बीड जिल्ह्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. या विधानसभा निवडणुकीनंतर माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी आघाडी उघडून त्यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिले होते. सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण उचलून त्याबद्दल राज्यभर, अगदी विधिमंडळातही आवाज उठवण्यात भाजपचे आमदार सुरेश धस आघाडीवर होते. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भाऊ बहिणीला मंत्रिपद न मिळू देण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले असले तरी मुंडेंकडे बीडचे पालकमंत्रिपद जाणार नाहीत या त्यांच्या प्रयत्नांना मात्र यश अाले. फिल्मी डायलॉग, अस्सल ग्रामीण ढंगाच्या भाषणबाजीने आमदार धस नेहमीच चर्चेत येतात. आता मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा करुन त्यांनी नवी उपाधी चर्चेत आणली आहे. पण त्यावर कुरघोडी करत पंकजा मुंडे यांनीही देवेंद्र बाहुबली असतील तर आपण शिवगामी आहोत, असे भरसभेत सांगितले. सुरेश धसच आपल्याला शिवगामी म्हणायचे, हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत. मग जर देवेंद्र हे बाहुबली असतील, पंकजा शिवगामी असतील तर मग बीडच्या राजकारणात कटप्पा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तरही सर्वांना माहिती आहे, पण अजून तरी त्यांचे नाव जाहीरपणे कुणी घेत नाही… जाणून घेऊ या मागचे राजकारण मिशन पॉलिटिक्समधून
सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर राग का?

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या टोकाचा संघर्ष सुरु आहे. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या दोन मंत्री भावंडांविरोधात संपूर्ण जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले असल्याचे चित्र आहे. सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्या आरेापींना धनंजय मुंडे यांचे अभय होते, असा अारोप केला जात आहे. आवादा कंपनीला दोन कोटीची खंडणी मागणारा वाल्मीक कराड राजरोस धनंजय मुंडेंचे कार्यालय सांभाळत होता हेही लपून राहिलेले नाही. अशाच राजकीय वरदहस्तामुळे बीड जिल्ह्यात गुंडगिरी वाढल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी सर्वात पुढे आले आहेत ते भाजपचे आमदार सुरेश धस. त्यांचा एकाधिकारशाहीमुळे धनंजय मुंडेंवर राग आहे. तर विधानसभा निवडणुकीत धस यांना पाडण्यासाठी आपल्याच पक्षाच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केल्याचा, धस यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचा पंकजा यांच्यावरही राग आहे. आमदार झाल्यानंतर पहिल्याच सत्कार साेहळ्यात त्यांनी पंकजांवरचा राग जाहीरपणे बोलूनही दाखवला. नंतर संतोष देशमुख हत्याप्रकरण धस यांनी जी तीव्रतेने लावून धरलेय, त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आहे हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेही राष्ट्रवादीत नाराजी आहे.
फडणवीसांकडून सुप्त संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न?

या परिस्थिीत धस यांनी आपला मतदारसंघ असलेल्या आष्टीत आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री येतील की नाही? अशी शंका व्यक्त केली जात होती. पण जलसंपदा विभागाच्या येथील प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री आले. एकटेच आले नाहीत तर ज्या पंकजा मुंडेंना धस यांनी बोलावले नव्हते त्यांनाही सोबत घेऊन आले. यातून बीड जिल्ह्यात धस व पंकजा मुंडे या भाजप नेत्यांमध्ये असलेला सुप्त संघर्ष मिटवण्याचे फडणवीस यांचे प्रयत्न होते. पण त्याला ना धस यांनी प्रतिसाद दिला ना पंकजाही त्यासाठी फारशा अनुकूल दिसल्या. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर निमंत्रण नसतानाही पंकजा कार्यक्रमास आल्या. पण आपल्या भाषणात त्यांनी आमदार धस यांना जे टोले मारले, त्यावरुन तरी पंकजा मुंडे व धस यांच्यातील मतभेद इतकी लवकर संपुष्टात येण्याची शक्यता नसल्याचे सर्वांना अनुभवास आले.
अन् आष्टीत रंगली फिल्मी स्टाईल फटकेबाजी…

या कार्यक्रमातही धस यांची डायलॉगबाजी खूप रंगली. दिवार चित्रपटाची अाठवण करुन देत ‘मेरे पास देवेंद्र बाहुबली है’ असे धस यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. देवेंद्र यांचा ‘बाहुबली’ हा प्रथमच उल्लेख धस यांनी केला. तोच धागा पकडून पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘धस आज मुख्यमंत्र्यांना बाहुबली म्हणत आहेत, यापूर्वी ते मला शिवगामी म्हणायचे. म्हणजे शिवगामी ही बाहुबलीची आई होती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांविषयी माझ्या मनात ममत्व भाव निर्माण झालेला आहे. शिवगामीचे ज्या प्रमाणे मेरा वचन ही मेरा शासन है, हे धोरण होते. त्याचप्रमाणे मीही गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे. मी जे बोलते तेच करते. सुरेश धस यांना सहकार्य करण्याचे मी जाहीर व्यासपीठावरुन सांगत असेल तर त्याशिवाय दुसरे माझ्या मनात काहीही नसेल,’ असे स्पष्टीकरण देत पंकजा यांनी धस यांनी आपल्यावर पराभवाचे कटकारस्थान रचल्याचा जो आरोप केला आहे तो फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्याउलट बीड लोकसभा निवडणुकीत मात्र बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी धस यांनी पाठबळ दिले का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करुन पुन्हा अविश्वासाचे वातावरण निर्माण केले. मला या कार्यक्रमाला बोलावले नसते तरी जनतेसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कार्यक्रम असल्याने मी इथे आले, कारण मी राज्याची मंत्री आहे,’ असा टोलाही त्यांनी धस यांना लगावला व अापण मंत्री असल्याची जाणीवही करुन दिली. इतकेच नव्हे तर मी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या हेलिकॉप्टरमधून आले, म्हणजे मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिण आहे याची जाणीवही पंकजा यांनी सर्वांना करुन दिली.
बीडच्या दोन बड्या नेत्यांमध्ये दुरावा कितपत?

आता मुख्यमंत्र्यांसोबत राज्याच्या मंत्री म्हणून पंकजा कार्यक्रमास उपस्थित राहिल्या म्हटल्यावर त्यांचा योग्य सत्कार करण्याची औपचारिकता धस यांनी पार पाडली. मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्याकरवी आधी पंकजांचा सत्कार घडवून आणला. अापल्या हातून त्यांना पुष्पगुच्छ देताना सत्कारमूर्ती असलेल्या पंकजांकडे धस यांनी साधे पाहिलेही नाही. यातून या दोन्ही नेत्यांमध्ये अजूनही किती दुरावा आहे हे संपूर्ण आष्टी तालुक्यातील जनतेने अनुभवले. या कार्यक्रमात बाहुबली व शिवगामी कोण हे स्पष्ट झाले असले तरी मग कटप्पा कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचे उत्तर सर्वांनाच माहिती आहे, पण ते जाहीरपणे बोलण्याचे अजून तरी कुणी धाडस केलेले नाही. या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत प्रोटोकॉलनुसार मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव होते. पण धस यांनी त्यांच्याविरोधात जी आरोपांची मालिका सुरु केली आहे ती पाहता धनंजय येणार नाहीत हे जगजाहीर होते. झालेही तसेच. डोळ्याच्या ऑपरेशनचे निमित्त करुन धनंजय तिथे आले नाहीत. संपूर्ण कार्यक्रमात त्यांचे एकाही वक्त्याने नावही घेतले नाही. पण संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला जसा मोक्का लावला, तसा राख- वाळूची तस्करी करणाऱ्यांना लावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करुन धस यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय व त्यांच्या समर्थकांना टार्गेट केल्याचे मात्र लपून राहिलेले नाही.
पंकजा मुंडेंनी कुणाचा हिशेब केला चुकता?

दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनीही ‘मी पालकमंत्री असताना कुणाच्याही अंगाला ओरखडा येऊ दिला नाही’ असे सांगत धनंजय यांच्या कारभारावरही अप्रत्यक्ष टीकाच केली. तसेच ‘बीड जिल्ह्यात गडाला मानाचे स्थान आहे. मात्र या जिल्ह्याने आजवर कोणत्याही व्यक्तीची पूजा केली नाही’ असे सांगत धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या महंत नामदेवशास्त्री यांचे हिशेबही चुकता केल्याचे मानले जाते. एकूणच, भाजपमधील दुही संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धस व पंकजा यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी तो मिटलेला नाही हे तितकेच खरे. मुळात भाजपात फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात अनेक वर्षंांपासून सुप्त संघर्ष आहे. आता गेल्या पाच वर्षातील राजकीय वनवास अनुभवल्यानंतर पंकजा यांनी फडणवीस विरोधाची धार काहीशी कमी केलेली आहे, पण ती संपली असे म्हणता येणार नाही. अशा वेळी आमदार सुरेश धस यांच्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्याला बळ देऊन मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात दोन्ही मंत्री मुंडेंना ‘चेक’ देऊ शकेल अशा एका नेत्याला पाठबळ दिल्याचा संदेशही दिला अाहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.