मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला आता आणखी ३९ मंत्र्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. यात भाजपचे १९, शिंदेसेनेचे ११ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील ९ मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी ३३ मंत्री हे कॅबिनेट तर ६ राज्यमंत्री अाहेत. यापैकी अनेक दिग्गज नेते तीन तीन- चार चार वेळा आमदार झाले असून तितक्याच वेळा मंत्रिपदाचा मानही त्यांना मिळाला अाहे. किती दिग्गज नेते या मंत्रिमंडळात अाहेत अन् किती नवखे याचीही चर्चा होतेे. पण महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षित व विकासाची जाण असलेले किती आमदार मंत्री झालेत याची कुणी फारशी चर्चा करत नाही. आपण मात्र नव्या मंत्र्यांच्या शिक्षणासह इतर वैशिष्ट्यांची माहिती करुन घेऊ या .. मिशन पॉलिटिक्समधून
मंत्रिमंडळाती सर्वात गरिब मंत्री दादा भुसे!
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सात वकील आहेत. दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस हे वकील असून त्यांच्यानंतर ६ जण वकीलीची पदवी घेतलेले आहेत. पंकज भोयार हे डॉक्टरेट असलेले एकमेव मंत्री आहेत. पण ९ मंत्री बारावीपर्यंतच शिकलेले आहेत तर, दोन जण दहावी पास आहेत. ५ मंत्री हे पदव्युत्तर पदवी मिळवलेले आहेत. तर चार जणांनी पदवीका पूर्ण केली आहे. १८ जण पदवीधर आहेत. आठवी पास भरत गोगावले हे सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत.
संपत्तीचा विचार केला तर भाजपचे मुंबईतील बडे बिल्डर असलेले मंगलप्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री ठरले. तर नाशिक जिल्ह्यातील शिंदेसेनेचे नेते दादा भुसे हे सर्वात ‘गरीब’ मंत्री आहेत. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी ९ लाख २३ हजार रुपये इतकी आहे. त्यानंतर शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा नंबर असून त्यांची संपत्ती ३३३ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिवेंद्रराजे भोसले असून त्यांची संपत्ती १२८ कोटी ४१ लाख ८१ हजार रुपये इतकी आहे. तर शिवसेनेचे दादा भुसे सर्वात गरिब मंत्री असून त्यांची संपत्ती १ कोटी ६० लाख ८५ हजार रुपये इतकी आहे.
मंत्रिपदासाठी स्वच्छ चारित्र्याचे निकष फडणवीसांनी पाळले का?
३९ पैकी २३ मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. यात भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर सर्वाधिक ३८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्यानंतर भाजपच्या मेघना बोर्डिकर यांच्यावर १२ आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर ९ गुन्ह्यांची नोंद आहे. यावरुन असे दिसते की, भाजप श्रेष्ठींनी स्वच्छ चारित्र्याचा जो निकष मंत्रिपदासाठी लावला होता तो पूर्णपणे फडणवीस सरकारमध्ये पाळला गेलेला नाही. ३९ पैकी फक्त १६ मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर एकही गुन्हा नोंद नाही. यात बहुतांश नेते हे पहिल्यांदा आमदार झालेले आहेत. वयाचा विचार केला तर २८८ आमदारांमध्ये ७८ वर्षीय छगन भुजबळ हे वयाने सर्वात ज्येष्ठ होते. पण त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. त्यामुळे नवी मुंबईच्या एेरोलीतील भाजपचे ७४ वर्षीय नेते गणेश नाईक यांना सर्वात वयस्कर मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. तर सुनील तटकरेंच्या कन्या अदिती तटकरे या ३६ वर्षीय नेत्या मंत्रिमंडळात वयाने सर्वात ज्युनिअर मानल्या जातात.
महायुती सरकारमध्ये महिलांना १० टक्केच स्थान..
१९९५ पासून सात वेळा आमदार झालेल्या गणेश नाईक यांची ही मंत्रिपदाची पाचवी टर्म आहे. १९९५ मध्ये युती सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले होते. तर दोन वेळा आमदार झालेल्या अदिती तटकरे यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. २०१९ व २०२४ या पाच वर्षाच्या काळात ठाकरे व शिंदे या दोन्ही सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. लाडकी बहिण योजनेमुळे प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये महिलांना फक्त १० टक्केच स्थान मिळाले आहे. एकूण ४२ मंत्र्यांपैकी फक्त ४ महिला मंत्री आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांचा कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदावर समावेश झाला आहे. तसेच, राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांची पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागली आहे. पंकजा मुंडे आणि अदिती तटकरे यांनी महिला व बालकल्याण विभागाचे मंत्रिपद याआधी भूषविले आहे. त्यामुळे आता त्यांना कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.