December 26, 2024

मंत्रिपद नाकारल्याने भुजबळ सोडणार राष्ट्रवादी

अजित पवार यांच्याशी फारसे सूर जुळत नसतानाही शरद पवारविरोधी बंडात भक्कम साथ दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये सर्वजण बचावात्मक भूमिका घेत असताना जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेऊन ओबीसींच्या आरक्षण बचावाचा नारा दिला…. तरीही ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद नाकारण्यात आले. या प्रकारामुळे प्रचंड संतापलेल्या भुजबळांनी आता थेट अजित पवारांनाच आव्हान देऊन राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. एक- दोन दिवसांत समर्थकांशी बोलून ते अंतिम निर्णय घेणार आहेत. भुजबळांच्या या बंडामुळे ओबीसी समाज महायुतीपासून दुरावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहेत भुजबळांसमोर आता पुढचे पर्याय जाणून घेऊ मिशन पॉलिटिक्समधून…

भावी मंत्र्यांच्या यादीत भुजबळांचे नावच नाही…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये नुकतेच ३९ मंत्र्यांचा समावेश करण्यात अाला. यात काही बड्या नेत्यांची नावे कापण्याचा धक्कादायक निर्णय तिन्ही पक्षाच्या नेत्यांना घ्यावा लागला. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव राष्ट्रवादीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असेल, असेच सर्वजण गृहित धरुन होते. कारण त्यांच्यासारखा फायरब्रॅन्ड नेता सरकारला हवा होता, अशी समजूत सर्वांचीच होती. याच मंत्रिपदाची आस घेऊन भुजबळ एक दिवस अाधी नागपुराला रवाना झाले. मात्र अजित पवारांच्या पक्षाकडून जेव्हा भावी मंत्र्यांना फोन जाऊ लागले तेव्हा त्यात भुजबळांचा नंबर नव्हता. हे ऐनवेळी त्यांना कळाले. त्यामुळे भुजबळ प्रचंड संतापलेले आहेत.

छगन भुजबळ अद्याप संपला नाही’…

पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, ‘होय मी नाराज आहे, पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे.’ तुमचे अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्याशी काही बोलणे झाले आहे का? असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ‘मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही’ असे सांगून त्यांनी आता पक्षनेतृत्वापासून आपण अंतर ठेवूनच वागणार असल्याचे संकेत दिले. भुजबळ म्हणाले, ‘मंत्रीपद न दिल्याचे मला दु:ख नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय किंवा फेकले काय? कोणाला काय फरक पडतो? आयुष्यात अनेकदा मंत्रीपदे मिळाली आहेत किंवा किती वेळा ती गेली देखील आहेत. परंतु छगन भुजबळ अद्याप संपला नाही. पण माझा जो अवमान पक्षाने केला अाहे, त्याबद्दल वाईट वाटते. आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र जेव्हा मी लोकसभेत किंवा राज्यसभेत जाण्यासाठी उत्सुक होतो तेव्हा पक्षाने मला संधी दिली नाही. लोकसभेच्या वेळी नाशिकमधून तिकिट मागितले तर ते दिले नाही. नंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवले तेव्हा ‘घरातला मामला’ म्हणून मला शांत बसवण्यात आले. नंतर साताऱ्याच्या नितीन पाटलांना राज्यसभा दिली, तेव्हाही मला शांत बसवले. आता म्हणतात, नितीन पाटलांचा राजीनामा घेतो व तुम्हाला राज्यसभा देतो? का तर म्हणे नितीन पाटलांच्या भावाला मकरंद पाटलांना मंत्रिपद दिलंय म्हणून त्यांचा राजीनामा घेऊ? का घ्यायचा त्यांचा राजीनामा. अन‌् मी आता का राज्यसभेवर जायचे. येवल्याच्या जनतेने मला निवडून दिले आहे. आता त्यांना सोडून राज्यसभेत गेल्यास या मतदारांशी प्रतारणा केल्यासारखे होईल’, असे सांगून भुजबळांनी आता पक्षाने राज्यसभा दिली तरी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.

जरांगेंना अंगावर घेतल्याने कदाचित मंत्रिपद नाकारले…

मी ओबीसींच्या हक्कासाठी लढत होतो आणि पुढेही लढत राहील. मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याने कदाचित मला मंत्रिपद नाकारले असेल,’ असा टोलाही भुजबळांनी लगावला. मंत्रिपद नाकारल्यामुळे रागावलेले भुजबळ तडकाफडकी नागपूर सोडून नाशिकमध्ये दाखल झाले. दोन दिवस समर्थकांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जहां नही रैना वहा नही चैना’ असे म्हणत पक्ष सोडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेतच. आता फक्त हा निर्णय मंत्रिपद डावलल्याने आपण घेत नाहीत,हे सिद्ध करण्यासाठी ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याची औपचारिकता पूर्ण करणार आहेत. मुळात, देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना मंत्रिपद देण्यास सकारात्मक होते असे त्यांचे म्हणणे आहे. पण अजित पवारांनी तरुणांना संधी देण्यासाठी त्यांना बाजूला सारल्याचे एका गटाकडून सांगितले जाते. तर भुजबळांचे पुतणे समीर यांनी नांदगावमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात बंडखेारी केल्याची शिक्षा म्हणून भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याचे दुसऱ्या गटाकडून सांगितले जाते.

भुजबळ कोणता मार्ग निवडणार?

पण मग आता भुजबळ कोणता मार्ग निवडतील? अशी चर्चा सुरु झाली आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीच्या वेळीच नाशकातून तिकिट मिळाले नाही तर भुजबळ राष्ट्रवादी सोडून महाविकास आघाडीतील एका पक्षाकडून लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एेनवेळी भुजबळांना निर्णय रद्द केला. त्यावेळीही भुजबळांची पसंती राष्ट्रीय पक्षाला होती असे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते. म्हणजे भुजबळ काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा अंदाज लावला जात होता. तेव्हा काँग्रेस पक्ष बहरात हाेता. पण आता विधानसभेला त्यांचे पानिपत झाल्याने भुजबळ आता महाविकास आघाडीतील एकाही पक्षात जाऊन स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत. त्याएेवजी समता परिषद या आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते अोबीसींसाठी आपल्याच सरकारशी लढा चालू ठेवतील, अशी शक्यता जास्त दिसत आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा एक पर्याय त्यांच्यासमोर असेल. पण भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वाटणाऱ्यांमध्ये भुजबळही आहेत. त्यामुळे ‘आस्मान से गिरे और खजूर पे अटके’ अशी परिस्थिती भुजबळ करुन घेणार नाहीत. भुजबळांचे पुतणे समीर यांनी आधीच नांदगावमधून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सोडला आहे. आता भुजबळांचे पूत्र पंकज हे विधान परिषदेचे आमदार अाहेत. त्यामुळे भुजबळ पंकज यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावणार का की फक्त स्वत:च पक्षाबाहेर पडून मुलाला राष्ट्रवादीतच ठेवतील, व पुतण्या समीरच्या मदतीने ओबीसींचे संघटन पुन्हा बळकट करतील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.