आपल्याला शांत झोप लागतेय’ असे सांगून चौकशीच्या कचाट्यातून सुटका झाल्याबद्दल समाधानही व्यक्त केला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर चौकशीला ब्रेक कसा लागतो, हेही आता जनतेपासून लपून राहिलेले नाही. मात्र आता विधानसभेच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे एक पुस्तक… राष्ट्रवादीचे नेते, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळांनी ईडीपासून सुटका मिळावी, म्हणून आपण भाजपशी हातमिळवणी केल्याचा कबूली दिल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. अजून काय काय गुपिते लपली आहेत राजदीप यांच्या पुस्तकात जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…..

छगन भुजबळांविषयी खळबळजनक दावा…

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात महाराष्ट्रासह देशभरातील अनेक वादग्रस्त राजकीय घडामाेडींचे लेखन केले आहे. मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाचे एक प्रकरण खूपच गाजतेय. या प्रकरणात लेखक असा दावा करतात की,‘छगन भुजबळांनी मला सांगितले होते की भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन- अडीच वर्षे तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत कितीवेळा चौकशांना सामोरे जायचं. यापूर्वी मला एक अटकही झाली होती. आता पुन्हा ते नको म्हणून आम्ही भाजपासाेबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार, सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांची ईडी चौकशी झाली होती. मी, अनिल देशमुख व मलिकांना अटक झाली. सुनेत्रा यांच्या अटकेच्या शक्यतेने अजितदादांना घाम फुटला होता. त्यामुळेच आम्ही भाजपसाेबत जाण्याचे ठरवले. पण शरद पवार तयार नव्हते. त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात गेलो,’ असे भुजबळांनी कबूल केल्याचे पुस्तकात नमूद केले आहे. भुजबळांना मात्र या दाव्यांचे खंडन करुन या बातम्या तद्दन खोट्या असल्याचा दावा केला आहे.

लेखक राजदीप सरदेसाई भूमिकेवर ठाम…

‘महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असतानाच मला क्लीनचीट मिळाली होती. आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने सरकारमध्ये गेलो नाही तर विकासासाठी महायुतीसोबत गेलो. मी हे पुस्तक स्वत: वाचणार असून माझ्या वकीलांनादेखील देणार आहे. निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे,’ असे भुजबळांनी सांगितले. लेखक राजदीप सरदेसाई मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहेत. ते म्हणतात, ‘मी लिहिलेले पुस्तक लोकांनी जरूर वाचावे. पुस्तकात पूर्ण महाराष्ट्रात या कालखंडात काय घटनाक्रम होता, त्याचे स्पष्टीकरण आहे.

जनतेने हे पुस्तक वाचून भुजबळांना विचारले पाहिजे. राजकारणात मला काही रस नाही. पत्रकार लेखक म्हणून आहे ती वस्तुस्थिती मी मांडली आहे . मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे. पण त्यांचीच काही लोकांसमोर माझ्याकडे ही व्यथा बाेलून दाखवली होती. इतकेच नव्हे तर ती लोकांसमोर मांडण्यास संमतीही दिली होती’, असे राजदीप यांनी स्पष्ट केले अाहे. भुजबळ काहीही दावे करोत, पण ईडीच्या धास्तीने अनेक नेते भाजपसोबत सत्तेत गेल्याचे काही लपून राहिलेेले नाही. खरे काय हे जनताही जाणतेच. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या चौकशाही कशा बंद झाल्या, नवाब मलिक तुरुंगातून कसे सुटून अाले या सर्व गोष्टींचे अर्थ जनता जाणून आहे. मात्र आता एेन निवडणुकीच्या तांेंडावर फक्त भुजबळांबाबतच्याच बातम्या कशा बाहेर आल्या, यामागे काेणाचे हात आहेत हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.