मुंबई : गेली ५ वर्षे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा विधान परिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुका लागतात तेव्हा भाजपच्या कोट्यातून सर्वात प्रथम नाव चर्चेत येते ते राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पराभूत झाल्यापासून पंकजा पक्षात दुर्लक्षित आहेत. राज्यसभा किंवा विधान परिषदेवर वर्णी लावून आपले राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी आशा त्यांना व त्यांच्या समर्थकांना होती. मात्र भाजप श्रेष्ठींनी मात्र त्यांचा वेळाेवेळी अपेक्षाभंगच केला. उलट पंकजा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. रमेश कराड यांना विधान परिषदेवर पाठवून पंकजा यांच्या दु:खावर मीठ चोळण्याचा प्रकार झाल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
पक्षाकडून डावलले जात असल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी कधी जाहीर टीका केली नसली तरी अप्रत्यक्षपणे त्या हे दु:ख माध्यमांमध्ये व कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तर ‘आता कुठल्याही निवडणुका आली की माझे नाव चर्चेत आणू नका. आता मी थेट २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतूनच लढेल’ अशी विनंती वजा आवाहन कार्यकर्त्यांना करताना त्यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीरही करुन टाकली होती.
दरम्यानच्या काळात राज्यात राजकीय परिवर्तन झाले. २०१९ मध्ये पंकजा यांना परळीतून पराभूत करणारे त्यांचे चुलतभाऊ धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी पक्ष व भाजपची राज्य पातळीवर हातमिळवणी झाली. त्यामुळे परळीची जागा कुणाला सुटणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली. बहिण- भावांमधील राजकीय कटूताही दूर झाल्याचे काही प्रसंग महाराष्ट्राने अनुभवले आहेत. यातून मार्ग काढता येईल याचा दोन्ही पक्षाचे नेते विचार करत होते.
आता २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात भाजपच्या वाट्याला ३ जागा येणार आहेत. त्यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी देण्याची चर्चा पक्ष पातळीवर सुरु झाली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी पंकजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या चर्चेल अधिक बळकटी मिळत आहे. स्वत: पंकजा यांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

फडणवीस म्हणाले, पक्ष चांगलाच निर्णय घेईल
नागपुरात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना पंकजांबाबत प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, ‘पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत जो काही निर्णय होईल तो राष्ट्रीय पातळीवरच होईल. आणि हे नेते जो निर्णय घेतील तो चांगलाच घेतील. पंकजा मला भेटल्या यात नवीन काहीच नाही. आम्ही नेहमीच भेटत असतो. त्यात पक्ष कार्याची चर्चा होत असते. परवाच्या भेटीत राज्यसभा वा इतर राजकीय चर्चा झालेली नाही. राज्यसभेत कोण जाईल वा कोण जाणार नाही याचा निर्णय वरिष्ठ घेत असतात.’