Congress will remove Nana Patole from the post of state president लोकसभेपूर्वीच नाना पटोलेंची गच्छंती अटळ

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे उरलेसुरले अवसानही गळाले आहे. आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय करावे लागेल, यावर हायकमांडने विचारमंथन सुरु केले आहे.

पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला (congress incharge ramesh chennithala)  यांनी मंगळवारी मुंबईत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे, मात्र त्यापूर्वीच काँग्रेसमधील एका गटाने आधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना बदला, अशी आग्रही मागणी हायकमांडकडे लावून धरली आहे. अशोक चव्हाणांनीही पक्ष सोडण्याचे खापर नानांवरच फोडले होते. त्यामुळे पक्षातील गळती रोखायची असेल तर लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पटोले यांची उचलबांगडी करणे व पक्षाला नव्या दमाचा व सर्वांना स्वीकारार्ह असेल असा प्रदेशाध्यक्ष देणे, हाच एकमेव पर्याय काँग्रेससमोर असेल.

नानांना विरोध का?
– २०१४ च्या निवडणुकीत भंडार- गोंदियातून भाजपच्या तिकिटावर खासदार झालेल्या नाना पटोलेंनी (Nana Patole) ४ वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत खासदारकीचा राजीनामा दिला होता. नंतर भाजपचाही राजीनामा दिला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र नागपूरमध्ये नितीन गडकरीविरोधात (Nitin Gadkari) ते पराभूत झाले. २०१९ च्याच विधानसभा निवडणुकीत मात्र नाना साकोलीमधून ते आमदार झाले. मविआ सरकारमध्ये त्यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. नानांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. कालांतराने ४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. नंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याचेही कबूल केल होते, मात्र ते होऊ शकले नाही. गेली तीन वर्षे नाना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. यादरम्यान विधान परिषदेच्या शिक्षक- पदवीधर मतदारसंघात काही ठिकाणी पक्षाला यश मिळाले, कसबा पोटनिवडणुकीतही भाजपला धक्का देत काँग्रेसचा आमदार निवडून आणण्याची किमया पक्षाने करुन दाखवली या जमेच्या बाजू त्यांच्या नावावर आहेत. मात्र काँग्रेसच्या जुन्या नेत्यांची मने मात्र नानांना आजतागायत जिंकता आली नाहीत. त्यांच्या मनमानी कारभारावर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासारखी जुनी मंडळी नेहमीच नाराजी बोलून दाखवत असे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अनेकदा नानांविरोधा तक्रारीही केल्या, पण दिल्लीतून त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. पक्षश्रेष्ठींनी नेहमी नानांनाच बळ दिले.

नाशिक पदवीधरमध्ये एक आमदार हातचा गमावला

नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसने विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र स्वत: सुधीर तांबे यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी युवा नेतृत्व सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. सत्यजित हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे व सुधीर तांबे यांचे सुपूत्र आहेत. या जागेवर काँग्रेसचा सहज विजय शक्य होता, त्यामुळे सत्यजितच्या रुपाने तरुणाईला संधी द्यावी, अशी तांबे, थोरात यांची मागणी होती. मात्र नाना पटोलेंना तो प्रस्ताव हाणून पाडला व पक्षाचा बी फॉर्म सुधीर तांबे यांच्याच नावे पाठवला. यामुळे दुखावले गेलेल्या तांबे- थोरात यांनी शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज भरलाच नाही व सत्यजित यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले. अखेर सत्यजित विजयी झाले पण अपक्ष म्हणून. म्हणजे एक हक्काची आमदारकी काँग्रेसला मिळत असताना केवळ प्रतिष्ठेचा मुद्दा करुन नाना पटोलेंनी ही संधी गमावली हा मेसेज थोरात- तांबे यांनी दिल्लीपर्यंत पोहोचवला. तरीही पटोलेंवर कारवाई झाली नाही याबद्दल सर्वच काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना आश्चर्य वाटते.

आता बंड रोखायचे असेल तर नानांची उचलबांगडी हाच पर्याय
अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे किमान १३ ते १५ आमदार विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पक्ष सोडून भाजप किंवा इतर पक्षांचा मार्ग पत्करतील, असे संकेत दिले जात आहेत. हे बंड रोखायचे असेल तर पक्षाला तातडीने प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घ्यावा लागेल. कारण या सर्व नाराज आमदारांची पहिली मागणी तीच आहे. जर हा निर्णय घेऊन पक्षात उर्जा आणणारा नवे नेतृत्व महाराष्ट्रात दिले तरच पक्षाची ही गळती काही प्रमाणात का होईना रोखता येऊ शकेल, अशी माहिती काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics